इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचे आक्रमक विधान
तेल अवीव : इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांवरही दिसून आला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज यांनी इराणला थेट इशारा दिला आहे की, जर इराणकडून इस्रायलवर होणारे क्षेपणास्त्र हल्ले थांबवले नाहीत, तर तेहरानला पेटवून दिले जाईल.
काही दिवसांपूर्वी इराणने इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा पलटवार करत क्षेपणास्त्र हल्ले केले होते. याआधी इस्रायलने इराणमधील अणवस्त्र संशोधन केंद्रांवर आणि लष्करी तळांवर हल्ले केले होते. एका उच्चस्तरीय बैठकीत इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रमुख एयाल जामीर, मोसाद प्रमुख डेविड बारनेआ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी काट्ज यांनी म्हटले की, इराणचे हुकूमशाह त्यांच्याच नागरिकांना कैद करत आहेत आणि अशी स्थिती निर्माण करत आहेत ज्यामुळे तेहरानच्या लोकांना त्याची किंमत चुकवावी लागेल.
इस्रायलच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, काही मिसाइल आयडीएफला चकवा देऊन रहिवासी भागांपर्यंत पोहोचल्या. यामुळे तेल अवीव, रमात गन आणि रिशोन लेजिओनमध्ये नुकसान झाले. या हल्ल्यांमुळे तीन इस्रायलली नागरिकांचा मृत्यू झाला असून, ७० लोक जखमी झाले आहेत.
इस्रायलवर २०० बॅलेस्टिक मिसाइलचा मारा
काट्ज यांनी इराणचे प्रमुख अली खामेनेई यांना थेट इशारा देत म्हटले की, जर खामेनेई इस्रायलच्या नागरिकांवर मिसाईल हल्ले करत राहिले, तर तेहरान पेटेल. दरम्यान, या विधानांमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आयडीएफच्या माहितीनुसार, इराणने इस्रायलवर २०० बॅलेस्टिक मिसाइलचा मारा केला होता. यापैकी बहुतांश मिसाइल पाडल्याचा दावा इस्रायलने केला आहे, मात्र २५ टक्के मिसाइल पाडणे शक्य झाले नाही.