चिऊचा सगळा प्लॅन ठरला होता. ती क्रेप पेपरच्या रंगीत फिती भिंतीला लावणार होती. चारही कोपऱ्यात फुगे. निळे आणि पिवळे. निळा तिचा आवडता रंग आणि पिवळा बाबाचा ... म्हणून! मधोमध बाबाचा आणि तिचा फोटो. तो मागच्याच महिन्यात तिच्या वाढदिवसाला काढला होता. बाबानेच तो कौतुकाने प्रिंट करून आणला होता. ग्रीटिंग कार्ड तर कधीचं तयार होतं. त्यावर तिने बाबांचं आणि तिचं चित्र काढलं होतं. त्या चित्राच्या बाजूला रंगीत पेनाने बाण काढून, 'चिऊ' आणि 'चिऊचा बाबा' असंही लिहिलं होतं. चित्राच्या खाली हॅपी फादर्स डे बाबा! असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. आता फक्त रंगीत चांदण्यांचे स्टिकर्स त्या ग्रिटींग कार्डला चिकटवायचे बाकी होते. की मग झालंच तयार!
पण त्यासाठी आईने सगळं सामान पटापट आणून तर दिलं पाहिजे ना! तिचं आपलं काहीतरी वेगळंच म्हणणं होतं! काय तर म्हणे "तुमचा फादर्स डे आणि मला कशाला त्रास? माझी रोजची कामं काही कमी आहेत जी तुम्ही आणखी वाढवून ठेवताय?"
"आता कसं करावं मग? बाबाला कसं सांगणार सामान आणायला? त्यालाच तर सरप्राईज द्यायचंय ना!"
चिऊ अगदीच उदास झाली होती. हल्ली ती अशी उदास झाली की ती 'दुसऱ्या चिऊकडे' जायची. 'दुसरी चिऊ' तिची अगदी खास खास मैत्रिण झाली होती. आपल्या मनातलं सगळं सगळं ती या 'दुसऱ्या चिऊला' सांगायची. तिच्या बाबानेच शोधली होती ही मैत्रिण तिच्यासाठी!
त्याचं झालं असं. काही दिवसांपूर्वी एक चिमणा-चिमणी सारखी चिवचिव करत त्यांच्या बाल्कनीत ये जा करायला लागली. त्यांनी आणलेली वाळकी पानं, गवताच्या काड्या सारख्या बाल्कनीत पडायला लागल्या. कचरा काढून काढून आईची कंबर दुखायला लागली. आई चिमण्यांवर वैतागायला लागली. त्यांच्या कलकलाटाने आजीची दुपारची झोप मोडू लागली.
"उच्छाद मांडलाय कार्ट्यांनी" म्हणत आजी त्यांना हाकलू लागली तेव्हा बाबाने मधे पडून सगळी सूत्रं स्वतःकडे घेतली.
त्याने एक रिकामी कुंडी घेतली. त्यात वाळलेलं गवत, वाळलेली पानं, थोडा कापूस असं काय काय ठेवलं! मदतीला चिऊ होतीच.
बाबाने ही कुंडी, कुंडी स्टँडवर सर्वात उंच जागी ठेवली. आणि बाल्कनीचं दार बंद करून टाकलं. बाबाने घरात जाहीर केलं, "आजपासून चार दिवस हे दार उघडायचं नाही. बायको, तुला केर काढायचा त्रास नको आणि आईची दुपारची झोपमोड नको."
आणि हळूच चिऊच्या कानात बाबा म्हणाला, " त्या बिचार्या चिमण्यांना या दोघींचा जाच नको."
जमाडी जंमत! मग रोज रात्री चिऊ आणि बाबा त्या चिमण्यांच्या घरट्याबद्दल बोलायचे. किती बांधून झालं असेल. आज दोघांनी काय काय केलं असेल, याचा अंदाज बांधायचे. चिऊला खूप वाटायचं 'हळूच पहावं का दार उघडून?'
पण बाबाने बजावलंच होतं, नाही म्हणजे नाहीच त्रास द्यायचा त्यांना. मग काय करणार?
संपले बुवा कसे बसे चार दिवस. चिऊने दार उघडलं तर काय? बाबाने सर्वात उंचावर ठेवलेल्या त्या कुंडीत चिमणा चिमणीने उबदार घरटं बांधलं होतं.
'किती सुंदर!' चिऊ बघतच राहिली. पण जवळ जाऊन बघता येईना. चिमणी सतत घरट्यात असायची. चिमणा मात्र सारखा ये जा करायचा. बाबा म्हणाला, 'अग अंडी घालतेय ती!' आता चिऊचं अख्खं घरच चिमणा चिमणीच्या अवतीभोवती फिरु लागलं.
आजीने एका वाटीत उंचावर दाणे ठेवायला सुरुवात केली. चिमणा चिमणीला त्रास नको म्हणून आईने कपडे बाहेर वाळत घालणंच बंद केलं.
चिमणीने रोज एक अशा पध्दतीने तीन अंडी दिली. रोज सकाळी बाबा चिऊला खांद्यावर बसवायचा आणि घरट्यातली अंडी दाखवायचा. पण दिवसभरात पुन्हा चिमणीच्या घरट्यात मुळीच डोकावायचं नाही असं प्रॉमिस घेतलं होतं तिच्याकडून बाबाने!
चिमणीने अंडी दिली आणि पुढे काही घडेच ना.
"कधी बाहेर येणार अंड्यातून पिल्लं?" चिऊला नुसती घाई.
"आज येतील?" ती रोज बाबाला विचारायची.
"अशी घाई करून कसं चालेल बेटा? प्रत्येक सुंदर गोष्ट तयार व्हायला वेळ लागतो!" बाबा समजवायचा. पण चिऊला कुठला धीर? सकाळ, दुपार, संध्याकाळ तिचा एकच प्रश्न- "कधी येतील पिल्लं?"
पिल्लं तर आलीच नाहीत पण मधेच परीक्षा मात्र आली. आणि चिऊ विसरूनच गेली चार पाच दिवस घरट्याबद्दल!
परीक्षा संपली त्या दिवशी चिऊ घरी आली तर काय? घरट्यातून लहानगा 'चिव चिव' आवाज! "पिल्लं???" चिऊने आनंदाने नाचून नाचून घर डोक्यावर घेतलं. खालच्या साचीला ओरडून सांगितलं 'आमच्या चिऊताईच्या घरट्यात पिल्लं आली गं,' आईला, बाबाला, मामाला आणि तिच्या मैत्रिणींना सुध्दा फोन केला!
पण पिल्लं दिसतच नव्हती. स्टूलवर चढून बघायचा प्रयत्न केला, पण कसलं काय नि कसलं काय! चिऊची उंची पुरेना. मग काय? बाबा ऑफिसमधून येईपर्यंत पुन्हा वाट पाहिली.एकदाचा बाबा आला. चिऊला खांद्यावर घेतलं आणि चिऊने पहिल्यांदा पिल्लांना पाहिलं. तीन छोटूकली पिल्लं! किती गोड होती ती. त्यातलं एक पिल्लु तर चिऊला इतकं आवडलं, तिच ही चिऊची मैत्रिण 'दुसरी चिऊ'!
बाबाने चिऊला चिमण्यांशी बोलायला शिकवलं.
"तू बोल तर खरं! त्यांना सगळं समजतं. आपण सांगत रहायचं."
सुरुवातीला चिऊला पटायचं नाही. "आपली भाषा त्यांना कशी कळेल?" पण हळूहळू चिऊलाही पटलं. 'दुसऱ्या चिऊला' आपल्या मनातलं सगळं समजतं. आता ती रोज बोलायची दुसऱ्या चिऊशी. तिला सगळं सांगायची. शाळेतल्या गमती, मैत्रिणींची भांडणं आणि मोठं कुणी रागवलं तर ते सुद्धा!
आतासुद्धा ती दुसऱ्या चिऊशी बोलत होती. " बघ ना ग चिऊ, बाबाला छान सरप्राईज द्यायचं फादर्स डे चं तर ही आई सामान आणून द्यायला नाही म्हणते."
दुसरी चिऊ आता थोडं थोडं उडायला शिकली होती. चिऊचं बोलणं ऐकून ती हळूच घरट्यातून बाहेर आली आणि उडत उडत बाल्कनीच्या गजावर येऊन बसली.
तिला असं उडताना पाहून चिऊला एकदम एक कल्पना सुचली.
"आई, मला देतेस पैसे? मी आजीला घेऊन जाते आणि सामान घेऊन येते."
हे सगळ्यांनाच पटलं. अगदी आजीलासुद्धा! मग काय प्रश्नच मिटला.
आजी आणि चिऊ सगळं सामान घेऊन आणली. आता चिऊची नुसती घाई. कागदाच्या फिती काप, त्या चिकटव, फुगे फुगव... काय अन् काय चिऊची ही लगबग 'दुसरी चिऊ' बाल्कनीच्या गजावर बसून टकामका बघत होती.
काम करता करता सवयीने चिऊ दुसऱ्या चिऊशी बोलत होती.
"हे बघ हे रंगीत कागद. असे कापून इथे चिकटवेन. छान दिसेल ना मग? बाबाला खूप आवडेल."
दुसऱ्या चिऊला काय वाटलं कुणास ठाऊक. ती भुर्रकन खोलीत आली आणि रंगीत कागदाचा एक तुकडा चोचीत धरून आपल्या घरट्यात घेऊन गेली.
"ए आई, आजी इकडे या... बघा ना ... ही 'दुसरी चिऊसुद्धा' माझ्यासारखंच तिचं घरटं सजवते आहे. तिच्या बाबांसाठी बहुतेक! ती पण सरप्राईज देणार तिच्या बाबाला!"
आई, आजी पहातात तो काय? खरंच दुसरी चिऊ भुर्रकन खोलीत येत होती आणि एखादा रंगीत कागदाचा तुकडा चोचीत धरून आपल्या घरट्यात नेऊन ठेवत होती.
या दोन्ही लहानग्या चिमण्यांना आपलं घरटं सजवताना आई, आजी कौतुकाने पहात होत्या.
इतक्यात अघटितच घडलं. दुसरी चिऊ उडता उडता अचानक पंख्याला आपटली अन् धपकन् खाली पडली. ची.... ची.... अशा विचित्र आवाजात ओरडू लागली. तिला उडता येईना.
झाल्या प्रकाराने चिऊ इतकी घाबरली, पटकन जाऊन आईला बिलगली. आई,
आजी, चिऊ सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी... कुणालाच सुचेना काय करावं...
एवढ्यात कुठूनसे चिमणा चिमणी भरभर उडत आले. ते ही जीवाच्या आकांताने कर्कश ओरडू लागले. पिलाभोवती घिरट्या घालू लागले.
"आई, आई, ते चिऊला उचलत का नाहीत? त्यांच्या घरट्यात का नेत नाहीत? मी पडले तर तू कशी मला उचलतेस? जवळ घेतेस... आई, चिऊला काही होणार तर नाही ना....." चिऊ आता ढसाढसा रडत होती.
आई खूपच भेदरली होती. पिल्लाचं काय करावं? चिऊला कसं समजावं? तिला काही सुचेना. तिने कसाबसा बाबाला फोन केला. म्हणाली, 'ताबडतोब घरी ये'.
बाबा घरी आला. त्याने आधी या तिघींना खोलीतून बाहेर काढलं.
"त्या चिऊचे आईबाबा आलेत ना? ते बघतील. तुम्ही लुडबुड करू नका."
"बाबा, ते चिऊला त्यांच्या घरट्यात का नेत नाहीत? ते चिऊला उचलून का घेत नाहीत? बाबा तिला उडता नाही रे येत आहे. लागलंय तिला!" चिऊ कळवळून विचारत होती.
चिऊ, चिमण्यांचे पंजे किंवा चोच इतकी मजबूत नसते की ते पिल्लाला उचलू शकतील. पण तू काळजी करू नकोस राणी, त्यांना थोडा वेळ दे. ते पिल्लाची नीट काळजी घेतील. थोड्या वेळाने पिल्लाला बरं वाटलं ना की तेच हळूहळू उडत आपल्या घरट्यात जाईल.
आणि खरंच! अगदी तस्संच झालं. चिऊची आई चिऊच्या जवळपास उडत राहिली. हळूहळू तिचा कर्कश आवाज बदलला. अधूनमधून प्रेमाने ती चिऊशी बोलू लागली. चिऊ पण आता शांत झाली होती. गप्प पडून होती. धडपडत नव्हती. रडत नव्हती. चिऊचा बाबा सारखा ये जा करत होता. कसला कसला खाऊ आणून चिऊला भरवत होता. चिऊ आता थोडी थोडी उडू लागली. ती खोलीतून बाल्कनीपर्यंत गेली. तिचा बाबा तिच्या बरोबरीने उडत होता. चिऊला जमेना तेव्हा त्याने चिऊला तिथेच बसायला सांगितलं. पुन्हा बाहेरून खाऊ आणून भरवलं.
थोड्या विश्रांतीनंतर चिऊ पुन्हा थोडं उडली. बाबा होताच सोबत! तीन चार तासांत, अंधार पडायच्या आत, चिऊ पोचलीसुद्धा तिच्या घरट्यात. "पाहिलंस ना चिऊ, बाबाने 'पिल्लु चिऊची' कशी नीट काळजी घेतली? बाबा असाच असतो बाळा, तो काही पिल्लांचं दुःख स्वतः घेऊ शकत नाही. पिल्लांना स्वतःच उडावं लागतं. पण बाबा कायम सोबत करतो. काळजी घेतो. कळलं का? झोपा आता." बाबा चिऊला थोपटत होता. आणि दोन्ही चिऊ, अर्धवट सजवलेल्या आपापल्या घरट्यांत, आपापल्या बाबांच्या कुशीत शांत झोपत होत्या.
- डाॅ. गौरी प्रभू
९०८२९०५०४५