सध्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा काळ सुरू आहे. पदवीधर झालेल्या विद्यार्थ्याला कुठे प्रवेश मिळणार, कागदपत्रे कधी पूर्ण होतील, याची चिंता पालकांना सतावतेय. अश्यावेळी पालकांनी 'ASK' हे अंगीकारल्यास पाल्याची करिअरची वाट योग्य दिशेने नक्की जाईल.
परदेशात किंवा राज्याबाहेर जाऊन शिकण्याची इच्छा असो, सीईटी परीक्षा असो, नववीची तयारी असो किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) काय आहे याची चिंता असो, प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती असते. यंदा NEP मुळे अनेक पालक धास्तावलेले आहेत.
'पालकत्व' म्हणजे केवळ जन्म देणे नाही, तर पालनपोषण, शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन करणे. पालक सदैव आपल्या पाल्यासाठी जागरूक असतात. साधारणपणे पालकांचे दोन गट आहेत: २००० पूर्वीची मानसिकता असलेले आणि २००० नंतरची मानसिकता असलेले. आधीचे पालक 'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' यावर विश्वास ठेवून मुलांना शिक्षकांच्या हवाली करत. दुसरी पिढी मात्र जास्त काळजीवाहू बनली. अर्ध्या टक्क्यासाठी शाळेत जाब विचारणारी, शिक्षकांनी मुलाला हात लावला तर पोलीस चौकीची पायरी चढणारी अशी ही पिढी. कायद्यानेही आता शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारण्यास मनाई आहे, ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अंतर निर्माण झाले आहे.
आधीच्या पालकांना इतका ताण नसायचा. मुलांना शाळेत पाठवले की, ते मोठे कधी झाले हे कळायचेही नाही. फीजही किरकोळ असायच्या. पण आता साध्या शाळा-कॉलेज-क्लासेसच्या फीज पाहून चक्कर येते. दुसरी पिढी यात भरडली गेली आहे आणि यात त्यांचा फार दोषही नाही. दोन्ही पिढ्या आपापल्या पद्धतीने बरोबर आहेत.
पण मुद्दा समजूतदार पालकत्वाचा आला की, परिस्थिती गुंतागुंतीची होते. आजची विद्यार्थी पिढी मोबाईल घेऊनच जन्माला आली आहे की काय, अशी भीती वाटते. करिअर समुपदेशनासाठी भेटणारे अनेक पालक 'मोबाईल!' हीच प्रमुख तक्रार करतात. मुलांना मोबाईल कसा वापरावा, त्याचा योग्य वापर कसा करावा यावर प्रशिक्षणच मिळालेले नाही. शाळांनी यावर ठोस कार्यक्रम आखायला हवेत.
मोबाईलमध्ये काय बघावे, काय बघू नये, गुगल सर्चचा प्रभावी वापर कसा करावा, युट्यूबवरील ज्ञानाचा खजिना कसा लुटावा, एआय (AI) कसे वापरावे यावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. शेवटी मुलांना वळण पालकच लावतात. पालकांनी शाळेत याविषयी आग्रह धरावा. आयपीएलमधील खेळाडू किंवा NEET/ JEE / IIT मध्ये चमकणारी मुले मोबाईलमुळे विचलित झाली नाहीत, कारण त्यांनी मोबाईलचा वापर ध्येयाच्या आड येऊ दिला नाही. मोबाईलचा वापर दोन प्रकारे होतो: संवाद, बँकिंग, ज्ञानवर्धन, मनोरंजन यांसाठी किंवा गेम्स खेळण्यासाठी. दुर्दैवाने, ८०% पिढी गेम्सना बळी पडली आहे.
घराघरातील संवाद हरवला आहे. कुटुंबातील सदस्य एकाच हॉलमध्ये बसून आपापल्या मोबाईलमध्ये रमलेले दिसतात. इथे पालकांची जबाबदारी सर्वाधिक आहे.
'तुला जे शिकायचं ते शिक' हे वाक्य पालकांची अक्षम्य चूक ठरू शकते. आंधळेपणाने संमती देण्याऐवजी, चोखंदळपणे पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. करिअर निवड हा गंभीर विषय आहे आणि पालकांची जबाबदारी १००% आहे. आपल्या मुला-मुलीचे शिक्षण आणि करिअर एकमेकांना पूरक आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. उदा. दहावीनंतर कॉमर्स, नंतर कॅड/कॅम, मग आयटी आणि नंतर बीएड असे विसंगत शिक्षण घेतल्यास नोकरी मिळणे कठीण होते. पालकांना हे कळत नसेल, तर जाणकारांचा सल्ला घ्यावा.
आपल्या पाल्याची क्षमता (Capacity) किती आहे, याचा विचारही पालकांनी करायला हवा. JEE किंवा NEET परीक्षेची क्षमता नसताना त्याकडे ढकलल्यास अपयश येते आणि इच्छेविरुद्ध शिक्षण घ्यावे लागते, ज्यामुळे एक 'बिनकामाचा ग्रॅज्युएट' तयार होतो. पालकांनी करिअरचा आराखडा तयार करावा आणि प्लान बी (Plan B) सुद्धा तयार ठेवावा. मुलांना विश्वासात घेऊन हे कार्य करावे. आपली अपूर्ण राहिलेली महत्त्वाकांक्षा मुलांवर लादल्यास मुले खचू शकतात.
पालकत्व फार महत्त्वाचे आहे. पालकांनी वेळोवेळी मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन म्हणतात, "You just have to ask." काहीही विचारा पण विचारा, याचा फार फायदा होतो. एखादी मदत मिळते, एखादा सल्ला मिळतो, एखाद्या परीक्षेची माहिती मिळते, एखादे पुस्तक हातात पडते – 'ASK' या शब्दात अनेक चमत्कारीक गोष्टी घडवण्याची क्षमता आहे. पालकांनी हे अंगीकारल्यास पाल्याच्या करिअरची वाट योग्य दिशेने नक्की जाईल.
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)
- अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा