माणसांप्रमाणेच प्राण्यांचा दुनियेतील बाप देखील आपल्या कुटुंबाप्रती किती संवेदनशील असतो व तो आपली जबाबदारी किती चोखपणे निभावतो हे या दिनानिमित्त आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
सामान्य माणसाला प्राणी साम्राज्याबद्दल असंख्य प्रश्न असतात. पण माणूस या प्रश्नांची उत्तरे यथार्थपणे शोधण्याचा प्रयत्न करतो का? माझ्या मते नाही. माणूस या प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्याचा जास्त प्रयत्न करत नाही. कालांतराने ह्या प्रश्नांमागचे प्रश्नचिन्ह हटून जाते व त्या जागेवर लागतो तो पूर्णविराम. आपल्याला पडलेले प्रश्न हे वस्तुस्थिती नसून ते प्रश्न आहेत हे माणूस विसरतो. यामुळे त्याच्या मनात प्राणी साम्राज्याबद्दल अनेक गैरसमज निर्माण होतात. कालांतराने हे गैरसमज अंधश्रद्धेमध्येही रुपांतरीत होऊ शकतात. याच अंधश्रद्धांमुळे कित्येक निष्पाप प्राण्यांना यातना भोगव्या लागतात तर कित्येक प्राण्यांचे बळी जातात. मग तुम्ही म्हणाल यावर उपाय काय? यावर एकच उपाय. प्राण्यांच्या दुनियेबद्दल लोकजागृती.
प्राणी साम्राज्याबद्दल सामान्य माणसाला असलेला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे 'पिता काय करतो'? त्यांच्या मते नर प्राणी किंवा बाप हा फक्त स्वतःच्या इच्छेनुसार/मर्जीप्रमाणे मादीसोबत मिलन करतो व पिलांची सगळी जबाबदारी मादीवर टाकून निघून जातो. पण हे पूर्ण सत्य आहे का? का हा सुद्धा जनमानसातील एक गैरसमज? आज १५ जून. बाबांचा दिवस म्हणजेच 'फादर्स डे'. माणसांप्रमाणेच प्राण्यांचा दुनियेतील बाप देखील आपल्या कुटुंबाप्रती किती संवेदनशील असतो व तो आपली जबाबदारी किती चोखपणे निभावतो हे या दिनानिमित्त आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
पक्षांच्या दुनियेत डोकावल्यावर तुम्हाला हेच चित्र पहायला मिळेल. उदाहरणार्थ धनेश पक्षी. धनेश किंवा होर्नबील पक्षांचा नर एक पिता म्हणून आपली जबाबदारी चोखपणे निभावतो. धनेश पक्षी मोठ्या झाडाच्या पोकळीत घरटे करतो. अन्नाची उपलब्धता आणि सुरक्षिततेनुसार मादी धनेश घरटे तयार करते. नंतर पाने, चिखल, झाडाची साल, लाळ, विष्ठा इत्यादीचा वापर करुन पिल्ले प्रौढ होई तोवर मादी स्वतःला घरट्यात बंद करुन घेते. अन्न आत घेण्यासाठी घरट्याला चोचीच्या आकाराचे भोक ठेवले जाते. ह्या भोकाद्वारे नर पक्षी मादीच्या चोचीतून कुटुंबाला अन्न पुरवण्याचे काम करतो. प्रजनन काळात नर पक्षी आपल्या मादी व पिल्लांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो.
धनेश एरवी बेरी आणि फळे खाऊन आपला उदरनिर्वाह करत असतो. पण वेळ पडल्यास आपले कुटुंब जगवण्यासाठी नर धनेश इतर लहान पक्षांचीही शिकार करु शकतो. ही परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा धनेशाला अन्नाची पर्यायाने फळांची कमतरता भासू लागते. प्रजनन काळात धनेश पक्षाचा आहार बदलू शकतो. फळांची अनुपलब्धता हे त्यामागचे मुख्य कारण. प्रजननाच्या काळात, पिल्ले प्रौढ होईपर्यंत मादी पूर्णपणे नर पक्षावर अवलंबून असते. पिल्ले प्रौढ झाल्यानंतर नर धनेश घरटे फोडून आपल्या कुटुंबाला बाहेर काढतो. प्रजनन काळात नर पक्षी मरण पावल्यास अन्नाच्या अभावी मादी व सोबत पिल्लांचाही मृत्यू होतो. ह्या उदाहरणावरून बाप नक्की काय काय करतो हे आपण समजू शकतो.
तसे पाहायला गेल्यास वाघांच्या बाबतीतही बरेच गैरसमज आहेत. बछड्यांची जबाबदारी ही पूर्णतः वाघिणीवर असते, बछड्यांचे संगोपन, त्यांना शिकार करायला शिकवणे, त्यांचे पालन पोषण सर्व काम मादीच करते. आपण कित्येकदा वन्यजीव विभागात ह्या गोष्टी टिव्हीवर बघतो व प्रश्न पडतो. पिल्लांना जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मूलभूत गोष्टी जर आई शिकवत असते तर मग पिता काय करतो?
नर वाघ आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करत असतो. फरक इतकाच की त्या गोष्टी वाघ मादी इतका बछड्यांच्या जवळ राहून करत नाही. म्हणून त्या पटकन आपल्या लक्षात येत नाहीत. थोडे वेगळ्या शब्दात मांडायचे झाले तर वाघ आपल्या पिल्लांच्या हितार्थ सारे काही करतो पण नजरे आडून. पण ते कसं? हे समजून घेण्यासाठी आपण अगोदर 'बिग कॅट' बद्दल थोडं जाणून घेऊ.
आंतरराष्ट्रीय संवर्धन संघटनेने नमूद केल्याप्रमाणे, वाघ झाडांवर मूत्राची फवारणी करुन किंवा पंजाने खोड ओरखडून आपल्या क्षेत्राची सीमा आखतो. वाघाने चिन्हांकित केलेल्या क्षेत्राची व्याप्ती सुमारे १०० चौरस किलोमीटर इतकी मोठी असू शकते. या क्षेत्रात ३ ते ४ वाघिणींचा समावेश असू शकतो. वाघाने चिन्हांकित केलेल्या जंगल प्रदेशाचे क्षेत्रफळ, बछड्यांना संरक्षण देण्याची क्षमता, त्याचा धडधाकटपणा यावरून वाघीण एखाद्या वाघाशी मिलन करायचे की नाही हे ठरवते. बछडा जन्माला आल्यानंतर त्याचे पालन-पोषण संगोपन वाघीण करते याचा अर्थ वाघ जबाबदारी धुडकावून लावतो असा होत नाही. बछड्यांना दुसऱ्या वाघांपासून संरक्षण देण्यासाठी तो सतत झटत असतो. मादी मरण पावल्यास तो बछड्यांची संपूर्ण जबाबदारी स्विकारतो हे सिद्ध करणारे उत्तम उदाहरण म्हणजे पन्ना व्याघ्र प्रकल्पातील P243 वाघोबा. P243 हा ह्या वाघाचा ओळख क्रमांक.
जून २०२१ मध्ये मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पातील एका गावाजवळ एका गायीला नर वाघाने मारल्याचे वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. वाघ संपूर्ण दिवस त्या परिसरातच होता पण त्याने त्या गायीला खाल्ले नाही. वाघाचे हे अनपेक्षित वर्तन पाहून व्यवस्थापनाने कारण शोधण्यासाठी ग्राउंड स्टाफ तैनात केला. वाघाने ज्या भागात गाय मारली होती तो चार वाघांच्या पिलांचा प्रदेश होता असे पथकाला आढळून आले. या बछड्यांनी महिन्यापूर्वी त्यांची आई गमावली होती. पित्यानेच त्या गायीला पिलांसाठी खाण्यासाठी सोडले होते. वाघिणीच्या मृत्यूनंतर नर वाघ आपल्या वर्तनात असाधारण बदल करून आपल्या पिलांची काळजी घेत असल्याचे या घटनेवरून दिसून आले. यावरुन बाबा काय करतात हे आपल्याला समजते.
वन्यसृष्टीत अशीही एक प्रजाती आहे ज्यात नर म्हणजे चक्क मुलांचे बाबा गर्भधारणा करतात. चकीत झालात ना? पण हे खरं आहे. ह्या प्राण्याला समुद्री घोडा किंवा 'सी होर्स' असे म्हणतात. मादी समुद्री घोडा नर समुद्री घोड्याच्या एका विशिष्ट अवयवांमध्ये अंडी घालते. या विशिष्ट अवयवाला 'ब्रुड पाऊच्' असे म्हणतात. मादीने घातलेल्या अंड्यांना नर समुद्री घोडा उबवतो व त्यांचे पालन पोषण करतो. बाबा नक्की काय करतात हे सांगणारं हे आणखी एक उदाहरण.
तुम्ही म्हणाल ही सगळी झाली वन्यजीवांची उदाहरणे. पाळीव प्राण्यांच्या बाबतीतही असंच असतं का? कारण आपल्या आजूबाजूला तर जास्त प्रमाणात श्वान किंवा मांजर असते. तर हो. पाळीव प्राण्यांच्या बाबतीतही पिता पिल्लांची काळजी घेतानाची उदाहरणे पहायला मिळतात. माणसाच्या दुनियेत असो किंवा प्राण्यांच्या, बाप बाप असतो. पाल्यांचे पालन-पोषण करणारी कुटुंबातीला जबाबदार व खंबीर व्यक्ती. बाहेरुन काटेरी पण आतून नरम, फणसासारखी.
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)
- स्त्रिग्धरा नाईक