शब्दसंपत्तीचा वारसा देणारे बाबा : आसावरी कुलकर्णी/परब

मी ही माझ्या कर्तृत्ववान बाबांच्या आनंदमयी जगण्याच्या कोशाचे, त्यांच्याच विचारांचे, स्वप्नांचे धागे विणून त्याचा विस्तार करीन. बापाच्या संपत्तीचा मुलींना अधिकार आहे. ही तर शब्दसंपत्ती वारसा हक्काने माझ्याकडे आली आहे.

Story: प्रेरक सर्जक |
15th June, 12:04 am
शब्दसंपत्तीचा  वारसा देणारे बाबा  : आसावरी कुलकर्णी/परब

“आम्ही पाचही भावंडे कागद आणि पेन या खेळण्यांसोबतच खेळत खेळत मोठे होत गेलो. न कळत्या वयापासून आम्ही आमच्या घरात पुस्तक वाचणाऱ्या... सतत लिहित राहणाऱ्या बाबांना बघतच वाढलो. बाबांनी माणसांवर प्रेम केले... भाषेवर प्रेम केले... त्यांनी साहित्यावर प्रेम केले. लेखन हा त्यांचा ध्यास होता. वाचन हा त्यांचा श्वास होता. आम्ही त्यांना असेच वेळ घालवत बसलेले कधीच बघितले नाही. त्यांनी स्वेच्छेने शिक्षकी पेशाची नोकरी सोडली आणि ते सातत्याने लिहिते झाले. त्यांचे हे वागणे अनेकांना वेडेपणाचे वाटले असावे. वेडेपणा असेलही कदाचित, परंतु ते ‘ध्येयवेड’ होते. त्यातून सकारात्मक, कृतिशील सर्जकतेची वाटचाल सुरू झाली होती. त्यांनी जाणूनबुजून स्वीकारलेले हे व्रत होते. कुणी त्यांच्यावर कधी लादले नव्हते, त्यांनीही आमच्यावर कधी लादले नाही. बायको, मुलींसमोर आदर्श ठेवत गेले आणि आम्ही त्यांचे अनुकरण करीत राहिलो.” आसावरी तिच्या बाबांसंदर्भात, म्हणजे सत्तरीस्थित साहित्यिक मोहन कुलकर्णी यांच्याविषयी भरभरून बोलत होती. बाबांच्या आठवणी किती सांगू आणि किती नको असे तिला झाले होते. लेखन-वाचनाचा वारसा तिला तिच्या बाबांकडून मिळाला आहे.

तिच्या बाबांचे बाबा, म्हणजे अनंत कुलकर्णी, हे स्वातंत्र्यसेनानी होते. ते बारा भाषांचे जाणकार होते. आपल्या मुलानेही भाषांचा अभ्यास करावा असे त्यांना मनोमन वाटत होते. भाषांवर प्रेम, अनुवादातून साहित्य निर्मिती, विविध भाषेतून प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचे डोळस वाचन याविषयीचा वारसा मोहन कुलकर्णी यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला होता. दहावीत असतानाच त्यांनी संपादन करायला सुरुवात केली. घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.

गोव्यात त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. गोमंतक विद्यालय, उसगाव, वास्को येथे त्यांनी विद्यादानाचे काम केले. गोवा राज्याचे माजी सभापती शंभू भाऊ बांदेकर यांच्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले. साहित्यिक कार्यक्रम कोठेही असला तरी, त्यांची उपस्थिती हमखास असायची. चांगले ऐकणे, सतत लिहिणे, वाचन करणे या त्यांच्या छंदांतून त्यांनी आपल्या कुटुंबालाही लिहिते केले. पत्नी नंदिनी आणि मुलींनी हा वारसा घेतला.

ज्योतिषशास्त्राचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्यात त्यांनी पदवी प्राप्त करून घेतली होती. त्यांच्या गोव्यातील सुरुवातीच्या वास्तव्यात ‘भारत के कोने कोने में’ हे पाक्षिक आर्थिक भार सोसून त्यांनी काढले. त्या काळी या पाक्षिकासाठी त्यांना मिझोरम, नागालँडमधूनही लेख आलेले होते. ते बहुभाषिक होते. विविध भाषेतील साहित्यकृतींचा अनुवाद ते करायचे. ‘साहित्य नंदनवन’, ‘शारदीय चंद्रकळा’ सारखी मासिके काढली. त्यात नवोदितांना प्राधान्य दिले. कविता, ललित लेखांचा अनुवाद केला. ‘कुलकर्णी प्रकाशन’ च्या माध्यमातून पुस्तकांची निर्मिती केली. घरात कुटुंब आणि साहित्यिक सुहृदयांना घेऊन साहित्यिक कार्यक्रम घडवून आणले. चर्चा, कविसंमेलन, वाचन, अनुवादाविषयीही मार्गदर्शन केले.

त्यांनी कशाचाही कधीच गाजावाजा केला नाही की, कोणाबद्दल कधी द्वेष, आकस बाळगला नाही. आत्ताच्या या डिजिटल काळातही ते ‘शारदीय चंद्रकळा’ साठी साहित्य पाठवण्याची विनंती पत्र पाठवून करायचे. त्यांची ही व्रतस्थ वृत्ती त्यांनी नेहमीच जगण्याच्या निरामय आनंदासाठी जपली. नृत्य, नाट्य, संगीताला वाहून घेतलेली घराणी असतात, तसेच मोहन कुलकर्णी यांचे सारे कुटुंब साहित्य, अनुवाद आणि इतर साहित्यिक उपक्रमांना वाहून घेणारे ठरले. त्यांनी ठरवले असते, तर स्वतःची कितीतरी पुस्तके प्रकाशित करू शकले असते. त्यांनी मोजकीच पण काही ठळक पुस्तके अनुवादित केली आणि स्वतःच्याही पुस्तकांचे प्रकाशन केले. त्यात ‘विश्वविख्यात कथा’ (भाग १, २, ३), ‘हाइकू’ हा त्यांचा स्वतःचा कवितासंग्रह, ‘रंगतरंग’, ‘उंबरफुले’ तसेच कालिदासाच्या ‘मेघदूत’ या कलाकृतीचाही साध्या, सोप्या, सर्वसामान्यांना कळणाऱ्या भाषेत अनुवाद केलेला आहे.

संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांना विज्ञानाची आवड होती. गणित हा त्यांचा अत्यंत जवळचा विषय. आर्थिक भार सोसणार नाही म्हणून त्यांना विज्ञान शाखेतून प्रवेश घेणे जमले नाही; मात्र असे असतानाही, शाळेत शिक्षक म्हणून काम करताना विज्ञानाचे सर्व विषय ते शिकवायचे. गणितात ते तज्ञ होते. त्याचा उपयोग त्यांनी 

विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी केला. संसाराचे आर्थिक गणित मात्र लेखन-वाचनातून आयुष्यभर जुळवत राहिले.

सेवानिवृत्तीनंतर पहाटे उठून नित्यकर्म आटोपून वर्तमानपत्रे घेऊन येणे, पत्नीला स्वयंपाकात मदत करणे आणि उरलेल्या दिवसांत रात्रीच्या झोपेची वेळ टाळून लिहायचे... वाचायचे...साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहायचे, एवढेच नाही तर निसर्गभ्रमंतीही करायचे. त्यांचा स्वभाव नर्मविनोदी, मिश्किल होता; व्यक्तिमत्त्वात निर्मळ विनोदाची छटा होती. कोणाविषयीही मनात आकस नव्हता. जे वाटायचे ते स्पष्टपणे सांगायचे. कधी कोठे बाहेरगावी गेले तर मुलींना पत्र लिहून पाठवत. त्यात 'दिसामाजी काहीतरी लिहिण्याची' सक्ती असायची. लिहिण्यासाठी काही विषय दिलेले असायचे. “दिसामाजी काहीतरी लिहायचे” ही समर्थांची उक्ती त्यांनी आपल्या जगण्याचा भाग बनवली होती आणि कुटुंबातही उतरवली होती. पत्नी लिहिती झाली... मुलींचे लिखाण नावारूपाला आले. थोरली मुलगी आसावरी त्यांचाच वसा आणि वारसा पुढे चालवत आहे. वडिलांना विज्ञानाची पदवी घेता आली नाही, पण आसावरीने मात्र विज्ञान शाखेतून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेतले. तिने संशोधनात रस घेतला. निसर्ग, माणसे, सभोवतालाकडे बघण्याची सूक्ष्म दृष्टी तिला लाभली. तिने ती विकसितही केली.

त्यांनी आपल्या एकाही मुलीवर कधीच स्वतःचे विचार लादले नाहीत. त्यांनी मुक्तपणे वाढावे, लिहावे, वाचावे म्हणून वातावरणनिर्मिती केली. मुलगी आसावरी म्हणते, “कुलकर्णी प्रकाशनाचे कार्य मला पुढे न्यायचे आहे. त्यांची स्वप्ने मला पूर्ण करायची आहेत. त्यांच्यासारखे सातत्य, व्यासंग माझ्यात आणायचा आहे. खूप कठीण आहे खरे, पण अशक्य नाही. बाबा माझी लेखनप्रेरणा होते, माझी वाचनऊर्जा होते. बाबा वास्तव रूपात सोबतीला नाहीत, पण ते माझ्या शब्दात, विचारात आहेत. त्यांनी मला लेखन वसा दिला, जो मला जीवनात उभारी घ्यायला निश्चित मदत करील. बाबांना पेन व पेपर उशीला घेऊन झोपायची सवय होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ती जोपासली. त्यांना स्वप्ने पडायची. रात्री-अपरात्री ती स्वप्ने ते पेपरवर लिहायचे, अशी कितीतरी स्वप्ने त्यांनी वहीत लिहून ठेवली होती. त्या वहीतील स्वप्ने माझ्या डोळ्यांत त्यांनी अनुभवली होती. माझ्यावर त्यांचा विश्वास होता. कोणाविषयीही मनात आकस न बाळगता ते स्वतःच्या धुंदीत जगले. अनुवादाचे एवढे मोठे काम केले, तसेच स्वतःच्या बहुभाषिक असण्याचीही कधी जाहिरात केली नाही. जीवनातील निखळ आनंद शोधण्यासाठीच त्यांनी लेखन-वाचन केले. ते तृप्त 

झाले. समाधानाने कुटुंबीयांना निरोप देऊन गेले. मीही माझ्या कर्तृत्ववान बाबांच्या आनंदमयी जगण्याच्या कोशाचे, त्यांच्याच विचारांचे, स्वप्नांचे धागे विणून त्याचा विस्तार करीन. बापाच्या संपत्तीवर मुलींना अधिकार आहे. ही तर शब्दसंपत्ती वारसा हक्काने माझ्याकडे आली आहे. त्यांची स्वप्नांची वही माझे वास्तव असेल... त्यादृष्टीने वाटचाल करीन...”

(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)


पौर्णिमा केरकर