चित्रपटांतील वडिलांची भूमिका आता केवळ कथेचा भाग नसून, सामाजिक बदल, कौटुंबिक मूल्ये आणि नात्यांच्या गुंतागुंतीचे ती आरसा बनली आहे.
“बाबा, तुम्ही जर का ब्रम्हगिरीला गेलात न, जिथे गोदावरी उगम पावते तिथे. तिथून जर का तुम्ही एक फूल सोडलंत तर ते खाली त्र्यंबकेश्वरला येईल. ते तिथून वाहत वाहत सोमेश्वरला येईल आणि तिथून मग ते नवश्या गणपतीला जाऊन मग आपल्या घाटावर येईल. आणि आपल्या घाटावरनं ते पुढे कुठे कुठे जात ते समुद्राला मिळेल. म्हणजे काय? तर ते फूल परंपरेनं पुढे पुढे जाईल. आता हे बघा... की आबांकडून आजोबांकडे, आजोबांकडून तुमच्याकडे आणि तुमच्याकडून माझ्याकडे जे येतं त्याला परंपरा म्हणतात...” ‘गोदावारी’तल्या निशिकांतच्या म्हणजेच नायक जितेंद्र जोशीच्या मुलीच्या तोंडी असलेला हा संवाद. परंपरेच्या विरुद्ध पोहू इच्छिणाऱ्या बापाशी त्याच्या लहानग्या मुलीचा झालेला हा संवाद.
मराठी काय किंवा हिंदी काय... चित्रपट म्हटले की नायक नायिकांसोबतच महत्त्वाचे असतात ते त्यातले कुटुंब म्हणून येणारी पात्रं. यात आई वडील तर येतातच. काही चित्रपट मात्र विशेष करून या ‘बाप’ संकल्पनेलाच मध्यवर्ती ठेवून त्याभोवती गुंफलेले दिसतात. जुन्या काळासोबत नवीन काळातल्या अलीकडच्या चित्रपटांमध्ये ‘बाप’ ‘बाबा’ हे पात्र वेळोवेळी काळाप्रमाणे, आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे बदलत जाताना दिसतात. १९६० मधला ‘मुघल ए आझम’ मधला अकबर हा बाप म्हणून रसिकांच्या मनात कायम राहिला तो आपल्या पुत्राच्या-सलीमच्या प्रेमाच्या (अनारकलीच्या) विरुद्ध पेटून उठलेला, शाही प्रतिष्ठा आणि मुलाचे प्रेम याच्यात भावनेपेक्षा कर्तव्य आणि वंशाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देणारा म्हणून. या चित्रपटामुळे साध्या गल्लीतल्या प्रेमवीरांना सुद्धा आपल्या प्रेमाला विरोध करणारा आपला बाप अकबर वाटून ‘जब प्यार किया तो डरना क्या’ च्या गाण्याने तो एक काळ गाजला.
त्यानंतर १९७५ मधल्या ‘दिवार’ चित्रपटामुळे तर अमिताभ बच्चनच्या “मेरा बाप चोर है” च्या कलंकात बाप म्हणजे फक्त पिता नसून, ते आदर्श, प्रामाणिकपणा आणि त्यावरील व्यवस्थेचा आघात यांचे प्रतीक दाखवले गेले. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटाला आलेला यातला बाप मात्र चित्रपटभर त्याच्या अनुपस्थित सुद्धा विजयच्या (अमिताभ बच्चन) व्यक्तिमत्त्वावर झालेल्या खोलवर परिणामांमुळे स्वतःची उपस्थिती बिंबवून गेला. त्यांच्यामुळेच तर विजयच्या मनात 'दीवार' (भिंत) उभी राहते – जी त्याला समाजात स्वीकारल्या न जाण्याच्या भावनेपासून, अपमानाच्या जखमांपासून आणि पर्यायाने स्वतःच्या भावापासूनही वेगळी करते.
मराठी सिनेमांच्या सुरुवातीच्या काळात वडील हे घराचे आणि समाजाचे आधारस्तंभ म्हणून दाखवले जायचे. त्यांचा शब्द अंतिम मानला जाई. ते कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी आणि नैतिक मूल्यांसाठी ठाम असायचे. मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचे सर्व महत्त्वाचे निर्णय तेच घेत असत. अनेकदा ते कठोर वाटत असले तरी, त्यांच्या कृतीमागे कुटुंबाचे कल्याण हाच मुख्य हेतू असे. व्ही. शांताराम यांच्यासारख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये किंवा जुन्या कौटुंबिक चित्रपटांमध्ये असे वडील त्याग करणारे, कर्तव्यनिष्ठ आणि कुटुंबव्यवस्था जपण्याची जबाबदारी उचलणारे असत.
१९९० च्या दशकात ग्लोबलायझेशन आणि आर्थिक उदारीकरणामुळे भारतीय कुटुंबांमध्ये बदल होऊ लागले. वडिलांची भूमिका पूर्णपणे बदलली नसली तरी, त्यांना मुलांच्या भावना समजून घेताना आणि काहीवेळेस त्यांच्यापुढे झुकताना दाखवले जाऊ लागले. १९९५ सालातल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधल्या अमरीश पुरींनी रंगवलेल्या चौधरी बलदेव सिंग या नायिकेच्या बापाचे पात्र या बदलाचे उत्तम उदाहरण आहे. सुरुवातीला अत्यंत पारंपरिक आणि मुलीच्या (सिमरन) परदेशी प्रियकराला (राज) विरोध करणारा बाप, जो अखेरीस “जा सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी” असे म्हणत आपल्या मुलीच्या प्रेमासाठी आपल्या परंपरेवर मात करतो. हा संवाद हिंदी सिनेमातील वडिलांच्या भूमिकेतील एका मोठ्या बदलाचे प्रतीक बनला. त्याचप्रमाणे राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटांमध्ये या काळात बापाची भूमिका करणारे आलोकनाथ अनेक चित्रपटांमधल्या 'संस्कारी बापूजी'मुळे प्रेमळ, समजूतदार आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारे वडील म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या भूमिकांमध्ये कठोरता असली तरी, मुलांच्या आनंदाला प्राधान्य देण्याची वृत्ती दिसून आली.
या दशकात मराठी समाजात काही प्रमाणात शहरीकरण आणि आर्थिक बदल झाले. याचे प्रतिबिंब चित्रपटांतील वडिलांच्या भूमिकेतही दिसू लागले. वडील अजूनही कुटुंबप्रमुख असले तरी, ते मुलांच्या नव्या विचारांना आणि आकांक्षांना काही प्रमाणात समजून घेऊ लागले. कधीकधी त्यांना परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संघर्षही पेलावा लागे. मध्यमवर्गीय कुटुंबांवर आधारित चित्रपटांमध्ये असे वडील दिसू लागले, जे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा चांगल्या भविष्यासाठी आर्थिक आणि भावनिक संघर्ष करताना दिसले. राजा गोसावी, रमेश देव, शरद तळवलकर, अशोक सराफ किंवा सचिन पिळगावकर यांनी काही चित्रपटांमध्ये अशी प्रतिमा साकारली आहे, जे विनोदी असले तरी प्रसंगी गंभीर आणि समजूतदार भूमिका घेत असत.
२००० नंतर चित्रपटांतील वडिलांची भूमिका लक्षणीय बदलली. ते आता फक्त आज्ञा देणारे नाहीत, तर मुलांचे मित्र, स्वप्नपूर्तीचे साथीदार आणि आयुष्याचा आनंद लुटणारे बनले आहेत. मराठी चित्रपटांमध्येही ही भूमिका अधिक वास्तववादी झाली आहे. वडील मुलांना पाठिंबा देऊन त्यांच्या स्वप्नांना पंख देत आहेत. पिढ्यांमधील संवाद अधिक मोकळा झाल्याने अंतर कमी होत आहे, आणि 'बाप' हे पात्र परंपरा व आधुनिकता यांचा समन्वय साधताना दिसत आहे.
२००० नंतरच्या चित्रपटांमध्ये वडिलांनी आपल्या पारंपरिक चौकटी मोडून मनाचे कप्पे उघडले. (२००१) 'कभी ख़ुशी कभी यशवर्धन रायचंद सुरुवातीला कठोर असले तरी, शेवटी प्रेमाने मुलाला स्वीकारतात, नात्यातील गोडवा अधोरेखित करतात. २००३ सालच्या 'बागबान' मधील राज मल्होत्रांनी मुलांसाठी सर्वस्व देऊनही मिळालेली उपेक्षा मनाला भिडते, आईवडिलांच्या त्यागाची आठवण करून देते. (२०१५) 'पीकू' मधील भास्कर बॅनर्जी आपल्या मुलीच्या स्वातंत्र्याचा आदर करणारे, मित्रत्वाचे नाते जपणारे, आधुनिक वडील दिसतात. विशेष म्हणजे या तीनही कालखंडात अमिताभ बच्चन यांनी हे पत्र अतिशय सुंदर रंगवले. (२०१६) 'दंगल' मधील महावीर सिंग फोगट कठोर प्रशिक्षणातून मुलींच्या स्वप्नांना पंख देतात, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतात. हे सर्व बाप वेगवेगळ्या रूपांत असले तरी, त्यांच्या कृतीतून मुलांवरील नितांत प्रेम आणि त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी दिसून येते, जे प्रेक्षकांच्या मनाला कायम स्पर्शून जाते.
मराठी चित्रपटांमध्ये 'बाप' या पात्राची मांडणी अधिक सखोल झाली आहे. 'नाळ'मधील नागराज मंजुळे यांनी साकारलेले वडील रक्ताच्या नात्यापलीकडील निःस्वार्थ प्रेम आणि स्वीकारार्हता दाखवून, प्रेमावर आधारित नात्याची खरी व्याख्या उलगडून सांगतात. याउलट, 'गोदावरी'तील नीलकंठ देशमुख हे पारंपरिक विचारांवर ठाम असले तरी, बदलत्या काळाशी आणि मुलाच्या आधुनिक विचारांशी त्यांचा संघर्ष, वारसा आणि परंपरा यावर भाष्य करतो.
'नटसम्राट', 'व्हेन्टिलेटर' यांसारख्या अनेक चित्रपटांनी 'बाप' हे पात्र अजरामर केले आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील ताण, मुलांच्या आकांक्षांचा आदर आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याची धडपड हे विषय आता अधिक मानवी आणि वास्तववादी पद्धतीने मांडले जात आहेत. थोडक्यात, चित्रपटांतील वडिलांची भूमिका आता केवळ कथेचा भाग नसून, सामाजिक बदल, कौटुंबिक मूल्ये आणि नात्यांच्या गुंतागुंतीचे ते आरसा बनले आहे.
- स्नेहा सुतार