तो दिवस, तो क्षण, जेव्हा पप्पा खाली कोसळले, तो नीतूच्या आयुष्यात एक महत्त्वाचा धडा शिकवून गेला होता. त्या घटनेने तिला तिच्या जबाबदारीची जाणीव करून दिली होती. एकुलती एक लाडाची लेक असली तरी, प्रसंगी ठाम उभे राहावे आणि कुटुंबाला आधार द्यावा, हे तिला उमगले होते.
मे महिन्याची सुट्टी चालू होती. नीतू गॅलरीत कपडे वाळत घालत होती. नीतू ही अकरावीत शिकणारी सोळा वर्षांची मुलगी. दिनेश व रितिका यांची लाडाची ही एकुलती एक लेक होती. वडिलांची ती खूपच लाडाची होती. वडिलांच्या लाडामुळे अगदी हट्टी स्वभावाची होती. तिचे बाबा तिचे प्रत्येक हट्ट आणि हौस पुरवत होते. आज पण नीतूच्या पप्पांनी विचारले, "बाय, आज कुठले मासे आणूया गं?" नीतूने सांगितले, "पप्पा, कोळंबी आणा!" आई म्हणाली, "हो, पण अहो, आधी चहा तरी घ्या. चहा-चपाती खाऊनच निघा." "नको गं, नंतर मासे संपतात," असे म्हणत ते निघाले. पायऱ्या उतरून खाली आले आणि स्कूटरला किक मारू लागले. एवढ्यात, "आssई गं...!!!" असा मोठ्याने आवाज झाला आणि छातीवर हात धरत पप्पा खाली कोसळले. नीतू, "पप्पा, पप्पा!" ओरडत खाली आली. आई पण धावत आली व रडू लागली.
दोघेही हंबरडा फोडून रडू लागले. आवाज ऐकून शेजारचे काका-काकू आले. "पुन्हा चक्कर आली असेल," म्हणत पाणी दिले, पण पप्पा शुद्धीवर येईनात. आई पण एकदम सुन्न झाली होती. नीतू धावत गेली, ...म्बुलन्सला फोन लावला. पप्पांना एकच कळ आली व ते पडले, एवढेच तिला माहीत होते. कसेबसे पप्पांना हॉस्पिटलमध्ये नेले. आई सोबत होतीच, पण तीही पूर्णपणे हादरलेली. काय करावे, काय नाही हेच तिला कळत नव्हते. तिचे तर हातपायच थंड पडलेले. एखाद्या रोबोटसारखी ती शून्य भावनेने इकडे-तिकडे करत होती. काय होईल आणि काय नाही या विचाराने तिला कापरेच भरले होते.
नीतूने तर असा भयानक प्रसंग कधीही पाहिला नव्हता. तिने तर कधी विचारही केला नव्हता की बाबांच्या बाबतीत असे काहीतरी बघावे लागेल. त्या दोघींना हॉस्पिटलचा काही अनुभवही नव्हता. नीतूला पप्पांना बरे झालेले पाहायचे होते. डॉक्टरांनी रिपोर्ट केले व पप्पांना हार्ट अटॅक आल्याचे सांगितले. पप्पांना अतिदक्षता विभागात (ICU) नेले. डॉक्टरांनी उद्याच ताबडतोब ऑपरेशन सांगितले होते. पैशांची जमवाजमव करण्यासाठी कुणीतरी घरी जाणे आवश्यक होते. आई त्यासाठी घरी गेली. नीतू मात्र पप्पांसमोर बसून, 'माझ्याच पप्पांना असे का झाले? त्यांनी कुणाचे काय वाईट केले होते?' असा विचार करू लागली. तिच्या मनात आपण किती हट्टीपणाने वागतो, आपण पप्पांना खूप त्रास देतो, याची जाणीव होत होती.
नीतूला आता फॉर्म भरायला, औषधे-रिपोर्ट आणायला, डॉक्टर्स किंवा नर्सशी बोलायला हळूहळू जमत होते. नीतू हॉस्पिटलमध्येच असलेल्या गणपतीच्या मूर्तीसमोर गेली व साकडे घालू लागली, "हे देवा, माझे अर्धे आयुष्य माझ्या पप्पांना दे, पण त्यांना लवकर बरे कर." रात्रीचे साडेआठ वाजले. पप्पांना आता जरा बरे वाटू लागले. नीतूने त्यांचा हात पकडला. त्यांनी नीतूला एवढेच सांगितले, "मला काही झाले तर मम्मीची काळजी घे." नीतूने त्यांना हात पकडून वचन दिले. नीतूने शहाण्याप्रमाणे होकार देत पप्पांच्या डोक्यावरून हात फिरवला. आज जणू छोटी असूनसुद्धा ती मोठी झाली होती. स्वतःला सावरून आईला सावरायचे तिने ठाम केले. पुढे काय होणार याचा सामना करायची हिम्मत तिच्यात होती.
रात्रभर नीतूला झोपच लागली नाही. पप्पांच्या छातीला लावलेल्या तारा, त्यांना दिलेले सलाईन, त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना... हे सारं तिच्या डोळ्यासमोरून सरकत नव्हतं. पहाटे कधीतरी तिला डोळा लागला, पण ऑपरेशनची वेळ जवळ येत होती तसतशी तिची धाकधूक वाढत होती. सकाळी आई परत आली. तिने कळालेली, सुजलेली नीतूची अवस्था पाहिली आणि तिला जवळ ओढून घेतले. "काळजी करू नकोस बेटा, सगळे ठीक होईल," असे ती म्हणाली, पण तिच्या आवाजातील कंप नीतूने ऐकला. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर दोघीही चिंतेने बसल्या होत्या. प्रत्येक मिनिट युगासारखे वाटत होते. नीतूने गणपतीचे नाव घेतले, देवाला पुन्हा एकदा आर्त विनवणी केली.
जवळपास चार तासांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव वाचण्याचा नीतू आणि आई प्रयत्न करत होत्या. "ऑपरेशन यशस्वी झालं आहे," डॉक्टर म्हणाले. "चिंता करण्याचं कारण नाही, पण अजून २४ तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवावं लागेल. पुढेही काळजी घ्यावी लागेल." हे ऐकताच नीतू आणि आईने सुटकेचा निःश्वास टाकला. नीतूच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने आईला घट्ट मिठी मारली. पप्पांना बाहेर आणले जात असताना, नीतूने त्यांच्याकडे पाहिले. ते अजूनही बेशुद्ध होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरची ती वेदना आता नव्हती.
पुढचे काही दिवस नीतूने पप्पांची खूप काळजी घेतली. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती लक्षपूर्वक ऐकत होती आणि त्याची नोंद ठेवत होती. औषधे वेळेवर देणे, त्यांची पथ्ये सांभाळणे, त्यांची विचारपूस करणे, अगदी बारीक-सारीक गोष्टींचीही ती काळजी घेत होती. तिच्या हट्टी स्वभावाची जागा आता जबाबदार आणि समजूतदार वृत्तीने घेतली होती. पप्पांनाही तिचे हे बदललेले रूप पाहून आनंद होत होता. "माझी नीतू आता मोठी झाली आहे," ते हळूच हसून म्हणाले. "हो पप्पा, तुमच्यासाठी मी काहीही करेन," नीतूच्या डोळ्यात पाणी तरारले. तिला आता जाणीव झाली होती की, खरे प्रेम हे हट्ट पुरवण्यात नाही, तर एकमेकांची काळजी घेण्यात आणि सोबत उभं राहण्यात असतं.
पप्पा हळूहळू बरे झाले आणि घरी परतले. नीतू आता त्यांच्याशी बोलताना, वागताना अधिक काळजी घेत होती. तिने स्वतःच ठरवले होते की, ती आता पप्पांना त्रास देणार नाही. तिने त्यांच्या आरोग्याची जबाबदारी जणू आपल्या खांद्यावर घेतली होती. पप्पांच्या सकाळी फिरायला जाण्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, नीतू प्रत्येक गोष्टीची आठवण करून देत होती. आईलाही नीतूच्या या बदलामुळे खूप आधार मिळाला होता.
तो दिवस, तो क्षण, जेव्हा पप्पा खाली कोसळले, तो नीतूच्या आयुष्यात एक महत्त्वाचा धडा शिकवून गेला होता. त्या घटनेने तिला तिच्या जबाबदारीची जाणीव करून दिली होती. एकुलती एक लाडाची लेक असली तरी, प्रसंगी ठाम उभे राहावे आणि कुटुंबाला आधार द्यावा, हे तिला उमगले होते. नीतूच्या चेहऱ्यावर आता पूर्वीचा तो हट्टीपणा नव्हता, तर त्याजागी एक शांत, समजूतदार भाव आला होता. तिच्या मनात पप्पांबद्दलचे प्रेम आणि आदराची भावना अधिकच दृढ झाली होती. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात, ज्या आपल्याला आतून बदलून टाकतात आणि त्या बदलांची जाणीवच आपल्याला अधिक
मजबूत बनवते. नीतूच्या आयुष्यात ती 'जाणीव' तिच्या पप्पांच्या आजारपणातून आली होती आणि तिने तिला खऱ्या अर्थाने 'मोठं' केलं होतं.
- श्रुती नाईक परब