संगीत नाटकात काम करणाऱ्या अनेक नाट्य कलाकारांना तबल्याची साथसंगत थळीमामांची लागत असे. बाबा तालमींसाठी सावईवेरे येथील पै रायकरकडे जात. पै रायकर कुटुंबियांनी त्यांच्यावर त्यांच्यातील तबला कलेवर नितांत प्रेम केलं.
माझे बाबा मनोहर उर्फ मोनू म्हणून परिचित होते. पण इतर सर्व व्यवहारात त्यांचं पुरूषोत्तम हे नाव लिहिलं जातं. कदाचित ते त्यांच्या वाडवडिलांचं त्यांना ठेवलं असावं. आमची कुलदेवता श्री महालक्ष्मी कोरगांव पेडणे. तिथं अजूनही आम्ही जातो तेव्हा कोण तरी वृध्द आजोबा विचारतो – “हो कोणाचो झील मोनूचो रे...” झील म्हणजे सुपूत्र.
आमचं घर चोडण बेटावर. पण वडिलांची कर्मभूमी मडगांवला गेली. माझं बालपण आजोळला गेलं. वडिलांनी संगीत कलेचा वसा आपले वडील गंगाराम यांच्याकडून घेतला होता. माझे बाबा त्या काळात एक उत्कृष्ट तबलापटू होते. त्या काळात गोव्यात भजन कार्यक्रम, संगीत कार्यक्रम यासाठी तबलापटू मिळतच नव्हते. आणखीन एक जबरदस्त तबलावादक होते ते नंदकुमार पर्वतकर. ते माझ्या बाबांना फार आदर देत.
मडगांवला एकदा खाप्रुमाम पर्वतकर स्मृती पुण्यतिथी होती. तिथं तबलावादनाचे कार्यक्रम होते. खूप सुंदर व आकर्षक आयोजन होतं. संस्मरणीय असं.
यशवंतराव केरकर या महान तबलावादनाचं दर्शन तिथं घडलं. ते फोंडा तालुक्यातील केरी गावचे. त्यांनी जे तबला वादन केलं ते अजून कानात आहे. शास्त्रशुद्ध व लयकारीचं पक्कं गणित त्यांनी लिलया खेळल्यागत सहजतेनं सादर केलं. सादर करण्याआधी ते खूप वेळ पोतडीतून एकेक फोटो काढून त्या फोटोकडे टक लावून काही पुटपुटत होते. मी वडिलांना विचारले, ते काय करतात. ते मुंबईला तबला शिकले आहेत. ज्या ज्या गुरूंकडे शिकले त्यांना वंदन करतात, स्मरण करतात, समर्पित भावनेने आपलं वादन सादर करतात. तिथं अनेक तबलावादक होते. गोव्याचे व मुंबई, कर्नाटकातील. लयकारीचे संस्कार व गुरू-आज्ञेचे माझ्यावर संस्कार झाले ते असे.
संगीत नाटकात काम करणाऱ्या अनेक नाट्य कलाकारांना तबल्याची साथसंगत थळीमामांची लागत असे. त्यातीलच एक प्रस्थ म्हणजे सावईवेरेचे व्यंकटेश पै रायकर. यांचा अऩंत देवस्थानातील वसंत पूजा सोहळा पंचक्रोशीत गाजलेला – नाटकांसाठी खास मुंबईतील अभिनेत्री येत. माझे बाबा तालमींसाठी सावईवेरे येथील पै रायकरकडे जात. पै रायकर कुटुंबियांनी त्यांच्यावर त्यांच्यातील तबला कलेवर नितांत प्रेम केलं.
याच कुटुंबातील निवृत्त न्यायाधीश व वकील उल्हास पै रायकर हे माझ्या बाबांच्या तबल्याचे चाहते. अजून त्यांच्या गोड हाताची ते आठवण काढतात. तबल्यात लग्गी नावाचा एक प्रकार असतो. पाकीजा चित्रपटात निझामुद्दीन खान यांनी काही गाण्यांना साथ दिली आहे. त्यातील लग्गी आणि तुझ्या बाबांची लग्गी यातील वजन कमालीचं स्वच्छ, लयदार असं ते मला कायम सांगतात. शिरोडा कामाक्षी देवीच्या पालखीच्या वेळी पेणी असतात तेव्हा तुझ्या बाबांनी जो पखवाज वाजवला तो अप्रतिम अशा अऩेक आठवणी ते काढतात. वास्को सप्ताहाला गायक मनोहरबुवा शिरगांवकर व रामनाथ मठकर, पेटीवादक मुकुंदराव मडकईकर यांना त्यांनी दिलेली साथ मी विसरू शकत नाही. माझे बाबा डावखुरे होते. फक्त तबला वादनापुरते. एरव्ही ते उजव्या हाताने लिहिणारे. त्यांचं अक्षर खूपच सुंदर होतं. गोलाकार. बीजगणित चांगलं होतं. वाहनं चालवणं व वाहनांची तात्काळ दोष शोधून दुरूस्ती यातही ते तरबेज होते. त्यांचं पी आर म्हणजे जनसंपर्क छान होतं. बोलणी करताना, चर्चा करताना काही मुद्दे पटवून देण्याची कला त्यांच्या ठायी होती. त्यांच्यापेक्षा मोठी एक बहीण होती ती मुंबईला होती. बाकी सगळे भाऊ लहान. हे भाऊ त्यांना भाऊ म्हणत. बाबांचा क्रोध मोठा स्फोटक असे. माझ्या धाकट्या बहिणीला नंदिनीला बाबांनी पौराणिक कथा सांगितल्या त्याची ती आठवण काढते. खास करून भक्त प्रल्हादाची कथा ते रंगवून सांगत.
फादर्स डे निमित्ताने त्यांना श्रध्दांजली.
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)
- मुकेश थळी