सीताराम, म्हणजेच आमचे लाडके 'दादा', हे खाजने गावाचे भूषण होते. दोन वर्षांचे असताना पितृछत्र हरपले, तरी त्यांनी नियतीशी दोन हात केले. गवंडीकाम, समाजसेवा आणि कुटुंबावर केलेल्या संस्कारातून त्यांनी आदर्श निर्माण केला, ज्याची साक्ष त्यांची यशस्वी पिढी देते. त्यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त हे विनम्र अभिवादन!
सीताराम हे माझ्या वडिलांचे पाळण्यातले नाव. मात्र, आम्हा सात भावंडांचेच नव्हे, तर आमच्या खाजने गावच्या पंचक्रोशीत ते ‘दादा’ या नावानेच सुपरिचित होते. आमचे मूळ गाव केरी, पेडणे. पण आमचे वडील दोन वर्षांचे असताना आजोबा ‘लाडू’ यांचे अपघाती निधन झाल्याने आमची आजी ‘अबिकी’ आपल्या माहेरी, खाजने गावात भावांच्या आश्रयाला आली. आजीने बरेच काबाडकष्ट करून आपल्या मुलाला वाढवले आणि १५-१६ वर्षांचा झाल्यावर भावांच्या मुलांबरोबर गवंडीकाम करण्यासाठी तेव्हाच्या दुबईत म्हणजे साष्टी तालुक्यात धाडले. जात्याच हुशार असलेल्या आमच्या दादाने अल्पावधीत कौशल्य प्राप्त करून नावलौकिक व थोडाफार पैसा कमावला.
साष्टी तालुक्यात काम करताना एका रात्री मडगावहून रायतुरला सायकलने जाताना पाकल्यांनी घोगळ परिसरात अडवले. ते पोर्तुगीज भाषेतून प्रश्न विचारू लागले, तेव्हा "नाव फाल्हार पोर्तुगेज" (मला पोर्तुगीज समजत नाही) असे धाडकन उत्तर दिले. आपले उत्तर ऐकून ते आपल्याला जाऊ देतील असे दादाला वाटले होते. पण प्रत्यक्षात भलतेच घडले. आपल्याला पोर्तुगीज भाषा समजत नाही असे लगेच उत्तर देणाऱ्या या तरुणाला पोर्तुगीज भाषा अवगत आहे आणि तो आमची मस्करी करतो असा गैरसमज झाल्याने त्या पाकल्यांनी दादाला बदडून काढले. तेवढ्यात दादाला ओळखणारा एक स्थानिक भाटकार तिथे पोहोचला आणि दादाची अटक टळली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एखादा पाकला भेटला तर "नाव फाल्हार पोर्तुगेज" म्हणजे 'मला पोर्तुगीज येत नाही' असे सांगायचे हा कानमंत्र त्याच भाटकाराने दादाला दिला होता.
भाटकाराच्या मध्यस्थीमुळे दादाची पोलीस कोठडी चुकली. विधिलिखित कोणीच बदलू शकत नाही, याचे प्रत्यंतर दादांना काही वर्षांतच आले. दिवस पावसाचे होते. दादा काही कामानिमित्त पोरसकडे येथे तेरेखोल नदीकाठी गेले असता त्यांना नदीत एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी ही गोष्ट स्थानिक रेजिदोराच्या कानावर घातली. त्यांनी ही खबर पेडणे पोलिसांपर्यंत पोहोचवली. काही वेळातच पोर्तुगीजांची एक जीप आली. नदीकिनारी डोकावून पाहिले तर मृतदेह कुठे दिसला नाही. पोलिसांना वाटले दादाने मस्करी केली. त्यांनी दादाला उचलून जीपमध्ये कोंबले आणि पेडण्याला नेऊन तुरुंगात डांबले. दुसऱ्या दिवशी मृतदेह नदीत सापडला, तेव्हा कुठे दादाची सुटका झाली!
दादांना अन्यायाचा जबरदस्त तिरस्कार असायचा. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कोणाशीही दोन हात करण्यासाठी ते नेहमीच तयार असायचे. एकदा भाटकाराला काजू बागायतीचा खंड घालायला दादा गेला होता. भाटकाराची तराजू सरकारमान्यताप्राप्त नव्हती. दादाने मुकादमला जाब विचारला. दुसऱ्या दिवशी दादाला मुकादमामार्फत निरोप आला की, तुमच्याकडील सर्व शेती व बागायती काढून घेण्यात आल्या आहेत.
आमच्या दादाचे औपचारिक शिक्षण झाले नव्हते. खाजनेसारख्या छोट्याशा गावात मुक्तीनंतर १९६४ मध्ये दादा तेली यांच्या मांगरात पहिली शाळा सुरू झाली. त्या गावात १९१२ च्या सुमारास एखादी शाळा कशी असणार? पण दादाला मराठी चांगली वाचता येत होती. हनुमान स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, हनुमान चालीसा सर्व त्यांना तोंडपाठ होती. त्यांना भजनाची मोठी आवड होती. श्रावण महिन्यात गावात भजन मास्तर ठेवला जायचा. माझा सर्वात मोठा भाऊ हार्मोनियम शिकला होता. दोन, तीन व चार नंबरचे भाऊ तबलावादक होते. मी मात्र एकदम मठ्ठ निघालो. सारेगमा पलीकडे कधी गेलोच नाही. ताल येत नाही, सूर बेसूर कळत नाही. मात्र मी उत्तम कानसेन आहे.
आमचा दादा उत्तम गवंडी होता. मडगाव, माजोर्डा, कासावली, सांकवाळ आदी परिसरात, १९३० ते ५० या आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी अनेक घरे बांधली. दादांच्या कामाचा दर्जा एवढा चांगला असायचा की, मला खात्री आहे, सुमारे ७०-७५ वर्षांपूर्वी बांधलेली ही सगळी घरे आजही अगदी सुस्थितीत आणि सुरक्षित असणार! दरम्यान, दादाने खाजने, पेडणे येथे स्वतःसाठी बांधलेले घर आणखी ४ वर्षांनी शंभरी पूर्ण करणार आहे.
आपल्या उतारवयात दादाने पोरसकडे येथे चहाची टपरी चालू केली. आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत म्हणजे वयाच्या ८१ वर्षांपर्यंत सर्व वाटसरूंना चहा व सोडा पाजण्यातच त्यांनी धन्यता मानली. गोवा मुक्तीनंतर दादा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते नारायण देसाई यांच्या किसान सभा पार्टीचे कार्यकर्ते बनले. १९६२ मध्ये मुक्तीनंतर झालेल्या पहिल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दादा पंच म्हणून निवडून आले. खाजने गावातील विकासाचा पाया दादाने घातला, ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. दादानंतर त्यांचा मुलगा सलग दोनदा उपसरपंच बनला. त्यानंतर त्यांची मोठी सून पंच बनली. ५ वर्षांपूर्वी दादांचा नातू अमोल सरपंच झाला होता. जन्मानंतर दोन वर्षांत वडिलांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या दादाने स्वकर्तृत्वावर आपल्या सातही मुलांवर चांगले संस्कार केले. त्यामुळे दादांच्या विस्तारित कुटुंबात आज तीन राजपत्रित अधिकारी आहेत. एक नातू डॉक्टर असून एक पणतू वैद्यकीय शिक्षण घेत आहे. एक नातू आणि एक नात अभियंते आहेत. दोन पणतू आणि एक पणतीही अभियंता आहेत. मुलीच्या एका नातीने पीएचडी केली आहे, तर दुसऱ्या नातीने एमबीए करून राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. मुलीच्या दुसऱ्या नातीने GPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी महाविद्यालयात व्याख्यात्याची नोकरी पटकावली आहे. दादांच्या दुसऱ्या एका नातवाच्या मुलाने चित्रकार म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. दादांच्या छोट्या मुलीच्या मोठ्या मुलीचा वैद्यकीय प्रवेश थोडक्यात हुकल्यामुळे तिने स्थापत्यशास्त्र पदवी मिळवली होती. आपल्या विस्तारित कुटुंबातील दुसऱ्या व तिसऱ्या पिढीने मिळवलेले यश पाहून दादा स्वर्गात खरोखरच आनंदित झाला असणार! दादाची उद्या दि. १६ जून रोजी ३८ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवादन!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
- गुरुदास सावळ