विक्री वाढणार; चोरट्या वाहतुकीतही होणार वाढ
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महसूलवाढीसाठी शेजारील महाराष्ट्र सरकारने दारूचे दर वाढवल्याने त्याचा मोठा फायदा गोव्याला मिळणार आहे; परंतु या निर्णयामुळे गोव्यातून महाराष्ट्रात चोरट्या पद्धतीने होणाऱ्या दारूच्या वाहतुकीत वाढही होणार आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नुकत्याच झालेल्या बैठकीत दारूवरील शुल्कात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बिअर व वाईन वगळता इतर सर्व प्रकारच्या दारूच्या दरात मोठी वाढ होणार आहे. महाराष्ट्र सरकारने भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या २६० रुपये प्रति बल्क लिटरपर्यंत निर्मिती मूल्य घोषित केलेल्या दारूवरील उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या तीन पटीवरून साडेचार पट केला आहे. देशी दारूवरील उत्पादन शुल्काचा दर प्रति प्रुफ लिटर १८० वरून २०५ रुपये केला आहे. देशी दारू प्रति बॉटल ८० रुपये करण्यात आली आहे. याशिवाय सीलबंद विदेशी मद्यविक्रीसाठी हाॅटेल, रेस्टाॅरंटना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यात सर्वच प्रकारची दारू अतिशय स्वस्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून गोव्यात येणारे पर्यटक पुढील काळात राज्यातून मोठ्या प्रमाणात दारू खरेदी करणार असून, त्याचा फायदा गोव्याच्या सरकारी तिजोरीला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूने गोव्यातून महाराष्ट्रात चोरट्या पद्धतीने होणाऱ्या दारूच्या वाहतुकीत वाढ होणार आहे. महाराष्ट्रातील अनेकजण गोव्यातून दारू खरेदी करून ती महाराष्ट्रात स्वस्त दरात विकतात. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारांत वाढ झाली असून, पत्रादेवी चेकपोस्ट तसेच महाराष्ट्रातील इतर भागांतील पोलिसांनी अशा प्रकरणांत अनेक कारवाया केल्याचेही दिसून आले आहे.
महाराष्ट्र सरकारने दारूच्या किमतीत वाढ केल्याचा फायदा निश्चित गोव्याला मिळणार आहे. त्यामुळे गोव्यातील दारूच्या विक्रीत वाढही होणार आहे. पण, गोव्यातून महाराष्ट्रात होणारी दारूची चोरटी वाहतूक थांबणे गरजेचे आहे.
- दत्तप्रसाद नाईक, अध्यक्ष, अखिल गोवा मद्य व्यापार संघटना