राज्यात २४ तासांत सरासरी ४ इंच पावसाची नोंद

फोंडा येथे सर्वाधिक ८.६९ इंच पऊस : १४ ते १६ जून दरम्यान मुसळधार शक्य


14th June, 12:00 am
राज्यात २४ तासांत सरासरी ४ इंच पावसाची नोंद

पावसामुळे बसस्थानकानजीक रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना दुचाकी चालक. (नारायण पिसुर्लेकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेले काही दिवस मान्सूनच्या पावसाचा जोर कमी होता. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे राज्याला पावसाने झोडपून काढले. राज्यात गेल्या २४ तासांत शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत सरासरी ४ इंच पावसाची नोंद झाली. फोंडा येथे सर्वाधिक ८.६९ इंच पऊस झाला. पावसामुळे काही ठिकाणी पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या. हवामान खात्याने राज्यात १४ ते १६ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या तीन दिवसांसाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
राज्यात १७ ते १९ जून दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या तीन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. पावसामुळे राज्यातील कमाल तापमानात घट झाली. शुक्रवारी पणजीत कमाल २७.५ अंश, तर किमान २३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३२.४ अंश व किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान २८ अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
राज्यात २४ तासांत धारबांदोडामध्ये ६.६६ इंच, सांगेत ५.६४ इंच, काणकोणमध्ये ५.५१ इंच, केपेत ३.९७ इंच, म्हापसामध्ये ३.८५ इंच, पेडण्यात ३.५७ इंच, पणजीत ३.५६ इंच, जुने गोवेत ३.३७ इंच, दाबोळीत ३.३३ इंच , मडगावमध्ये ३.१५ इंच, मुरगावमध्ये २.२३ इंच, तर साखळीत १.४४ इंच पावसाची नोंद झाली. यावर्षी राज्यात मान्सूनचे आगमन २५ मे रोजी झाले. मात्र जून महिन्यात पावसाचा जोर मंदावला होता. पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
गतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये आतापर्यंत निम्मा पाऊस
यंदा राज्यात १ राज्यात १ ते १३ जून दरम्यान सरासरी ९.५४ इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १ ते १३ जून दरम्यान सरासरी १८.२८ इंच पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जूनमधील पावसाचे प्रमाण निम्म्याने कमी आहे.