पाऊस शेतीला पूरक : नांगरणी, पेरणीत बळीराजा व्यग्र
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामांना गती दिली आहे. तिसवाडी, बार्देशसह अन्य तालुक्यांत तरवा काढण्यासह नांगरणीला सुरुवात झाली आहे, अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.
राज्यात पावसाळी (खरीप) आणि वायंगण (रब्बी) प्रकारची शेती केली जाते. वायंगण शेतीपेक्षा पावसाळी शेतीचे प्रमाण अधिक आहे. बहुतेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. पाऊस सक्रिय झाल्यानंतरच ते नांगरणी करतात. पावसात पाण्यामुळे नांगरणी करणे सोपे होते. आधीच नांगरणी केलेल्या काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. पावसाने चांगला जोर धरला आहे. ही शेतीसाठी आनंदाची बाब आहे, असे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.
बी पेरून तरवा तयार केले जातात. तरवा वाढल्यानंतर ते शेतात रोवले जाता. जूनच्या अखेरीस लावणी होते. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे ५ ते १० एकर जमीन आहे. त्यामुळे यांत्रिकऐवजी ते पारंपरिक शेती केली जाते. सेंद्रिय शेतीचा प्रयोग राज्यात सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण कमी आहे. कीटक तसेच रोगांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी युरिया आणि इतर खतांचा वापर केला जातो, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
पाऊस सुरूच राहिला तर शेताच्या सखल भागात पाणी साचते. यामुळे रोप कुजण्याची भीती असते. त्यामुळे सलग नव्हे तर पावसाने मधेमधे विश्रांती घेणे शेतीसाठी चांगले असते, असेही कृषी संचालक फळदेसाई यांनी सांगितले.