दोन्ही देश संघर्षाच्या टोकावर आहेत. जर युद्ध वाढले, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगावर होतील. कच्च्या तेलाचे दर वाढत असून, त्याचा परिणाम भारतासारख्या विकसनशील देशावर होऊ शकतो.
इस्रायलने शुक्रवारी इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणचे कंबरडे मोडले. इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र आणि सैन्य तळांवर हल्ले केले. इस्रायलने या कारवाईला ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ नाव दिले. यात इराणचे दोन बडे लष्करी अधिकारी ठार झाले आहेत. इराणचे अण्वस्त्र तळ नष्ट केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलने इराणला हादरवून सोडले, यात शंका नाही. इराण अण्वस्त्र संपन्न देश बनण्याच्या तयारीत असतानाच इस्रायलने त्यांना मोठा धक्का दिला आहे. या हल्ल्यात इराणचे सैन्य प्रमुख, अण्वस्त्र वैज्ञानिकांसह अनेक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, हा दावा नसून इराणनेच तसे जाहीर केले आहे. इराणला अण्वस्त्रधारी देश बनू देणार नाही, हे इस्रायल आधीपासून सांगत आहे. हेच त्यांनी शुक्रवारी सिद्ध करून दाखवले. इराणचे चीफ ऑफ स्टाफ जनरल होसैन सलामी, जनरल घोलम-अली रशीद आणि दोन अण्वस्त्र वैज्ञानिकांना प्राण गमवावे लागले. इराण अण्वस्त्र तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून मेहनत घेत आहे. आता इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत आहे, असे म्हटले जात होते, पण इस्रायलला इराणचे अण्वस्त्रधारी बनणे अजिबात मान्य नाही. इस्रायल हा आपल्या अस्तित्वाला धोका मानतो. इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेले ते दोन वैज्ञानिक डॉ. मोहम्मद तेहरांची आणि डॉ. फेरेयदून अब्बासी असूम त्यांच्या मृत्युमुळे इराणच्या अणुबॉम्ब विकसित करण्याच्या कार्यक्रमाला खीळ बसणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलच्या अस्तित्वाला इराणपासून निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी ही एक लक्ष्यवेधी मोहीम असल्याचे म्हटले असल्याने असे हल्ले हा धोका संपवण्यासाठी जितके दिवस लागतील, तेवढे दिवस चालतील असे म्हटले असल्याने प्रत्यक्ष युद्धाची वेळ येऊ शकते. तसे पाहता, इराणकडे अणुबॉम्ब असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, मात्र इराणने अलीकडे जे काही प्रकल्प कार्यरत केले आहेत, त्यातील गॅस सेंट्रीफ्यूज प्रकल्प अण्वस्त्र शस्त्राचा मुख्य आधार असतो, कारण त्यामुळे समृद्ध युरेनियम उत्पादित केले जाऊ शकते. सध्या इराणकडे असलेल्या युरेनियमपासून नऊ अणुबॉम्ब बनवले जाऊ शकतात, ही माहिती उघड होताच अस्वस्थ झालेल्या इस्रायलने हल्ले केले. इराण गुपचूपपणे अण्वस्त्र विकसित करत असल्याचा आरोप अमेरिकेने यापूर्वी केला होता.
इस्रायल व इराण यांच्यातील तणाव हा गेल्या काही दशकांपासून वाढतो आहे. इराणचे अणु कार्यक्रम, हिजबुल्ला व हमाससारख्या गटांना मदत आणि इस्रायलविरोधी वक्तव्ये यामुळे दोन्ही देशांमध्ये शीतयुद्धासारखा संघर्ष सुरू आहे. २०२४ व २०२५ च्या सुरुवातीस इस्रायलवर हमासकडून झालेल्या जोरदार क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये इराणचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा इस्रायलने केला होता. इस्रायलच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणला सहानुभूती मिळाली तर काही देशांनी टीका केली. इराणने प्रत्युत्तरादाखल सीरिया, लेबनॉनमधून क्षेपणास्त्र हल्ले केले. सुरुवातीला अमेरिकेने इस्रायलचा पाठिंबा दर्शविला पण नंतर संयम राखण्याचे आवाहन केले. संयुक्त राष्ट्रांनी युद्ध थांबवण्याचे आवाहन करताना मध्यस्थाची भूमिका बजावण्याची तयारी दाखवली. रशिया व चीनने इराणला पाठिंबा व्यक्त केला आहे, तर मोजक्या अरब देशांनी युद्ध थांबण्याचे आवाहन केले आहे.
युरोपातील देशांनीही हल्ल्याचे समर्थन न करता शांतता राखण्याचे आवाहन केले. फ्रान्स व जर्मनीसारख्या देशांनी इराणच्या अणु योजना आणि हिजबुल्ला यांच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली. भारताने अत्यंत संतुलित आणि सावध प्रतिक्रिया दिली आहे. भारताने दोन्ही देशांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आणि प्रादेशिक शांतता व स्थैर्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताचे इराण व इस्रायलशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे भारताने तटस्थतेची भूमिका घेतली. इस्रायलचा हल्ला केवळ द्विपक्षीय संघर्ष नसून तो आंतरराष्ट्रीय राजकारणातही गंभीर पडसाद उमटवत आहे. अमेरिका व युरोप संयमाचे आवाहन करत असतानाच अरब राष्ट्रांमध्ये अस्वस्थता आहे. भारत आणि इतर शांतीप्रिय देशांचे धोरण स्थैर्य राखण्यावर केंद्रित आहे. या साऱ्या घडामोडींनी जागतिक सुरक्षा धोरणांवर आणि राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. अणुहल्ला टळला असला तरी, दोन्ही देश संघर्षाच्या टोकावर आहेत. जर युद्ध वाढले, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगावर होतील. कच्च्या तेलाचे दर वाढत असून, त्याचा परिणाम भारतासारख्या विकसनशील देशावर होऊ शकतो.