गोमेकॉतील घोळ सेवांच्या सुव्यवस्थापनांची नांदी ठरो!

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खूप रुग्ण असतात. नातेवाईकांसाठी आपला एकच रुग्ण असतो, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे एकमेकांवर आवाज न चढवता संयमाने वागणे जरुरीचे आहे.

Story: विचारचक्र |
13th June, 09:56 pm
गोमेकॉतील घोळ सेवांच्या सुव्यवस्थापनांची नांदी ठरो!

सामान्य माणसासाठी डॉक्टर हा देव असतो. त्यामुळे देवाएवढाच आदर आणि प्रेम डॉक्टरांप्रती समाजात आहे. आज कुठेही डॉक्टरवर अन्याय झाला की एकूणच समाज उठून जागृत होतो. त्यामुळे गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या वर्तनाचा समाजातील सगळ्या थरातून निषेध केला गेला. ते वर्तन चुकीचेच होते. कुणा सामान्य नागरिकासाठीही ती वागणूक अयोग्य होती. त्यात डॉक्टरसाठी तर ते अजिबात योग्य नव्हते. त्याचा त्रिवार निषेध आपण सगळ्यांनीच केला. ही व्हीआयपी संस्कृती नाहीशी झाली पाहिजे म्हणून डॉक्टरांनी संप केला अन् त्याची परिणती आरोग्यमंत्र्यांच्या माफिनाम्यात व मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मागण्या मान्य करण्यात झाली. आणि डॉक्टर परत कामावर रुजू झाले. 

ज्या दिवशी डॉक्टर रस्त्यावर उतरले, तेव्हा योगायोगाने आम्ही ओपीडीमध्येच होतो. या संपाचा परिणाम त्या दिवशी आमच्यासहित इतर अनेक लोकांना भोगावा लागला. सामान्य ते गंभीर आजार असलेले अनेक रुग्ण व्हीलचेअरवर ताटकळत होते. गंभीर आजारातून उठून परत फॉलोअपसाठी आलेले रुग्ण, पाठ, कंबर, हातपाय दुखत असलेले ज्येष्ठ नागरिक सगळेच त्या दिवशी लोंबकळत आपल्या टोकन नंबरची वाट पाहात होते. काही कनिष्ठ डॉक्टर ओपीडीत आपली सेवा देत होते, पण वरिष्ठ डॉक्टर येईपर्यंत अनेकांना थांबावे लागले. ही परिस्थिती कमी जास्त प्रामाणात सगळ्याच ठिकाणी होती. हा पिक्चरचा ट्रेलर होता. त्यामुळे डॉक्टर लोकांनी आपली खुर्ची सोडली तर पुढे काय होईल, याची कल्पना सर्वांनाच आलेली असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, डॉ. मधू घोडकिरेकर व इतर मध्यस्थी करणाऱ्या सगळ्यांचे आभार.

 डॉक्टरांना सगळे देव मानतात म्हणून त्यांच्या हातून चूक होणार नाही, असेही मानणे चुकीचे. त्यांच्याकडून दुर्लक्ष झाले तर काय करायला हवे, यालाही काही नियम आहेत. उठसूठ मंत्र्यांना फोन लावणे किंवा तशी पाळी येऊ देणे दोन्ही तारतम्याने सोडविले पाहिजे. गोमेकॉच्या संकेतस्थळावर तक्रारीसाठी स्वतंत्र जागा आहे. त्याचे नियंत्रण सरळ एमएसच्या हातात आहे. आपली तक्रार कुणीही त्यांना सरळ मेल करू शकतात. तिथे किती तक्रारी येतात माहीत नाही, पण आज कुणीही गोमेकॉचे गुगल मॅपवरचे रिव्हिव्ह्ज वाचावेत. कुणी कुणी आपल्याला जनावरासमान वागणूक मिळाली आहे, त्याचा पाढा वाचलेला आहे. चांगल्या प्रतिक्रियाही आहेत. पण वाईट अनुभव आलेल्यांच्या भरपूर तक्रारी आहेत. ते सगळे रिव्हिव्ह्ज, पुनरावलोकने, कमेन्टस्, तक्रारी गोमेकॉच्या अंतर्गत तक्रार निवारण मंचातर्फे सोडविल्या पाहिजेत. स्वमताने त्यावर संशोधन करून त्या त्या कर्मचाऱ्याला उत्तर देणे क्रमप्राप्त केले पाहिजे. कारण सगळ्यांसाठी रुग्ण सेवा ही सर्वोच्च आहे. त्याच्याशी कुणीही तडजोड करता कामा नये. 

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खूप रुग्ण असतात तर नातेवाईकांसाठी आपला एकच रुग्ण असतो, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे एकमेकांवर आवाज न चढवता संयमाने वागणे जरुरीचे आहे. ओळख आहे तर गोमेकॉत जायचे, हे समीकरण बदलणे कर्मचाऱ्यांच्याच हातात आहे.

 चोवीस, छत्तीस तास कुणा डॉक्टरला सलग ड्यूटी करावी लागत असेल तर ते चुकीचे आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ब्रेक द्यायला हवा. मनोरंजनाचे, आयस् ब्रेकिंगचे सेशन्स झाले पाहिजेत. त्यांच्यात अंतर्गत कलह, तक्रारी असतील तर त्या सोडविण्यासाठी प्रभावी यंत्रणा आतच असायला हवी. ती देव नसून माणसेच आहेत अन् त्यांनाही सुखदुःखे आहेत. 

नव्वदच्या दशकात आम्ही गोमेकॉत जात होतो तेव्हा तिथले वातावरण गलिच्छ होते. वॉर्डमधील बाथरूम आणि शौचालये पाहण्याच्या लायकीची नव्हती. बेसीनमध्ये भांडी धुतली, हात धुतले तर तेच पाणी पायावर पडायचे. नाक घट्ट धरून रुग्णाला आत न्यावे लागायचे. बाथरूममध्येच रुग्ण पडून फ्रॅक्चर झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. रुग्णांच्या अंगावर फाटके कपडे, बेडवर फाटक्या चादरी असायच्या. पुढे राज्याचा आर्थिक स्थर उंचावला, आरोग्य क्षेत्राकडे जास्त लक्ष पुरविले गेले. बदलत्या काळाचा हात धरून इस्पितळातील सगळी सामुग्री बदलली गेली. इंजेक्शनच्या सुईपासून ते हातमोजे, मास्क, सिरिंज, गॉज, सगळे सामान भरभरून मिळू लागले. परत परत ऑटोक्लेव करायचे काम कमी झाले अन् उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिकांनाही काम करायला अवकाश प्राप्त झाला. तसेच टॉयलेट, बाथरूमची रया बदलली. परत परत स्वच्छ करणे, पाण्याचा मुबलक पुरवठा यामुळे गोमेकॉकडे येणाऱ्या रुग्णांबरोबर नातेवाईकांनाही चांगल्या सुविधा मिळू लागल्या. अद्ययावत सुविधांमुळे गरीब, श्रीमंत सगळे लोक गोमेकॉत येऊ लागले. सुपरस्पेशालिटी ब्लॉक हा तर आज जागतिक पातळीवरील सुविधा उपलब्ध करून देणारा ब्लॉक आहे. म्हणूनच आत पार्किंग शुल्क भरूनही गाड्यांच्या रांगा आज विद्यापीठाच्या रस्त्यापर्यंत लागलेल्या दिसतात. मडगाव, म्हापसा, डिचोली व इतर ठिकाणी चांगली इस्पितळे झाली. या बदलाचे काहीअंशी तरी श्रेय आरोग्यमंत्र्यांना, त्यांच्या फक्त या खात्यासंदर्भातल्या कामाला द्यायला हरकत नाही.

यापुढे जाऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण टोकनची सुविधा बदलू शकतो. नवीन नोंदणी, फॉलोअप नोंदणी, फक्त औषधे घेण्यासाठींची नोंदणी, ड्रेसिंग - इंजेक्शन करायला येणाऱ्यांची नोंदणी, रुग्णासहित वा रुग्णाशिवाय विशिष्ट डॉक्टरची भेट, फक्त पेपर्स दाखवण्यासाठीची भेट वगैरे कामासाठीची सगळी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होऊ शकते. त्यासाठी अंदाजे वेळ द्यायची. म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. आपत्कालीन येणाऱ्या किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑफलाईन सेवा चालू ठेवावी. असे काही सकारात्मक बदल यानिमित्ताने आपण करू शकतो. चांगले चांगले डॉक्टर इथेच कसे आपली सेवा द्यायला प्रवृत्त होतील, तेही बघितले पाहिजे. आरोग्य क्षेत्रातला ब्रेनड्रेन रोखणे गरजेचे आहे.

कालच्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने आपल्या जगण्या - मरण्याच्या अनिश्चिततेच्या आक्राळ-विक्राळ स्वरूपाचे दर्शन घडविले आहे. आकाशात झेपावणारे कधीही धाडकन जमिनीवर आपटून त्यांची राख होऊ शकते. आपल्या स्वप्नांचा चुराडा होऊ शकतो, याचे भान आपल्याला असावे. आपल्याकडे असलेल्या कसल्याच गोष्टीचा आपण फुका अभिमान बाळगू नये. इथे काशाचीही शाश्वत नाही. असेल तर ते आपले कर्म. चांगले काम इथे राहील. आपला इगो आणि मानापमानाला कोणीही विचारत नाही. त्याला किंमत नाही. किंमत आहे ती इतरांसाठी केलेल्या कर्माला. त्यामुळे इतरांचे भले करून कीर्तीरुपी राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करुया. 


नमन सावंत (धावस्कर)  

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या 

व साहित्यिक आहेत.)