सौदी अरेबियाने हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेशसह १४ देशांसाठी ‘ब्लॉक वर्क व्हिसा’ तात्पुरता निलंबित केला आहे. गेल्या महिन्यात घेण्यात आलेला हा निर्णय आता या महिन्यासाठीही वाढवण्यात आला आहे. व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे हज यात्रेत येणाऱ्या लोकांना प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण गेल्या वर्षी सौदी सरकारसाठी ही एक मोठी चिंतेची बाब बनली होती. हे निर्बंध ३० जूनपर्यंत लागू राहतील.
सौदी अरेबियाने भारत आणि बांगलादेशशिवाय पाकिस्तान, अल्जेरिया, इंडोनेशिया, इराक, इजिप्त, इथियोपिया, सुदान, ट्युनिशिया, जॉर्डन, मोरोक्को, नायजेरिया आणि येमेन या देशांच्या व्हिसावरही प्रतिबंध लावले आहेत. सध्याच्या हज हंगामापर्यंत ई-व्हिसा, फॅमिली व्हिजिट व्हिसा आणि टूरिस्ट व्हिसावरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. हे सर्व निर्बंध हज हंगाम संपेपर्यंत लागू राहतील.
सौदी अरेबियाकडून 'ब्लॉक वर्क व्हिसा' मोठ्या प्रमाणात मजूर देशात आणण्यासाठी जारी केला जातो. या मजुरांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जाते. यामुळे परदेशी नागरिकांना येथे सहज नोकरी मिळते. अनेक लोकांना त्यांच्या नोकरीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा मिळतात. साधारणपणे, ‘ब्लॉक वर्क व्हिसा’ घरगुती कामगार, बांधकाम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात दिला जातो. यासाठी सौदी अरेबिया मुख्यतः दक्षिण आशियाई देशांवर अवलंबून आहे.
हजमध्ये प्रवेश घेण्यासाठी व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी सौदी अरेबियाने हे निर्बंध लादले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, काही लोक वर्क व्हिसाद्वारे देशात येतात आणि नंतर अधिकृत परवानगीशिवाय हज करतात. यामुळे हजमध्ये अनावश्यक गर्दी वाढते आणि सुरक्षेचा धोका निर्माण होतो. गेल्या वर्षी मोठ्या संख्येने लोकांनी अनधिकृतपणे हज केला होता. त्यावेळी भीषण उष्णतेमुळे १,३०० हून अधिक हाजींचा जीव गेला. अनधिकृतपणे हजसाठी गेलेले हाजी सरकारद्वारे केलेल्या व्यवस्थांचा लाभ घेऊ शकले नाहीत, ज्यामुळे अनेक जणांना उष्णतेला बळी पडावे लागले. यावरून सौदी अरेबियावर हाजींना उष्णतेपासून वाचवण्यासाठी पुरेशी व्यवस्था न केल्याबद्दल बरीच टीका झाली होती. ही अव्यवस्था टाळण्यासाठी आणि अनधिकृत लोकांना मक्कामध्ये हजसाठी येण्यापासून रोखण्यासाठी सौदीने यावेळी कठोर उपाययोजना केल्या आहेत. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अधिकाऱ्यांना कडक व्हिसा नियम लागू करण्याचे आदेश दिले होते, जेणेकरून कोणीही अवैध मार्गाने हज करू नये.
सुदेश दळवी गोवन वार्ता