बोईंगच्या विश्लेषणाचीही गरज

या अपघाताची कारणे लवकरात लवकर स्पष्ट होण्याची गरज आहे. विमान नादुरुस्त असताना त्याकडे दुर्लक्ष झाले आहे का किंवा क्षमतेपेक्षा जास्त वजन होते किंवा पक्षी धडकल्यामुळे किंवा मानवी चुकांमुळे हा अपघात झाला, ते स्पष्ट होणे गरजेचे आहे.

Story: संपादकीय |
13th June, 12:51 am
बोईंगच्या विश्लेषणाचीही गरज

गुजरातमधील अहमदाबाद येथे विमान कोसळून एक दोघे वगळता बहुतांश प्रवाशांना जीव गमवावा लागला. विमानतळावरून उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळले. एका हॉस्पिटलच्या हॉस्टेलवर विमान कोसळल्यामुळे तिथेही अनेकांना जीव गमवावा लागला. अद्याप या विमानाच्या अपघाताबाबत अधिक तपास समोर आलेला नसला तरी विमानाने 'मे-डे'ची मागणी केल्यानंतर काही क्षणात ते निवासी इमारतीवर कोसळले. अर्थात ते लंडनला जाणार असल्यामुळे इंधनही जादा भरलेले होते, त्यामुळे ते कोसळल्यानंतर आगीचा वणवा भडकला. साहित्य बेचिराख झाले. विमानातून प्रवास करणाऱ्या २४१ प्रवाशांपैकी एकाने उडी मारल्याचा दावा केला, अन्य एक प्रवासी जखमी आहे. अन्य बहुतांश प्रवाशांना यात जीव गमवावा लागला. एअर इंडियाचे हे विमान. ही विमानसेवा टाटा समूह पाहते. टाटा समूहाने लगेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटींची मदत जाहीर केली, शिवाय ज्या निवासी इमारतीवर विमान कोसळले त्याची पुनर्बांधणी करण्याचेही सौदार्ह दाखविण्यात आले. बोईंग कंपनीच्या बांधणीचे हे विमान सुमारे ११ वर्षे जुने आहे. २०२० मध्ये केरळमधील कोझीकोड येथे करोनाच्या काळात विदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना घेऊन आलेले एअर इंडियाचे विमान कोसळले होते, ज्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी २०१० मध्ये मंगळुरू येथे झालेल्या विमान अपघातात १५८ प्रवाशांनी आपला जीव गमावला होता. विशेष म्हणजे पंधरा वर्षांतील आतापर्यंतचे हे भारतातील तीन मोठे विमान अपघात बोईंग कंपनीच्याच बांधणीच्या विमानांचे आहेत. चारशेच्या आसपास प्रवाशांनी या तीन अपघातांत जीव गमावला. बोईंग विमानांना वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होणेही साहजिक आहे. फक्त भारतात नव्हे तर जगभरात बोईंग विमानांचे होणारे अपघात हे या कंपनीच्या एकूणच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मग तो दक्षिण कोरिया, इंडोनियाशा असो इथोपियाातील विमान अपघात असो.

बोईंग ही जगातील सर्वात मोठी अमेरिकन विमान निर्मिती कंपनी. विमानांसह, रॉकेट, उपग्रह, क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टरांची निर्मिती करून जगातील अनेक देशांना त्यांचा पुरवठा करते. कंपनीने निर्माण केलेल्या विमानांसह अन्य साधनांचे भीषण अपघातही या कंपनीने पाहिले आहेत. त्यामुळेच या कंपनीच्या बनावटीच्या विमानांच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच चर्चा सुरू असते. कंपनीनेही अनेकदा बोईंग विमानांमध्ये बदलही केले आहेत. अहमदाबाद येथील विमान अपघात हा उड्डाण केल्यानंतर काही मिनटांमध्ये झाल्यामुळे तो विमानातील बिघाडामुळे की मानवी चुकांमुळे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी ते बोईंग आहे हे विशेष. या विमानातून शेवटच्या क्षणी उडी घेणाराही जीवंत आहे, हेही आश्चर्यकारक आहे. पायलटला प्रवाशांना सावध करण्यासह आपत्कालीन दरवाजे उघडण्याची संधी मिळाली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे, या अपघाताची कारणमीमांसा पुढे सुरू राहील. या अपघातात भारतासह ब्रिटन, पोर्तुगीज नागरिकांनीही जीव गमावला आहे. या अपघाताची कारणे लवकरात लवकर स्पष्ट होण्याची गरज आहे. विमान नादुरुस्त असताना त्याकडे दुर्लक्ष झाले आहे का किंवा क्षमतेपेक्षा जास्त वजन होते किंवा पक्षी धडकल्यामुळे किंवा मानवी चुकांमुळे हा अपघात झाला, ते स्पष्ट होणे गरजेचे आहे. तितकेच गरजेचे आहे ते बोईंग कंपनीच्या विमानांच्या अपघातांवर उहापोह होणे. एअर इंडियानेही या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालय, बोईंग कंपनी सारेच या अपघाताचे विश्लेषण करत आहेत. २०१९ मध्ये इथोपियामध्ये झालेल्या अपघात १५७ प्रवासी ठार झाले होते. त्यावेळी बोईंग विमानाच्या ऑटोमेटेड सॉफ्टवेअर सिस्टमच्या चुकीमुळे तो अपघात झाल्याचे मानले जाते. त्यापूर्वी २०१८ मध्ये इंडोनेशियामध्ये विमान अपघात होऊन त्यात १८९ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. हा अपघातही एमसीएएसमधील दोषामुळेच झाल्याचे सिद्ध झाले. डिसेंबर २०२४ मध्ये बोईंग विमानाचा दक्षिण कोरियात भीषण अपघात झाला, त्यात १७९ लोकांचा मृत्यू झाला होता. तो अपघात पक्षी धडकल्यामुळे झाल्याचे म्हटले जाते. मलेशिया, सॅन फ्रान्सिस्को, नेदरलँड, न्यूयॉर्क अशा अनेक ठिकाणी बोईंग विमानांचे मोठे अपघात गेल्या वीस - पंचवीस वर्षांमध्ये नोंद आहेत. अनेक देशांनी या अपघातांकडे फक्त विमानांचे साधारण अपघात म्हणून नव्हे तर विमान बनावटीचीही चौकशी केली. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये झालेले अपघातही बोईंगच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे, अहमदाबाद येथील अपघाताची चौकशी करताना बोईंगच्या विश्लेषणाचीही तेवढीच गरज आहे.