जय जय ‘जयशंकर’

आतापर्यंत उद्भवलेल्या अनेक प्रसंगावेळी जयशंकर अत्यंत स्पष्ट शब्दात शत्रू राष्ट्रांचा समाचार घेतात. कुठलाच आक्रस्ताळेपणा नाही की चिथावण्याचा प्रकार नाही. जगाला भारताची भूमिका समजेल अशाच पद्धतीने जयशंकर यांनी देशाची बाजू आतापर्यंत मांडली आहे.

Story: संपादकीय |
11th June, 11:24 pm
जय जय ‘जयशंकर’

युरोप दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सध्या पाकिस्तानच्या विरोधात केलेली सडेतोड उत्तरे चर्चेत आहेत. १४ जूनपर्यंत जयशंकर फ्रान्स, युरोप आणि ब्राझीलच्या दौऱ्यावर आहेत. फ्रान्समध्ये पॅरिस तसेच मार्सेलमध्ये त्यांनी द्विपक्षीय चर्चा केल्या. त्यानंतर त्यांनी युरोपमध्ये ब्रुसेल्स येथे तिथल्या नेतृत्वाशी संवाद साधला. त्यानंतर आता ते ब्राझीलमध्ये जातील. विदेश दौऱ्यावर असेलल्या जयशंकर यांनी त्या त्या देशांतील आघाडीच्या प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. त्यात पाकिस्तान, चीन विषयी आपली भूमिका स्पष्ट करत भारताचा दहशतवादाशी लढा आहे, कुठल्या देशाशी नाही असे जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेचे कौतुकही होत आहे. कारण दहशतवाद हा फक्त भारताला नाही तर तो जगात कुठल्याही देशाला त्रासदायकच आहे. त्यामुळे भारताचा लढा हा पाकिस्तानसोबत नव्हे, तर दहशतवादाशी असल्याची भूमिका ते जगाला पटवून देत आहेत. एका फ्रेंच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतावर हल्ला करणारे दहशतवादी कुठेही असले तरी त्यांना शोधून काढणार असे म्हणत मग ते पाकिस्तानात असले तरीही शोधू, अशी सूचक शब्दांत त्यांनी भारताची भूमिका आणि संताप व्यक्त केला. 

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानात हवाई हल्ले करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. पाकिस्तानसोबत युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा देश, हे जगजाहीर असले तरी काही देश पाकिस्तानला छुप्या पद्धतीने मदत करतात. अशा देशांनाही जयशंकर यांनी योग्य शब्दात फटकारले आहे. चीनसारख्या शेजारी देशाबाबत अचूक शब्दात आपले मत व्यक्त करत दहशतवादाबाबत अस्पष्ट भूमिका चीनला परवडणारी नाही, असे म्हटल्यामुळे जगातील प्रसारमाध्यमांमध्ये सध्या जयशंकर यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे. जयशंकर यांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे इतर देशांनाही जे पाकिस्तानसारख्या दहशतवादाला पोसणाऱ्या देशाला पाठिंबा देतात, त्यांना चपराक दिली आहे. चीनबाबत बोलताना भारत आणि चीन दोन्ही देश आघाडीवर आहेत, पण कुशल मनुष्यबळ असलेला विश्वासार्ह देश म्हणून भारताकडे अनेक देश पाहतात आणि त्याच विश्वासार्हतेने व सुरक्षेच्या दृष्टीने भारताला गुंतवणुकीसाठी निवडतात असे म्हणत भारताची मनुष्यबळ कौशल्य, विश्वासार्हता आणि सर्व सुरक्षेच्या बाबतीत पुढारलेला देश म्हणून होत असलेली ओळख जयशंकर अधोरेखित करतात, हे फार महत्त्वाचे आहे.  

युरोपातील एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत एस. जयशंकर यांनी भारत - पाकिस्तान यांच्यात असलेला वाद हा काही फक्त सीमेवरून आहे अशा दृष्टीने न पाहता हा वाद भारत विरुद्ध दहशतवाद अशा दृष्टीने पाहावा, असे म्हणत पश्चिमी देशांनी भारताच्या या भूमिकेकडे दशहतवादाविरुद्धची लढाई म्हणून पहावे असे आवाहन केले आहे. सीमेपलीकडील दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी तिथे जाऊन कारवाई करण्यास भारत मागे हटणार नाही. पाकिस्तानने दहशतावाला थारा दिला, त्यांना आश्रय दिला हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. ओसामा बीन लादेन सारखा अतिरेकी पाकिस्तानच्याच लष्करी शहरात लपून बसला होता. अमेरिकेने तिथे जाऊन त्याचा खात्मा केला, हा सगळा इतिहास जगासमोर असतानाही दहशतवादाच्या लढ्यात भारताची बाजू घेत नसलेल्या देशांना जयशंकर यांनी या विदेश दौऱ्यात खडे बोल सुनावले आहेत. युरोप आणि फ्रान्सच्या दौऱ्यात आतापर्यंत अनेक मुद्द्यांना जयशंकर यांनी त्या देशांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत शिस्तीचे आणि देशाची भूमिका नम्र तसेच संमजस पद्धतीने मांडताना ठोस आणि सडेतोड 'डिप्लोमॅट' म्हणून जयशंकर यांच्याकडे पाहिले जाते. आतापर्यंत उद्भवलेल्या अनेक प्रसंगावेळी जयशंकर अत्यंत स्पष्ट शब्दात शत्रू राष्ट्रांचा समाचार घेतात. कुठलाच आक्रस्ताळेपणा नाही की चिथावण्याचा प्रकार नाही. जगाला भारताची भूमिका समजेल अशाच पद्धतीने जयशंकर यांनी देशाची बाजू आतापर्यंत मांडली आहे. आताही युरोपीय युनियन, फ्रान्स आणि ब्राझीलच्या दौऱ्यावर असलेले जयशंकर देशाची भूमिका, दहशतवादाविरोधातील लढा याबाबत स्पष्टपणे मतप्रदर्शन करत आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान असे न पाहता या विषयाकडे भारत विरुद्ध 'टेररिस्तान' असे पाहा, हे जयशंकर यांनी सांगून या देशांचे लक्ष वेधले आहे.