मुख्यमंत्र्यांचे डॉक्टरांना आवाहन : आज चर्चेची तयारी, शिस्तपालन समिती स्थापन करण्याचाही निर्णय
गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलनासाठी जमलेले डॉक्टर. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉतील डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा निषेध करत सोमवारी आंदोलन छेडलेल्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना आंदोलन थांबवण्याचा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. आंदोलक डॉक्टरांच्या मागण्या तत्काळ मान करण्यासह, गोमेकॉत यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी शिस्तपालन समितीची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. शिवाय, गरज भासल्यास मंगळवारी गोमेकॉत जाऊन डॉक्टरांशी चर्चा करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
गोमेकॉत आलेल्या वृद्ध महिला रुग्णाला इंजेक्शन न दिल्याचा मुद्दा उपस्थित करून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी चार दिवसांपूर्वी गोमेकॉत जाऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना फैलावर घेतले. डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांच्या समोर मंत्री राणे यांनी डॉ. कुट्टीकर यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. शिवाय त्यांना निलंबित करण्याचेही आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांना दिले होते. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मंत्री राणे यांना घेरले. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (एफएआयएमए) आणि इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) कामावर असताना डॉक्टरचा अशाप्रकारे अपमान केल्याबद्दल मंत्री राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७२ तासांत यासंदर्भात कारवाई करावी, अन्यथा देशभर आंदोलन छेडण्याचा इशाराही ‘एफएआयएमए’ने दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात हस्तक्षेप करून डॉ. कुट्टीकर यांचे निलंबन करण्यात येणार नाही असे सांगत, रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या गोमेकॉतील डॉक्टरांचे कौतुकही केले होते. डॉ. कुट्टीकर यांना सर्वांसमक्ष दिलेल्या अपमानास्पद वागणुकीची जाणीव झाल्यानंतर मंत्री राणे यांनी रविवारी रात्री डॉ. कुट्टीकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचीही माफी मागितली. सोबतच, रुग्णांबाबत असलेल्या तळमळीतूनच आपण कुट्टीकर यांना बोललो; पण त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हा वाद पेटलेला असतानाच सोमवारी सकाळी ‘आयएमए’ची गोवा शाखा, गोमेकॉतील विभागप्रमुख, निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडून न्याय देण्याची मागणी बांदेकर यांच्याकडे केली. त्यानंतर सायंकाळी डॉक्टरांच्या पथकाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री राणे यांनी मीडियासमोर डॉ. कुट्टीकर यांची माफी मागितली आहे. त्यामुळे हा विषय इथेच थांबवण्याचा सल्ला त्यांनी पथकाला दिला.
ज्या ठिकाणी अपमान केला, तेथे येऊन माफी मागा !
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ज्या ठिकाणी येऊन माझा अपमान केला, त्याच ठिकाणी येऊन पुढील २४ तासांत त्यांनी कॅमेऱ्यासमोर आपली माफी मागावी. त्यानंतरच आम्ही पुढील कृती ठरवू, असे डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर, ज्या बी-१२ इंजेक्शनमुळे हा वाद झाला, ते इंजेक्शन सरकारी आरोग्य केंद्रांतही उपलब्ध असते. ते आपत्कालीन इंजेक्शन नसल्याचे कुट्टीकर यांच्यासह आंदोलन छेडलेल्या इतर डॉक्टरांनी स्पष्ट केले.
आंदोलक डॉक्टरांच्या मागण्या...
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांची जाहीर माफी मागावी
डॉ. कुट्टीकर यांचे निलंबन करण्यात येऊ नये
गोमेकॉतील रुग्णांच्या विभागात येऊन व्हिडिओ काढण्यास बंदी घालण्यात यावी
गोमेकॉतील व्हीआयपी संस्कृती बंद करावी
मंत्री राणे आणि डॉ. कुट्टीकर यांच्यात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा
पोलीस फौजफाट्यात वाढ
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांची जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी आंदोलन छेडलेल्यांत गोमेकॉतील बहुतांशी डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांचे आंदोलन चिघळू नये, यासाठी गोमेकॉ परिसरात पोलिसांचा अधिक फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
डीन डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले...
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि डॉ. कुट्टीकर यांच्यात घडलेला प्रकार कुणालाच आवडला नाही.
मंत्री राणे यांनी याबाबत आधीच माफी मागितली आहे; पण आंदोलक डॉक्टरांची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे.
डॉ. कुट्टीकर यांच्या निलंबनाचा आदेश जारी झालेला नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन किंवा चौकशीचा प्रश्नच येत नाही.
गोमेकॉत अशाप्रकारच्या घटना घडू नये याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. रुग्णांवर उपचार होत असलेल्या विभागांत जाऊन व्हिडिओ काढण्याचे प्रकार यापुढे निश्चित बंद होतील.
गोमेकॉतील ‘व्हीआयपी’ संस्कृती बंद करण्यात येईल. आरोग्यमंत्र्यांच्या प्रकरणात व्हिडिओ काढलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल.
आपत्कालीन विभागाबाबत चार विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली देखरेख समितीची स्थापना करण्यात येईल.
आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या कृत्याचा निषेध करून गोमेकॉतील डॉक्टरांनी सोमवारी आंदोलन छेडले. पण, त्याचा उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना फटका बसू नये, याची काळजीही घेण्यात आली होती. त्यामुळे आपत्कालीनसह इतर सर्व विभागांतील सेवा नियमित पद्धतीने सुरू होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.