कळंगुटमधील जयेश भंडारी खून प्रकरण : तेलंगणातील सर्व १५ संशयितांची मुक्तता
म्हापसा : पोलिसांच्या सांगण्यावरून तक्रारीवर स्वाक्षरी केली. घटनेबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही, अशी साक्ष देत फर्यादीनेच खटल्याचे असमर्थन केल्यामुळे तीवायवाडा, कळंगुट येथे २०१८ साली झालेल्या जयेश श्रीकृष्ण भंडारी (३०, कुर्टी सांगे) खून प्रकरणातील तेलंगणातील १५ ही संशयित आरोपींची म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दोषमुक्त संशयित हे तेलंगणाच्या पर्यटकांच्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आले असता ही घटना घडली होती.
संशयित आरोपी ए. श्रीनिवास, के. दर्शन, प्रशांत रेड्डी, सय्यद बशीर उस्मान, सय्यद जैनुद्दीन बद्रुद्दीन, पुरुषोत्तम वीरा रेड्डी, नरसिंम्हा कांत रेड्डी, एस. अंजया, डी. श्रीनिवास, सी. कृष्णा, एम. किरण, बी. अंजीनेलू, के. भोपाल, ई. देवानंद, ए. अंजानेयेलू (सर्व रा. तेलंगणा) या १५ ही जणांची न्यायालयाने भा.दं.सं.च्या १४३, १४७, १४८, ३२३, ३०७, ३०२ व १०९ कलमांन्वये नोंदवलेल्या खुनाच्या गुन्ह्यातून दोषमुक्त केले आहे. याबाबतचा निवाडा न्या. राम सुब्राय प्रभुदेसाई यांनी दिला आहे.
या घटनेत मयतासमवेत जखमी झालेले राजेश यांनी हल्ल्याचे कथन केले. हल्लेखोर हे पर्यटक होते, मात्र न्यायालयात उपस्थित असलेल्या संशयित आरोपींपैकी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींना ते ओळखू शकले नाहीत. मृताचा मृत्यू हा हल्ल्यामुळे झाला हे नोंदणीमधील सर्व पुरावे स्पष्टपणे सिद्ध करतात. परंतु प्रथमदर्शीने संशयितांची ओळख पटवली नाही. या गुन्ह्याशी आरोपींचा संबंध जोडणारा कोणताही थेट किंवा परिस्थितीजन्य पुरावा सरकारी वकिलांनी सादर केलेला नाही. जर पुरावाच नसेल तर आरोपी निर्दोष सुटण्यास पात्र आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने हा निवाडा देताना नोंदवले आहे.
हा हल्ल्याचा प्रकार गेल्या १ जानेवारी २०१८ रोजी रात्री ८च्या सुमारास तीवायवाडा कळंगुट येथील ज्यूड गेस्ट हाऊसच्या आवारात घडला होता. तर ११ जानेवारी रोजी जयेश भंडारी याचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कळंगुट पोलिसांनी रूमबॉय रेमी रिबेलो (केपे) यांच्या तक्रारीच्या आधारे वरील १५ ही संशयित आरोपींना अटक केली होती.
असा झाला होता वाद...
- ज्यूड गेस्ट हाऊसच्या बाहेर संशयित आरोपींचे होणारे आपापसांत भांडण सोडवायला गेलेले फिर्यादी रेमी रिबेलो व गेस्ट हाऊसचे व्यवस्थापक अभिलाश पाटील यांना संशयितांनी मारहाण केली होती.
- त्यांनी राजेश उर्फ राजू भेंडीकर (कळंगुट) व जयेश भंडारी (सांगे) या दोघा मित्रांना मदतीसाठी बोलावले असता संशयितांनी राजेश व जयेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जबर जखमी केले होते.
- जखमींना उपचारार्थ बांबोळी येथे गोमेकॉत दाखल केले. तेव्हा रेमी व अभिलाश यांना घरी पाठविण्यात आले होते. तर राजेश भेंडीकरला आठ दिवसांनी डिस्चार्ज दिला. मात्र, जयेश भंडारीचे ११ जानेवारीला निधन झाले होते.
- त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी हे प्रकरण खुनाच्या गुन्ह्याखाली नोंदवून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.