म्हापसातील मोबाईल आस्थापनाच्या मालकासह तीन हवाला एजंट्सना अटक; टीजीएएनबी आणि गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेची धडक कारवाई.
पणजी : गोवा आणि हैदराबाददरम्यान चालणाऱ्या ड्रग्ज तस्करी व हवाला व्यवहारांच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. ही कारवाई तेलंगणातील अँटी-नार्कोटिक्स ब्युरो आणि गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने मिळून केली आहे. छापेमारी दरम्यान ४९.६५ लाखांची रोकड चक्क वॉशिंग मशीनमधून जप्त करण्यात आली आहे.
नायजेरियन नागरिकांकडून माहिती मिळाली
इमॅन्युएल बेदियाको उर्फ मॅक्सवेल या नायजेरियन नागरिकाला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. त्याच्याकडून कोकेन आणि एमडीएमएससारखे १.२५ कोटींचे अमली पदार्थ सापडले. तो २०१३ पासून भारतात येत होता. त्याचा गोव्यातील अनेक लोकांशी संपर्क होता आणि ‘सेलिब्रिटी कोकेन’ म्हणून ओळखले जाणारे महागडे ड्रग्ज तो विकत होता.
ड्रग्ज गोव्यातून हैदराबाद, बेंगळुरू, केरळमध्ये पाठवले जात होते
तपासात हे स्पष्ट झाले की ड्रग्ज गोव्यातून हैदराबाद, बेंगळुरू आणि केरळमध्ये पाठवले जात होते. यासाठी पर्रा, कळंगुट, शिवोली आणि हणजुण या भागांमध्ये राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा वापर होत होता. हे लोक गोव्यात वास्तव्यास होते. ड्रग्ज पॅक करून ते कुरियर किंवा इतर मार्गाने ग्राहकांपर्यंत पोचवले जायचे. पोलिसांनी ४० ग्राहकांची यादीही मिळवली आहे.
मोबाईल आस्थापनाचा मालक असलेला हवाला एजंट अटकेत
या प्रकरणात ‘संगीता मोबाइल शॉप’चा मालक उत्तम सिंगला अटक करण्यात आली आहे. तो ड्रग्ज विक्रीतून गोळा केलेले पैसे परदेशात, विशेषतः नायजेरियाला हवाला मार्गे पाठवण्याचे काम करत होता. तपासात समोर आले की, त्याच्याकडे केवळ दोन दिवसांत ५० लाख रोख जमा झाले होते.
गेल्या महिनाभरात चार नायजेरियन नागरिकांना अटक झाली असून, भारतातील हवाला नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांमधील संबंध उघडकीस आले होते. पोलिसांनी उत्तम सिंगवर पाळत ठेवून ४ जून रोजी छापा टाकला आणि रोकड जप्त केली. ही रोकड गोव्यातील म्हापसाजवळील हायलँड पार्क इमारतीतील फ्लॅटमध्ये वॉशिंग मशीनमध्ये लपवून ठेवलेली होती. टीजीएएनबीचे प्रमुख संदीप शांडिल्य म्हणाले, जर आमची कारवाई फक्त एक तास उशिराने झाली असती, तर ही रक्कम नायजेरियात पोहोचली असती.
व्हाट्सॲपच्या माध्यमातून चालायचा हवालाचा कारभार
पैसे हवाला पद्धतीने पाठवताना नायजेरियन टोळीने एक अनोखी पद्धत वापरली होती. व्हाट्सॲप ५, १०, २० च्या नोटांचे फोटो पाठवले जात. त्यानुसार एजंट त्या नोटा दाखवून पैसे गोळा करत. या पद्धतीने १५० पेक्षा जास्त व्यवहार करण्यात आले आणि वर्षभरात सुमारे १० कोटी नायजेरियन नायरा परदेशात पाठवले गेले.
हवाला व्यवहारांचे मास्टरमाइंड कोण?
तपासात हेही समोर आले की हवाला व्यवहारामागे उत्तम सिंग, राजू सिंग आणि महेंद्र उर्फ बॉबी या तिघांचे मुख्य योगदान आहे. त्यांनी केवळ दोन दिवसांत ५० लाख गोळा केल्याचे पुरावे मिळाले आहेत. या सगळ्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून पोलिसांच्या मते अशा प्रकारचे ड्रग्ज व हवाला नेटवर्क भारतात अनेक ठिकाणी सक्रिय आहेत. यामध्ये अधिक आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पुढील तपासासाठी टीजीएएनबीचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.