पणजी : बांबोळीतील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी ७ जून रोजी आकस्मिक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. कुट्टीकर यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले होते. आरोग्य मंत्र्याच्या या निर्णयाचा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, आयएमए सारख्या संस्थांनी तसेच सामान्य नागरिकांनी विरोध केला.
दरम्यान आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एक ट्विट जारी करून गोमेकॉत काल घडलेल्या घटनेबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित केले जाणार नाही. राज्य सरकार आणि वैद्यकीय अधिकारी गोमंतकीय जनतेला दर्जेदार सेवा देण्यास कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम करणार्या डॉक्टरांचे त्यांनी कौतुकही केले.
नेमके प्रकरण काय ?
बांबोळीतील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी ७ जून रोजी आकस्मिक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. कुट्टीकर यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले होते.
डॉ. रुद्रेश कुट्टीकर गोमेकॉत उपचारांसाठी दाखल झालेल्या एका रुग्णाशी उर्मट पद्धतीने वागल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांकडे आली होती. विविध वार्डांत रुटीन पाहणी केल्यानंतर त्यांनी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. रुद्रेश यांना पाचारण केले व त्यांना त्यांच्या वर्तवणुकीबाबत जाब विचारला. यावेळी कोणतेही समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने आरोग्यमंत्र्यांनी सदर डॉक्टरला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी केले.
घटनेचा व्हिडिओ
सायंकाळपर्यंत या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉ.कुट्टीकर यांच्या बाजूने सोशल मिडियावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, आयएमए सारख्या संस्थांनी तसेच सामान्य नागरिकांनी देखील आवाज उठवला होता. तर काही जणांनी आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे देखील कौतुक केले होते. सायंकाळी उशिरा आरोग्यमंत्री राणे यांनी एकूणच प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती.
कॅज्युअल्टीमध्ये गर्दी नसल्याने डॉक्टरांनी रुग्णांना सहानुभूती आणि सेवाभाव दाखवणे अपेक्षित होते, पण त्यांनी निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळेच आरोग्यमंत्री म्हणून या प्रकरणात हस्तक्षेप केला. माझ्या बोलण्याचा सूर अधिक संयमी असायला हवा होता हे मला मान्य आहे. माझ्या संवादशैलीची जबाबदारी मी स्वीकारतो. पण, संबंधित डॉक्टरने आरोग्यसेवा नाकारल्याने मी माफी मागणार नाही असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.