पणजी : होंडा-सत्तरी येथे वीजेच्या धक्क्याने झालेल्या लाइनमन चंद्रू गावकर यांच्या मृत्यूनंतर पंधरवड्याचा कालावधी उलटूनही, या दुर्घटनेचा तांत्रिक अहवाल अद्यापही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अभियंत्यांनी आपला अंतिम अहवाल अद्याप वीज खात्याकडे सादर केलेला नाही, अशी माहिती वीज खात्याच्या अभियंत्यांनी दिली आहे.
दरम्यान, वीज खात्याने मृत लाइनमन चंद्रू गावकर यांच्या कुटुंबीयांना ७ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली असल्याची माहिती डिचोली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.
२० मे रोजी दुपारी नियोजित दुरुस्तीकामासाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. ट्रान्सफॉर्मर बंद असल्याचे गृहीत धरून काम करण्यात येत होते. मात्र, ट्रान्सफॉर्मर अनपेक्षितपणे सक्रिय झाले आणि दुर्घटना घडली. विजेच्या झटक्याने चंद्रू गावकर यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत काम करणारा दुसरा लाईनमन गंभीर जखमी झाला होता. जवळील व्यावसायिक आस्थापनांनी जनरेटर किंवा इन्वर्टर सुरू केल्याने ट्रान्सफॉर्मरमध्ये बॅक फीड झाल्याचा प्रथमदर्शी संशय तपास अधिकाऱ्यांनी वर्तवला होता.
दुर्घटनेनंतर वीज खात्याने दोन स्वतंत्र पथकांमार्फत चौकशी सुरू केली होती. यामध्ये मडगाव येथील एमआरटी (मीटर रिले अॅन्ड टेस्टिंग) विभागाच्या अभियंत्यांनी घटनास्थळाच्या आसपास असलेल्या घरांच्या विद्युत मीटरची तपासणी केली. तसेच स्थानिक अभियंत्यांनी जनरेटर, इन्व्हर्टर आणि मीटर उपकरणांची पाहणी पूर्ण केली आहे. मात्र, एमआरटी विभागाकडून आवश्यक रीडिंग अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे अहवाल तयार करण्यात विलंब होत असल्याचे अभियंते शैलेश बुर्ये यांनी स्पष्ट केले.