छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई : ४५ लाखांचे ईनाम असलेला नक्षल मास्टरमाईंड भास्कर ठार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th June, 10:15 am
छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई : ४५ लाखांचे ईनाम असलेला नक्षल मास्टरमाईंड भास्कर ठार

बीजापूर  : सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात मोठी कारवाई करत ४५ लाखांचे ईनाम  असलेला नक्षल मास्टरमाईंड भास्कर ऊर्फ माइलारापु अडेल्लु याचा खात्मा केला आहे. भास्कर हा तेलंगणा स्टेट समितीचा सदस्य आणि मंचेरियल-कोमाराम भीम जिल्ह्याचा सचिव होता.

भास्करवर छत्तीसगड सरकारने २५ लाख आणि तेलंगाणा सरकारने २० लाखांचे ईनाम जाहीर केले होते. तो तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील उरुमादला गावचा रहिवासी होता. दोन दिवसांपासून नॅशनल पार्क भागात सुरू असलेल्या अभियानादरम्यान ही चकमक झाली. यामध्ये जवानांनी ए.के.-४७ रायफल आणि काही स्फोटके जप्त केली आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, चकमकीच्या वेळी भास्करसोबत त्याची पत्नी आणि नक्षली कमांडर अनीता देखील होती. मात्र, तिच्याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही. भास्कर हा आदिलाबाद जिल्हा नक्षल समितीचा प्रमुख सदस्य होता आणि अनेक हिंसक कारवायांचा मास्टरमाईंड मानला जात होता.

याआधी २१  मे रोजी झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी ठार झाले होते. त्यामध्ये १.५ कोटी रुपयांचे ईनाम असलेला मोस्ट वाँटेड नक्षली राजू देखील ठार झाला होता. त्यानंतर ‘कर्रेगुट्टा ऑपरेशन’मध्ये ३१  नक्षलवादी मारले गेले होते. हे ऑपरेशन छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील डोंगराळ भागात तब्बल २४  दिवस चालले होते. या सलग कारवायांमुळे सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले असून, नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

हेही वाचा