दोबारा अलविदा

नाते कशाहीमुळे तुटू शकते. ते तुटल्यावर पुढे जाणे तर अटळ असते, मग पुढे जाताना मागचे हिशोब चुकते करून जायचे का? की मनात त्या अपूर्ण हिशोबांची ठसठस घेऊन चालायचे हे आपल्या हातात असते.

Story: आवडलेलं |
06th June, 06:13 pm
दोबारा अलविदा

‘ब्रेक अप’, ‘मूव्ह ऑन’, ‘रिबाउंड रिलेशनशिप’ हे शब्द आमच्या पिढीला नवीन नाहीत. आमच्या आधीच्या पिढीची मात्र गोष्ट निराळी आहे. हे सगळे शब्दच काय, त्या सगळ्या भावनाही त्यांना अनभिज्ञच आहेत. होतंही असतील त्यांच्या काळात ब्रेकअप, पण ती प्रकिया आज आहे तशी निश्चितच नसली पाहिजे. त्याकाळात सगळ्याबद्दलच गांभीर्य एकुणातच जास्त होते की लोकांमध्ये उठणाऱ्या चर्चांची भीती जास्त प्रमाणात होती ते माहीत नाही; पण प्रेमभंग किंवा ब्रेकअप याबद्दल ते एकमेकांशी आणि इतरांशीही मोकळेपणाने बोलत नाहीत हे खरे आहे. 

आमची पिढी मात्र याबाबतीत बऱ्याच प्रमाणात सॉर्टेड म्हणतात तशी आहे. आमच्या पिढीत ब्रेकअप्सची संख्या वाढली. त्यामागची कारणे वगैरे मांडण्याचा आजच्या लेखाचा हेतू नाही. आमच्या पिढीला या शब्दांचा उच्चार आणि त्यामागच्या भावनांचा स्वीकार करणे अवघड जात नाही ही गोष्टही खरी आहे. म्हणजेच अशा गोष्टींबद्दल केवळ बोलणेच नाही तर त्या स्वीकारून, पुढे जाण्याचे प्रमाण नक्कीच वाढले असेल. 

लेखाची सुरुवात अशी केली ती फक्त बदललेल्या परिस्थितीची नोंद घेण्यासाठी. यामध्ये दोन पिढ्यांची तुलना करण्याचा हेतू नाही. आम्ही जास्त काळ घरच्या बाहेर पडू लागलो, अनेक माध्यमे आम्हाला खुली झाली, शिक्षणाची क्षितिजे आणि कामाची व्याप्ती वाढली आणि आम्ही एकमेकांच्या सतत संपर्कात यायला लागलो. यामुळे साहजिकच एकमेकांबद्दल भावना निर्माण होण्याचे प्रमाणही वाढले असेलच. त्यातूनच मग पुढे नाते निर्माण होणे आणि मग कधीतरी कोणत्यातरी कारणावरून ते फिस्कटणे हेही घडू लागलेच असेल. 

मला आठवते, कॉलेजच्या शेवटच्या वर्षात एकदा आम्ही मैत्रिणी सहज गप्पा मारत बसलो होतो. आमच्यासमोर कॉलेजमधले एक अगदी प्रसिद्ध जोडपे होते. सहज बोलता बोलता विषय निघाला आणि आमच्या मनात आले की, हे आत्ता एकत्र आहेत पण कदाचित आणखी दहा वर्षांनी दोघेजणही वेगवेगळ्या जोडीदाराबरोबर असतील. खरेतर इतका क्रूर विचार आमच्या मनात यायचे कारण नव्हते; पण ते तसे, आपापल्या जोडीदाराबरोबर एकमेकांच्या समोर आलेच, तर त्यांना काय वाटेल यावर आम्ही चर्चा केली ही खरी गोष्ट आहे. ते एकमेकांवर त्या क्षणी इतके प्रेम करत होते की ते सहज हसून पुढे जातील, कदाचित एकमेकांना शुभेच्छाही देतील यावर मात्र आमच्या सगळ्यांचे एकमत झाले होते. 

त्यांचे पुढे काय झाले आम्हाला माहीत नाही. पण नाते तुटणे म्हणजे भांडण, टोकाच्या भावना, दुराग्रह, एकमेकांविषयी अनादर या सगळ्या कक्षा ओलांडून आम्ही विचार करू शकलो या गोष्टीची जाणीव त्या अल्लड वयातही सुखावून गेली. 

भांडण होणे, न पटणे, वादविवाद होणे किंवा हळूहळू दुरावत जाणे… नाते कशाहीमुळे तुटू शकते.  ते तुटल्यावर पुढे जाणे तर अटळ असते, मग पुढे जाताना मागचे हिशोब चुकते करून जायचे का? की मनात त्या अपूर्ण हिशोबांची ठसठस घेऊन चालायचे हे आपल्या हातात असते. ‘क्लोजर’ हा असाच आणखी एक शब्द आणि अशी भावना जी आमच्या पिढीने सहज स्वीकारली. अर्थात दरवेळी हे शक्य असते असे नाही. अगदी काही ठरावीक परिस्थिती अशा असतात जेव्हा नाते तुटणे हे असे सहज असू शकत नाही. पण सध्या आपण त्या शक्यता दूर सारू. 

एकमेकांबद्दल ओढ वाटली, आकर्षण वाटले म्हणून एकत्र आलेली जोडपी सुरुवातीला प्रेमात असतात. कालांतराने त्यांना कळते की हे काही आपल्याला जमणार नाही. ते विभक्त व्हायचे ठरवतात. अर्थात हे इतक्या सहज घडत नाही. भांडण, चिडचिड, आरोप प्रत्यारोप होत असतात यातही पण काही कालावधीनंतर तेही विरून जाते. एकमेकांबद्दल फार आपुलकी वाटत नसली तरीही द्वेषही वाटत नाही. याच अवस्थेला क्लोजर हे छानसे नाव. 

आपली विस्तारलेली क्षितिजे आणि नात्यांची बदलती परिमाणे यामुळे आपली एकेकाळची जवळची व्यक्ती आपल्या संपर्कात पुन्हा येण्याची दाट शक्यता असते. नात्याचा शेवट कसाही झालेला असू दे, पण त्यात असलेल्या भावना (त्या ठरावीक काळापुरत्या) तरी खऱ्या होत्या ना? मग अशावेळी एकमेकांचा द्वेष का राहत असेल मनात? कदाचित हे क्लोजर सगळ्यांना साध्य होत नसेल, म्हणून? 

‘दोबारा अलविदा’ हा लघुपट साधारण याच विषयावर आधारित आहे. एकेकाला नात्यात असलेले जोडपे अचानक एकमेकांच्या समोर येते. भांडण होऊन दूर गेल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात नसले, तरीही एकमेकांना पूर्णपणे विसरू न शकलेले हे दोघे समोर येतात तेव्हा सुरुवातीला साहजिकच प्रचंड तणाव असतो. हळूहळू मग त्यांच्यातली मैत्री बोलायला लागते. बोलता बोलता त्यांचे संभाषण वेगळेच वळण घेते. असे म्हणतात एखाद्या गोष्टीपासून जरा लांब गेले की ती गोष्ट आपल्याला अधिक स्पष्टपणे दिसते, जवळून न दिसलेले त्यातले अनेक कंगोरे आपल्याला लांबून दिसतात. तसेच काहीसे यांच्याबाबतीत होते. न बोललेल्या, बोलायच्या राहून गेलेल्या अशा अनेक गोष्टी वर येतात. त्या बोलून आता काही उपयोग असतो का? याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्हीही देता येऊ शकते. त्यांचे नाते परत जुळणार असते का? तर नाही. तशी आपलीही अपेक्षा नसते, पण तरीही त्यांच्यातले हे बोलणे पूर्ण व्हावे असे मात्र वाटत राहते. तेव्हा न बोललेल्या गोष्टी आता बोलून टाकून त्याचे नाते परत जुळणार नसते. पण त्या नात्यापेक्षाही फार मोठा दुवा त्यांच्यात निर्माण होणार असतो, समजूतदारपणाचा, स्वीकाराचा. 

एका अतिशय संथ लयीत हा लघुपट पुढे सरकत राहतो. कसलाही अतिरेक नाही, काही नाटकी संवाद नाहीत की उपदेशाचे डोस नाहीत. सहज संवादातून, कृतीतून आणि हावभावातून पुढे जाणारा हा लघुपट नात्यांमधले असे पैलू उलगडून जातो की प्रेम आणि तिरस्कार यांच्यामध्ये असणाऱ्या त्या नाजूक धाग्यावर प्रेक्षक तरंगत राहतो.


मुग्धा मणेरीकर

फोंडा