फ्रेंच ओपन २०२५ : आजपासून उपांत्य फेरीच्या सामन्यांचा थरार
पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून, पुरुष आणि महिला एकेरीचे उपांत्य फेरीतील थरारक सामने ठरले आहेत. स्पर्धेतील आघाडीचे चार खेळाडू आता अंतिम फेरीतील तिकीटासाठी भिडणार असून, चाहतेही या सामन्यांकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
पुरुष एकेरीत: अल्काराझ विरुद्ध मुसेट्टी
स्पेनचा कार्लोस अल्काराझ हा यंदाच्या फ्रेंच ओपनचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. त्याने १२व्या मानांकित अमेरिकन खेळाडू टॉमी पॉल याचा अवघ्या ९४ मिनिटांत ६-०, ६-१, ६-४ अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली.
या विजयामुळे अल्काराझ सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. सामना इतक्या लवकर संपल्याने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाल्याची जाणीव ठेवून अल्काराझने सामना संपल्यावर गमतीत प्रेक्षकांची माफी मागितली.
दुसरीकडे, इटलीचा लोरेन्झो मुसेट्टी यानेही पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने फ्रान्सिस टियाफोचा ६-२, ४-६, ७-५, ६-२ असा पराभव केला. मात्र, सामन्यात एक वादग्रस्त प्रसंग घडला.
मुसेट्टीने दुसरा सेट गमावल्यानंतर चेंडू लाथाडला जो लाईन जजच्या छातीवर लागला. यावरून त्याला ‘अनस्पोर्ट्समॅन लाइक कंडक्ट’ म्हणून इशारा देण्यात आला. त्याने लगेचच माफी मागत ही घटना ‘दुर्दैवी’ असल्याचे नमूद केले.
हा बहुचर्चित उपांत्य सामना शुक्रवार, ६ जून रोजी खेळवला जाणार आहे.
महिला एकेरीत: स्विएटेक विरुद्ध सबालेन्का
महिला एकेरीत गतविजेत्या इगा स्विएटेक आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आर्यना सबालेन्का यांच्यात उपांत्य फेरीत महासामना रंगणार आहे.
स्विएटेकचा सहज विजय:
पोलंडची स्विएटेक हिने युक्रेनच्या एलिना स्विटोलिना हिला ६-१, ७-५ असा पराभव देत उपांत्य फेरी गाठली. फ्रेंच ओपनमध्ये तिचा विजयी प्रवास २६ सामन्यांपर्यंत पोहोचला आहे, जो एक विक्रमच आहे.
सबालेन्काचा दमदार पुनरागमन:
दुसरीकडे, बेलारूसची सबालेन्का हिने ऑलिंपिक विजेत्या किन्वेन झेंग हिला ७-६ (३), ६-३ अशा गुणांनी हरवले. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर असूनही, तिने टायब्रेकमध्ये जोरदार पुनरागमन करत दुसऱ्याही सेटवर वर्चस्व गाजवले.
उपांत्य फेरीत स्विएटेक आणि सबालेन्का आमनेसामोर असणार असून, क्ले कोर्टवर स्विएटेकचा सबालेन्काविरुद्धचा विक्रम ५-१ असा आहे. त्यामुळे हा सामना देखील प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. फ्रेंच ओपन २०२५ मध्ये उपांत्य फेरीसाठी सज्ज झालेले सामने हे तरुण उर्जेचा व अनुभवाचा संगम ठरणार आहेत. प्रेक्षकांना तितकाच रोमांच आणि थरार अनुभवायला मिळणार आहे. आता सर्वांच्या नजरा या उपांत्य सामन्यांच्या निकालावर लागल्या आहेत, कोण खेळेल अंतिम सामना आणि कोण होईल यंदाचा क्ले कोर्टचा सम्राट आणि सम्राज्ञी? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
उपांत्य फेरीचे सामने:
पुरुष एकेरी
कार्लोस अल्काराझ-लोरेन्झो मुसेट्टी
शुक्रवार, ६ जून
महिला एकेरी
इगा स्विएटेक-आर्यना सबालेन्का
शनिवार, ७ जून