बाल कल्याण समितीने दिला मोठा निर्णय, वाचा
पुणेः पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण देशभर गाजत असताना या प्रकरणाशी संबंधित दोन घडामोडी समोर आल्या आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील नुकताच अटक झालेला सहावा आरोपी नीलेश चव्हाण याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने त्याला ३ जूनपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नीलेश चव्हाणला ३० मे रोजी पिंपरी पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून अटक केली होती.
नीलेशसाठी पोलिसांची शोध मोहीम
नीलेशला पकडण्यासाठी पोलिसांनी 'लुक आऊट' नोटीस बजावली होती, तरीही तो सापडत नव्हता. चव्हाणच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथकांची स्थापना केली होती. अँटी गुंडा स्क्वॉड आणि पुणे क्राइम ब्रँच संयुक्तपणे कारवाई करत होती.
या पथकांनी पुणे, मुंबई, कोकण, तसेच कर्नाटक आणि गोवा भागात नीलेशचा तपास केला. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक व संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू केली होती. अखेर दहा दिवसांनी नेपाळच्या सीमेवरून त्याला अटक करण्यात आली.
'जनक'चा ताबा आजीकडे
वैष्णवीच्या मृत्यू पश्चात तिचा ९ महिन्यांचा मुलगा जनक या बाळाचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.
त्यामुळे बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल, अशा आशयाची एक्सवर पोस्ट महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.