वेळापत्रक पाळण्याचे महत्व अधोरेखित करत एचएएल व संबंधित संस्थांवर वाढवला दबाव
नवी दिल्ली : भारतीय वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी दिल्लीत झालेल्या सीआयआय बिझनेस समिटमध्ये पुन्हा एकदा स्वदेशी तेजस मार्क-१ए लढाऊ विमानाच्या डिलिव्हरीतील विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली.जेव्हा कराराच्या वेळी वेळापत्रक ठरवले जाते, तेव्हा ते पाळणे गरजेचे असते, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड व संबंधित यंत्रणांवर निशाणा साधला.
तेजसच्या डिलिव्हरीला विलंब
भारतीय वायुदलाने आतापर्यंत ४० तेजस विमाने आपल्या सेवेत रुजू केली असून, त्यापैकी दोन स्क्वाड्रन प्रत्यक्ष सेवा बजावत आहेत. ८३ तेजस मार्क-१ए विमानांचा करार २०२१ मध्ये झाला होता आणि डिलिव्हरी मार्च २०२४ पासून सुरू होणार होती. मात्र, एक वर्ष उलटले तरी या ८३ पैकी एकही विमान वायुदलाला मिळालेले नाही. हा संपूर्ण करार ४८ हजार कोटींचा आहे. एचएएलच्या म्हणण्यानुसार, इंजिन देण्यात होणारा विलंब ही प्रमुख अडचण होती. मार्च २०२४ मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीने पहिले एफ४०४ इंजिन भारताला दिले असून, याच वर्षात आणखी १२ इंजिन मिळणार असल्याचा त्यांचा दावा आहे.
वायुदलात स्क्वाड्रनचा तुटवडा वायुदल प्रमुखांसाठी चिंतेची सबब
भारतीय वायुदलाला ४२ फायटर स्क्वाड्रनची आवश्यकता असताना सध्या केवळ ३१ स्क्वाड्रन कार्यरत आहेत. सध्या फेजआउट होणाऱ्या मिग-२१, मिग-२९, मिराज २००० आणि जग्वार यामुळे ही तूट आणखी वाढणार आहे. यासाठीच तेजससारख्या स्वदेशी विमानांची वेळेत पूर्तता होणं अत्यंत आवश्यक आहे.
एमआरएफए खरेदीचीही तयारी
फायटर जेटची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारकडून ११४ मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट खरेदीची तयारी सुरू आहे. सध्या वायुदलाकडे २५० पेक्षा अधिक सुखोई-३० आणि ३६ राफेल फायटर जेट आहेत. पण, तेजस मार्क-१ए विमानांच्या डिलिव्हरीतील विलंबामुळे वायुदलाचे संरक्षणशक्ती वाढवण्याचे उद्दिष्ट धोक्यात आले असून, वायुदलप्रमुखांनी वेळापत्रक पाळण्याचे महत्व अधोरेखित करत एचएएल व संबंधित संस्थांवर दबाव वाढवला आहे.