बठिंडा : सिंघेवाला-फतूहीवाला गावातील एका शेतात असलेल्या फटाक्यांच्या फॅक्टरीत गुरुवारी (२९ मे) रात्री भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत चार मजुरांचा मृत्यू झाला असून सुमारे २७ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने बठिंडा एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोट इतका प्रचंड होता की संपूर्ण दोन मजली इमारत काही क्षणांतच कोसळली. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला.
कंत्राटदार फरार
फॅक्टरीतील कामकाज उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील कंत्राटदार राजकुमार याच्या देखरेखीखाली सुरू होते. स्फोटानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनास्थळी कार्सेर कंपनीचे तयार फटाके आणि हरियाणा क्रमांकाची लोडिंग गाडी सापडली आहे. फॅक्टरीत दोन शिफ्टमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ४० प्रवासी मजूर कार्यरत होते. अनेक मजूर आपल्या कुटुंबासह तिथेच वास्तव्यास होते.
पोलीस आणि बचावकार्य युद्धपातळीवर
स्फोटाची माहिती मिळताच एसएसपी डॉ. अखिल चौधरी, एसपी मनमीत सिंग, डीएसपी जसपाल सिंग आणि पोलीस निरीक्षक कर्मजित कौर घटनास्थळी दाखल झाले. डेरा सच्चा सौदा संस्थेच्या ‘ग्रीन एस फोर्स’चे स्वयंसेवक मदतकार्यात गुंतले आहेत. हायड्रो मशीनच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.
चार मृत, २७ जखमी; चौकशी सुरू
एसएसपी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर २७ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. सध्या गाळात अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. कंत्राटदराने ही फॅक्टरी चालवण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता केली आहे. मात्र इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर कुठे दुर्लक्ष किंवा नियमभंग झाला का, याची चौकशी करण्यात येणार आहे. प्रशासनाने कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून शोध मोहीम सुरू आहे.