प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हवामान खात्याचा मान्सूनचा लांब पल्ल्याचा अंतिम अंदाज जाहीर झाला आहे. यानुसार यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक मान्सूनची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशात सरासरीच्या १०६ टक्क्यांपर्यंत मान्सून पावसाची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.राज्यात १ मार्च ते २७ मे दरम्यान सरासरी २१.८१ इंच पावसाची नोंद झाली. यंदाचा पाऊस १०३४.९ टक्क्यांनी अधिक आहे. यादरम्यान मडगाव येथे सर्वाधिक २५.६४ इंच पावसाची नोंद झाली आहे. यानंतर धारबांदोडा येथे २४.९६ इंच, मुरगावमध्ये २४.५१ इंच, म्हापसा येथे २४.३९ इंच, तर दाबोळीत २३.५८ इंच पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी पणजीत कमाल २९.४ अंश, तर किमान २४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान २८.८ अंश, तर किमान तापमान २४.८ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान २८ ते २९ अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
आज, उद्या ‘ऑरेंज अलर्ट’
मंगळवारी राज्यात मान्सूनच्या पावसाचा जोर कमी होता. दिवसभर मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. दुपारी काही काळ ऊन पडले होते. हवामान खात्याने २८ आणि २९ मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या दोन दिवसांसाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ३० मे ते २ जून दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करून या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.


