पावसामुळे झालेल्या हानीचा आकडा वाढला

राज्यात ५० हेक्टर भात शेतीचे ४५ लाखांचे नुकसान


28th May 2025, 12:18 am
पावसामुळे झालेल्या हानीचा आकडा वाढला

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पलणजी : मागील आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा आकडा वाढला आहे. अवकाळी पावसाने १० हेक्टर भात शेतीचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा कृषी खात्याचा प्राथमिक अंदाज होता; मात्र खात्याने केलेल्या पाहणीनंतर नुकसानीत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. यानुसार राज्यातील ४५ ते ५० हेक्टर भात शेतीचे नुकसान झाल्याचा सुधारित अंदाज आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे ४५ लाखांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. अंतिम अहवाल पुढील दोन दिवसांत मिळणार आहे, अशी माहिती खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात सांगे, केपे, काणकोण, सासष्टी तालुक्यांतील कापणी न केलेल्या भात शेतीचे नुकसान झाले. येथील पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. कृषी खात्यातर्फे नुकसानभरपाईचा आढावा घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील दोन दिवसांत आढावा घेण्याचे काम पूर्ण होऊन अंतिम आकडेवारी उपलब्ध होणार आहे. प्रति हेक्टरी ९० हजार रुपयांचे नुकसान गृहित धरल्यास सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांना ‘शेतकरी आधार निधी’अंतर्गत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
राज्यात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची नोंद झाली. यामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले होते. रब्बी हंगामात सांगे, केपे, काणकोण आणि सासष्टीमध्ये काही ठिकाणी भाताची पेरणी उशिराने होते. यामुळे कापणीस थोडा उशीर होतो. बहुतेक पिकांची मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कापणी होते. यंदा त्यापूर्वीच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे येथील शेतात पाणी साचून राहिले. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
कृषी कार्ड नसलेल्यांनाही नुकसानभरपाई
‘शेतकरी आधार निधी’ योजनेअंतर्गत नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड असणे आवश्यक असते. राज्यातील काही शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड नाही. असे असले तरी अशा शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. सध्या प्रति हेक्टरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई देता येते; मात्र नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

हेही वाचा
सर्व पहा