प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या आरोपांवरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गावडेंच्या वक्तव्यांवरून भाजप सरकारचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यांच्या आरोपांची भ्रष्टाचारविरोधी पथकाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
भाजपचे मंत्री आणि आमदार भ्रष्टाचारात गुंतले आहेत. आदिवासी समाजासाठी महत्त्वपूर्ण आदिवासी भवन सोडून कोट्यवधींचे टॉवर्स उभारले जात आहेत. मंत्री गोविंद गावडेंमुळे सरकारातील भ्रष्टाचार पुन्हा उघड झाला. राज्यपालांनी अशा भ्रष्ट सरकारला बरखास्त करणे गरजेचे आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले. ठेकेदारांना फायली मंजूर करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते, हे मंत्री गोविंद गावडे यांचे वक्तव्य त्यांच्या स्वतःच्या सरकारबद्दलची पराकोटीची निराशा दाखवते. गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या खात्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे गोवा आता मुख्यमंत्र्यांकडून ठोस कारवाईची अपेक्षा करीत असल्याचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले.


