हॉटमिक्स रस्त्यांची खुदाई जिल्हा​धिकाऱ्यांच्या परवानगीने

‘पीडब्ल्यूडी’कडून हात वर; नागरिक, चालकांना यंदाही फटका शक्य


25th May, 12:31 am
हॉटमिक्स रस्त्यांची खुदाई जिल्हा​धिकाऱ्यांच्या परवानगीने

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण केल्यानंतर संबंधित रस्त्यांची खुदाई करू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले असतानाही राज्यातील वि​विध भागांतील हॉटमिक्स रस्ते खोदण्याचे प्रकार सुरूच आहेत. याबाबत ‘पीडब्ल्यूडी’च्या कनिष्ठ अभियंत्यांकडूनच खात्याकडे तक्रारी दाखल होत आहेत. खात्याकडून मात्र याचे खापर जिल्हा​धिकाऱ्यांवर फोडले ​जात आहे.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर १५ मेपासून कुणालाही परवानगीशिवाय रस्त्यांची खुदाई करता येणार नसल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १३ मे रोजी जारी केला होता. रस्त्यांची खुदाई झाल्यास मान्सून काळात त्याचा फटका स्थानिक जनता, तसेच वाहन चालकांना बसणार असल्याने परवानगीशिवाय कुणालाही रस्त्यांची खुदाई करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद होते. त्याआधी उन्हाळ्याच्या दिवसांत रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाची कामे सुरू करत असताना, रस्ते हॉटमिक्स झाल्यानंतर रस्त्यांची खुदाई करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘पीडब्ल्यूडी’ला दिले होते. त्यानुसार ‘पीडब्ल्यूडी’ने निर्देश जारी केले असतानाही विविध भागांमधील हॉटमिक्स रस्ते फोडण्याचे प्रकार सुरूच असून, यासंदर्भात संबंधित भागांतील कनिष्ठ अभियंतेच खात्याकडे तक्रारी करत आहेत.
दरम्यान, याबाबत ‘पीडब्ल्यूडी’चे मुख्य अभियंता वल्लभ पै यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हॉटमिक्स डांबरीकरण केल्यानंतर १५ मेनंतर संबंधित रस्त्यांची खुदाई करता येणार नाही, असे आदेश ‘पीडब्ल्यूडी’ आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही जारी केले होते. आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन रस्त्यांची खुदाई करण्याचा पर्याय नागरिक आणि एजन्सींना देण्यात आला होता. त्यानुसार, आवश्यकता आहे तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने रस्त्यांची खुदाई करून कामे करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनानांही ‘वाटाण्याच्या अक्षता’
गतवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचा स्थानिक जनता आणि वाहन चालकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत: या विषयात लक्ष घालून यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सर्वच रस्त्यांचे पावसाळ्याआधी हॉटमिक्स डांबरीकरण करण्याच्या आणि त्यानंतर रस्त्यांच्या खुदाईस बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनाही ‘वाटाण्याच्या अक्षता’ लावत अनेक भागांतील रस्त्यांची खुदाई सुरूच असल्याने स्थानिकांकडून कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.         

हेही वाचा