साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

मंत्री गावडेंच्या वक्तव्यावरून वाद, पावसाचा कहर आणि अपघाताच्या दुर्दैवी घटना...

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
31st May, 11:21 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : मंत्री गोविंद गावडे यांनी फोंड्यात केलेल्या वक्तव्यांमुळे ते अडचणीत सापडले. त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला असतानाच काही संघटना त्यांच्या पाठिशी ठाम राहिल्या. मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी हानी, म्हापशात ‘हीट अॅण्ड रन’मध्ये १२ वर्षीय मुलगी ठार, वेर्णा येथे अपघातात तरुणी ठार या घटना मन हेलावून गेल्या. वादग्रस्त वक्तव्यांपासून दुर्घटनांपर्यंत या आठवड्याच्या ठळक घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

जुने गोवेतील एकाला १.०२ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगमध्ये जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून जुने गोवा येथील एकाला १.०२ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर गुन्हे विभागाने अज्ञात वॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गिरी, सांगोल्डात झाड कोसळून घरांचे नुकसान

पेरशेतवाडा-गिरी येथे दोन घरांवर आंब्याचे झाड कोसळल्याने सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. मरड सांगोल्डा येथे घरावर वड कोसळून १ लाखाची हानी झाली. रस्त्याच्या कडेला असलेला आंबा उन्मळून लुझिन्हा बार्रेटो व फेलिसियाना मेंडीस यांच्या घरांवर कोसळला. यामुळे वाड्यावरील रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

सोमवार


गावडे यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कला अकादमीसह इतर काही विषयांवरून वारंवार वादात सापडलेले कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे रविवारी फोंड्यात केलेल्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले आहेत. गावडे यांच्या वक्तव्यांची दखल घेण्यात आली असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे कला अकादमीच्या प्रकरणात कलाकारांकडून ‘सुपारी’ घेण्यास नकार देणाऱ्या मंत्री गावडे यांना मुख्यमंत्र्यांकडून लवकरच ‘नारळ’ दिला जाण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर मंदावला

राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी थोडा मंदावला. राज्यात दिवसभरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पावसामुळे तापमानात घट झाली आहे. पणजीत कमाल २८ अंश, तर किमान २३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


सत्तरीत वादळी वाऱ्याने नुकसान

सत्तरी तालुक्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले आहे. सातोडे येथे सिद्धिविनायक मंदिरावर झाड पडल्याने सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर पडोसे वझरीवाडा येथे अंजली नाईक यांच्या घरावर झाड कोसळल्याने ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाळपई अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठे नुकसान टाळले. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीलाही मोठा व्यत्यय आला होता.

समुद्रकिनाऱ्यावरील शॅक हटवले

समुद्रकिनाऱ्यांवर शॅकचा हंगाम पूर्ण होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शॅक मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे अनेक शॅक मालकांनी आपले व्यवसाय बंद करून शॅक हटवण्यास सुरुवात केली आहे. अखिल गोवा पारंपरिक शॅक मालक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ ५ टक्के शॅक किनाऱ्यावर व्यवसाय करत आहेत.

मंगळवार

मंत्री गावडेंवर कारवाई होणार!

मंत्री गो​विंद गावडे यांच्याकडून गेल्या काही वर्षांत वारंवार पक्षशिस्तीचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता त्यांना अजिबात माफी दिली जाणार नाही. येत्या शुक्रवारीच त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात येईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

म्हापशात ‘हीट अॅण्ड रन’मध्ये १२ वर्षीय मुलगी ठार

कामरखाजन-पेडे येथे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना मोटारसायकलची धडक बसून आकांक्षा बोरा (१२, रा. कामरखाजन) ही १२ वर्षीय मुलगी ठार झाली. या अपघातात कारणीभूत दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आयपीएलवर बेटिंग प्रकरणी पाचजणांना अटक

इंडियन प्रीमियर लिगवरील क्रिकेट सामन्यांत बेटिंग करताना वास्को पोलिसांनी पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, सीम कार्डसह १३ मोबाईल, दोन अतिरिक्त सिम कार्ड, एक वायफाय राऊटर, एक जिओ एअरफायबर, एक पेन ड्राईव्ह अशा सुमारे चार लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यांच्याविरोधात गोवा दमण व दीव सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार


आसगाव घर तोडफोडप्रकरणी पूजा शर्माला वगळले

आसगाव येथील आगरवाडेकर राहत असलेल्या घराचा भाग जून २०२४ मध्ये जमीनदोस्त करण्यात आला होता. या प्रकरणात संशयित पूजा शर्मा हिच्या सहभागासंदर्भात कोणतेही पुरावे समोर आले नाही. त्यामुळे गुन्हा शाखेने तिला वगळून रिअल इस्टेट एजंट तथा मुख्य सूत्रधार अर्शद ख्वाजा याच्यासह १३ जणांविरोधात म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात ६०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

घर विभागणीनंतर १५ दिवसांत मिळणार स्वतंत्र घर क्रमांक

घर विभागणीनंतर कुटुंबांमध्ये होणारे वाद संपवण्यासाठी सरकारने घर विभागणीची प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. घर विभाजित झाल्यानंतर त्या घराला स्वतंत्र घर क्रमांक देण्यासह पाणी आणि वीज जोडण्याही स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे अर्ज प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत पंचायतींना विभागणी प्रमाणपत्रे द्यावी लागतील, असे परिपत्रक पंचायत खात्याने जारी केले आहे.

राजभाषा संचालनालयाचे भाषा पुरस्कार जाहीर

राज्य सरकारच्या राजभाषा संचालनालयाचे भाषा पुरस्कार जाहीर केले आहेत. वर्ष २०२२-२३ सालचा ‘ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर कोकणी भाषा पुरस्कार’ साहित्यिक माणिकराव राम नायक गावणेकर यांना जाहीर झाला आहे. वर्ष २०२३-२४ सालचा ‘ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर कोकणी भाषा पुरस्कार’ सुरेश रामचंद्र पै यांना, वर्ष २०२४-२५ सालचा ‘ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर कोकणी भाषा पुरस्कार’ भिकू बोमी नायक यांना जाहीर झाला आहे.

गुरुवार

संरक्षण मंत्री गोव्यात दाखल

मुरगाव बंदरात आयएनएसव्ही तारिणीच्या ध्वजारोहण समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे गोव्यात आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.

शुक्रवार

गावडेंचे पद वाचवण्यासाठी ‘उटा’मैदानात

मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या हालचाली भाजपने सुरू केलेल्या असतानाच, गावडेंचे पद वाचवण्यासाठी ‘उटा’ संघटना मैदानात उतरली आहे. शुक्रवारी फर्मागुडीत बैठक घेत, मंत्री गावडेंबाबत निर्णय घ्या, अन्यथा आम्ही शांत बसणार नसल्याचा इशारा ‘उटा’ने भाजप आणि सरकारला दिला.

घटक राज्य दिन उत्साहात

गोव्याचा ३९ वा घटक राज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री, आमदार, विविध खात्यांचे सचिव आणि संचालक उपस्थित होते. कार्यक्रमात राजभाषा पुरस्कार आणि ‘आयकॉनिक ब्रँड ऑफ गोवा’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिकांच्या १६ मुलांना, तसेच अनुकंपा तत्त्वावर ३१ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

अंकित यादव उत्तर गोवा जिल्हाधिकारीपदी

आयएएस यशस्वीनी बी. यांची गोव्यातून अरुणाचल प्रदेशला बदली झाल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकारीपदी आयएएस अधिकारी अंकित यादव यांची नेमणूक करण्यात आली आहे. कार्मिक खात्याचे अवर सचिव रघुराज फळदेसाई यांनी शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.


इंधनवाहू टँकरमधून इंधन चोरणाऱ्या दहाजणांना अटक

सडा येथील विनावापर असलेल्या सबजेलमागील भागात इंधनवाहू टँकरांतून इंधन चोरणाऱ्या दहाजणांना मुरगाव पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संबंधितांनी इंडियन ऑईल टँकरातून सुमारे १ लाख ७८ हजार रुपये किमतीचे इंधन चोरले. याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी पाच इंधनवाहू टँकर, तीन मालवाहू वाहने व रोख रक्कम अशी सुमारे २२ लाख ३९ हजारांची मालमत्ता जप्त केली आहे.

शनिवार

भरधाव गाडीच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

वेर्णा येथील माँजीनीस युनिटजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या एसयूव्हीने रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन तरुणींना जोरदार धडक दिली. या अपघातात अनिषा सतीश बोरकर (२३, केपे) हिचा मृत्यू झाला, तर अक्षता नाईक (कारवार) ही जखमी झाली आहे.

‘ताड माड ते एसटीपी’ रस्ता वाहतुकीसाठी खुला

सुमारे साडेचार महिने बंद असणारा सांतिनेज येथील ताड माड ते सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे (एसटीपी) जाणारा रस्ता वाहतुकीसाठी शनिवारी खुला करण्यात आला. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी हा रस्ता १८ जानेवारी पासून बंद होता. हा रस्ता पुन्हा सुरू झाल्याने सांतिनेज येथून टोंका, मिरामार, करंजाळे येथे जाणे सुलभ होणार आहे. यामुळे दयानंद बांदोडकर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. 

लक्षवेधी

मांगोरहिल येथील स्थानिक रहिवाशांवर पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वास्को पोलिसांनी सदर कुत्र्याच्या मालकिणीला जबाबदार धरून दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कांपाल येथे असलेल्या कॅसिनो कर्निव्हलमध्ये झालेल्या हिंसक हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला, तर एक सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. संशयिताने लाकडी काठीच्या साहाय्याने सुरक्षारक्षकांवर प्राणघातक हल्ला केला. यात काठीच्या टोकाला असलेल्या लोखंडी क्लॅम्पमुळे सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली.

बेलाविस्तावाडा सांगोल्डा येथे घराच्या सेप्टीक टँक (सोकपीठ) मध्ये पडून रुझारिओ फेलिक्स मास्कारेन्हस (५८) यांचा मृत्यू झाला. रुझारिओ हे झोपेतून उठल्यानंतर फेरफटका मारत घराच्या मागील बाजूस गेले. तिथे सोकपीटच्या फरशीवर त्यांचा पाय पडला. ही फरशी फुटून ते आत कोसळले. त्यातच त्यांचा सोकपीटमध्ये पडून मृत्यू झाला.

कॅब अ‍ॅग्रीगेटरच्या विरोधात आवाज उठविणारे अखिल गोवा पर्यटक टॅक्सी मालक संघटनेचे सक्रिय सदस्य योगेश गोवेकर उर्फ मोगॅम्बो यांच्याविरोधात कारवाईसाठी हणजूण पोलिसांनी गुन्हेगारी ‘हिस्ट्रीशीट’ उघडली आहे. पोलिसांच्या या कृतीच्या निषेधार्थ तसेच पोलिसांना जाब विचारण्यासाठी शेकडो स्थानिक टॅक्सीवाल्यांनी पोलीस स्थानकावर मोर्चा आणला.