अॅप अॅग्रिगेटर : किनारी भागातील आमदार भेटणार मुख्यमंत्र्यांना

टॅक्सी व्यावसायिकांचा अॅपला विरोध : स्थानिक आमदारांना साकडे


02nd June, 12:20 am
अॅप अॅग्रिगेटर : किनारी भागातील आमदार भेटणार मुख्यमंत्र्यांना

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरकारच्या प्रस्तावित अॅप अॅग्रिगेटर धोरणाला स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना विरोध दर्शवला असून ते आमदारांच्या भेटी घेत आहेत. प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे/धोरणांविषयी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांचे प्रश्न किनारी भागातील आमदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन मांडणार आहेत, अशी माहिती आमदार केदार नाईक यांनी दिली.
स्थानिक टॅक्सीव्यावसायिकांनी आमदार केदार नाईक यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. कमी अंतराच्या प्रवासासाठी भाडेदर खूप कमी आहेत. या दरामध्ये वाढ करावी, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिकांनी केेली आहे. भाड्याच्या टॅक्सी सेवेसाठी प्रति किलोमीटर सरकारचा दर ३६ रुपये आहे. अॅप अॅग्रिगेटरमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रति किलोमीटरमागे ३६ रुपयेच मिळणार आहेत. अॅग्रिगेटरचे ३० रुपये कमिशन ग्राहकाला अदा करावे लागणार आहे. त्यामुळे १० किमी प्रवासासाठी ग्राहकाला ३९० रुपये अदा करावे लागतील. टॅक्सी चालकाला ३६० रुपये मिळणार आहेत. या तरतुदीला टॅक्सी व्यावसायिकांचा आक्षेप आहे.
वाहतूक अॅप अॅग्रिगेटरसाठी नोंदणी शुल्क ५ लाख रुपये करण्यासह सुरक्षा हमी रक्कम १० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. टॅक्सीसह मोटारसायकल पायलटनाही अॅप सेवेत आणण्याचा प्रस्ताव आहे. टॅक्सी व मोटारसायकल पायलटांना अॅप अॅग्रिगेटरकडे नोंदणी सक्तीची नाही. अॅप अॅग्रिगेटरखाली येणारे टॅक्सी व मोटारसायकल पायलटना विम्यासह अन्य सवलतींचा लाभ मिळणार आहे.
गोव्यात सेवा देण्यासाठी अॅग्रिगेटरांना नोंदणीसह ५ लाख रुपयांंचे परवाना शुल्क भरावे लागेल. परवान्याच्या नूतनीकरणासाठी ५ लाखांचे शुल्क असेल. सुरक्षा हमी रक्कम १० लाख रुपये भरावी लागेल. अॅग्रिगेटरला टॅक्सीच्या मालकाला सरकारने निश्चित केलेली कमीत कमी रक्कम प्रवास पूर्ण झाल्याच्या ७२ तासांच्या आत द्यावी लागेल. मुदतीत रक्कम न दिल्यास प्रतिदिन २५ टक्के व्याजाने पैसे द्यावे लागतील. अॅग्रिगेटरनी परवाना नसताना अॅप सेवा सुरू केली तर ५० लाखांचा दंड ठोठावला जाईल. अन्य नियमांचे उल्लंघन केल्यास ५ लाखांच्या दंडाची तरतूद आहे.
पणजीतील जुंता हाऊस भागात आज जमावबंदी
अॅप अॅग्रिगेटर धोरणाला विरोध करण्यासाठी सोमवार, २ जून रोजी दुपारी २ वा. पणजी येथील जुंता हाऊस इमारतीतील वाहतूक खात्याने अंदाजे २ हजारांहून अधिक टॅक्सी व्यावसायिक एकत्र येऊन निवेदन देणार आहेत. उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडून ही माहिती मिळाल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहितेच्या १६३ कलमाखाली जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे जुंता हाऊस भागात पाचहून अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर बंदी आहे. तसेच निदर्शने, मोर्चा, लाऊड स्पीकरचा वापर, बॅनरचो वापर करण्यावर बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ खाली कारवाई केली जाईल, असे उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.