उपायासाठी बोलावली बैठक : फार्म स्थलांतरित न केल्यास मोर्चाचा इशारा
पिग फार्ममुळे कष्टी काले येथील दूषित झालेला नाला.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
केपे : कष्टी काले येथील पिग फार्ममुळे काष्टी गावातील नाला दूषित झाला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सदर पिग फार्म दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावा किंवा बंद करावा, अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. मागणीवर विचार न झाल्यास पंचायतीवर भव्य मोर्चा नेण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कष्टी काले येथे स्थानिकांना अंधारात ठेवून पिग फार्म सुरू केले आहे. याठिकाणी डुक्कर पोसले जात असल्याने मोठ्या प्रमाणात घाणीचे सांडपाणी सोडले जाते. या सांडपाण्यामुळे मुख्य नाल्यातील पाणी दूषित होऊ लागले आहे. या समस्येवर चर्चेसाठी स्थानिक लोकांनी रविवारी खास बैठक बोलावली होती. बैठकीला स्थानिक सरपंच, पंच यांनाही बोलावले होते.
कष्टी येथे जास्तीत जास्त हिंदूंची लोकवस्ती आहे. या नाल्यात स्थानिक लोक धार्मिक विधी करतात. यामध्ये प्रामुख्याने गणपती विसर्जन, सरस्वती विसर्जन, तसेच शिगमोत्सवातील विधी यांचा समावेश आहे. गावात डुक्कर पोसण्याचा व्यवसाय करणे कितपत योग्य आहे ? गावापासून १०० मीटरच्या आत हे फार्म असल्याने गावात दुर्गंधी पासरत आहे. आमच्या गावात अशा कामांना थारा देऊ नये, अशी मागणी स्थानिक अमर नाईक यांनी केली.
गावातील बाहेरच्या व्यक्तीने जनावरांना पाळण्यासाठी फार्म उभारत असल्याचे सांगून पिग फार्म उभारले आहे. पिग फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात डुकरांची पैदास केली जात आहे. कष्टी येथील मुख्य नाल्याच्या बाजूलाच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सोकपीट बांधला असून त्यात पाणी सोडले जात आहे. ते घाणीचे पाणी नाल्यात जात असल्याने पाणी दूषित होत आहे.
- बाळू गावकर, सरपंच, कष्टी, सांगे
पंचायतीने ‘ना हरकत’ दाखला मागे घ्यावा
कष्टीसारख्या गावात डुक्कर पोसण्याच्या फार्मसाठी पंचायतीने कोणत्या आधारावर ‘ना हरकत’ दाखला दिला ? आम्ही या फार्मविरोधात नाही; मात्र मालकाने तो स्थलांतरित करावा, अन्यथा बंद करावा. गावातील पवित्रता जपण्यासाठी आम्ही लढणार असून पिग फार्ममुळे येणारे घाणीचे पाणी आरोग्यास हानिकारक आहे. पंचायतीने फार्मसाठी दिलेला ‘ना हरकत’ दाखला त्वरित मागे घेऊन फार्म सात दिवसांच्या आत बंद करावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. योग्य कारवाई न झाल्यास पंचायतीवर भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला.