तासिका, कंत्राटी तत्त्वावर ११, नियमित २ पदांसाठी मागवले अर्ज
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कला अकादमीच्या नाट्य कला महाविद्यालयात तासिका आणि कंत्राटी तत्त्वावर ११, तर नियमित स्वरूपाच्या २ पदांची भरती करण्यात येणार आहे. कंत्राटीपदाची भरती शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी असणार आहे. तासिका तत्त्वावरील सर्व पदांच्या नियुक्त्या या कामाच्या उपलब्धतेनुसार असणार आहेत. सर्व पदांसाठी राज्यातील १५ वर्षे वास्तव्याचे वैध प्रमाणपत्र, कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
प्राचार्य पदासाठी अर्ज करण्याची मुदत १८ जून, तर अन्य पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ जूनपर्यंत आहे. प्राचार्य आणि ज्युनियर स्टेनोग्राफरच्या जागा अनारक्षित आहेत. दोन्ही पदे नियमित स्वरूपाची आहेत. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा महाविद्यालय संचालकाचे एक, तर परफॉर्मिंग आर्ट्स थिएटर साहाय्यक प्राध्यापकांची ३ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. तिन्ही पदे अनारक्षित आहेत.
याशिवाय परफॉर्मिंग आर्ट्स थिएटर साहाय्यक प्राध्यापक, पर्यावरण अभ्यास साहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी, कोकणी, मराठी आणि हिंदी विषयांसाठी साहाय्यक प्राध्यापकाचे प्रत्येकी एक पद तासिका तत्त्वावर भरण्यात येणार आहे. हिंदीच्या साहाय्यक प्राध्यापकाचे पद ओबीसीसाठी आरक्षित असून अन्य अनारक्षित आहेत. महाविद्यालय समुपदेशकाचे एक पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येईल. सविस्तर सूचना महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
याशिवाय साखळी, खांडोळा, केपे, पेडणे येथील शासकीय महाविद्यालये, गृह विज्ञान महाविद्यालय, संगीत महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी महाविद्यालयीन ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण महाविद्यालयीन संचालक, महाविद्यालयीन समुपदेशक हे कंत्राटी तत्त्वावर आणि साहाय्यक प्राध्यापक (कंत्राटी तत्त्वावर व तासिका तत्त्वावर) या पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ जूनपर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
जीटीडीसीमध्ये १० जागांवर भरती
गोवा पर्यटन विकास महामंडळामध्ये (जीटीडीसी) १० जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये ९ जागा रिसेप्शनिस्ट पदाच्या आहेत. एक जागा सहाय्यक अकाऊंटंट पदाची आहे. रिसेप्शनिस्ट ५ जागा आरक्षित असतील. सर्व पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जून आहे.