पणजी : सुमारे साडेचार महिन्यांनंतर 'ताड माड ते एसटीपी' रस्ता वाहतुकीसाठी खुला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st May, 02:55 pm
पणजी : सुमारे साडेचार महिन्यांनंतर 'ताड माड ते एसटीपी' रस्ता वाहतुकीसाठी खुला

पणजी : सुमारे साडेचार महिने बंद असणारा सांतिनेज येथील ताड माड ते सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे (एसटीपी) जाणार रस्ता वाहतुकीसाठी शनिवारी खुला करण्यात आला. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी हा रस्ता १८ जानेवारी पासून बंद होता. उच्च न्यायालयाने या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मे पर्यंत दिली होती. हा रस्ता पुन्हा सुरू झाल्याने सांतिनेज येथून टोंका, मिरामार, करंजाळे येथे जाणे सुलभ होणार आहे. यामुळे दयानंद बांदोडकर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. 

याबाबत स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ताड माड ते टोंक, एसटीपी पर्यंतचा २०० मीटरचा रस्ता बनवताना येथील सांडपाणी वहिनी घालण्याचे काम आव्हानात्मक होते. येथे ७१० मिमी व्यासाच्या ट्रंक सीवेज लाइनच्या घालण्यासह अन्य कामे करणे आवश्यक होते. यामध्ये मॅनहोल, घर जोडणी चेंबर, सेवा वाहिन्या आणि क्रॉसिंग बांधणे यांचा समावेश होता. ही सर्व कामे झाल्याने या परिसरातील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणार आहे. कामे करताना पाणी, वीज यासारख्या सेवा अखंडित ठेवण्यासाठी विविध खात्यांसोबत योग्य समन्वय साधल्याने प्रकल्प यशस्वी झाला. 

येथे सांडपाणी वाहिनी जोडणीच्या कामास उशिरा झाल्याने रस्ता पूर्ण होण्यास वेळ लागला. सांडपाणी वाहिनी घालताना पाण्याची सतत पातळी वर खाली होत होती. यासाठी येथे पाणी उपसून टाकणारे आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. या दरम्यान येथील प्रसिद्ध मंदिर आणि त्याच्या शेजारील  वटवृक्ष पूर्णपणे अबाधित राहील याची खात्री स्मार्ट सिटीने घेतली. येथे पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी पदपथ जोडून, ​​उच्च दर्जाचे काँक्रीट वापरून रस्त्याचे पृष्ठभाग पूर्ण करण्यात आल्याचे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी सांगितले.