१५ वर्षांपूर्वीच्या उपकाराची 'अशी' केली परतफेड; वाचा बाणावलीतील हा प्रकार

पुण्यातील व्यावसायिकाकडून पेले फर्नांडिस यांना अनोखे गिफ्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st May, 05:28 pm
१५ वर्षांपूर्वीच्या उपकाराची 'अशी' केली परतफेड; वाचा बाणावलीतील हा प्रकार

मडगाव :  ‘उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात आणि योग्य वेळ, संधी मिळाल्यावर त्या उपकारांची परतफेड करायची असते', हे मानवी जीवनाचे तत्त्व नुकतेच बाणावलीतील एका मच्छिमाराला अनुभवता आले. १५ वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाला बुडताना वाचवण्याचे परोपकार त्या मच्छिमाराने केले होते. काळ लोटला मात्र व्यावसायिकाने मच्छिमाराचे ते उपकार लक्षात ठेऊन त्याची अनोख्या पद्धतीने परत फेड करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याचे झाले असे की, सुमारे १५ वर्षांपूर्वी बाणावली येथील समुद्रात वॉटर स्पोर्ट्स खेळून झाल्यानंतर किनाऱ्यावर परत येताना पुण्यातील व्यावसायिक विक्रम काकडे हे पाण्यात बुडू लागले. ही घटना लक्षात येताच काकडे यांना स्थानिक मच्छिमार आणि वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक पेले फर्नांडिस यांनी वाचविले. या घटनेला बराच काळ लोटला. मात्र विक्रम काकडे यांनी ती घटना स्मरणात ठेवत तब्बल १५ वर्षांनंतर लाखो रुपये किमतीची 'जेट स्की' पेले फर्नांडिस यांना गिफ्ट म्हणून दिली आहे. 

या घटनेबाबत मच्छिमार पेले फर्नांडिस यांनी सांगितले की, सुमारे १५ वर्षांपूर्वी बाणावली समुद्रकिनारी पुण्यातील व्यावसायिक विक्रम काकोडे नामक व्यक्ती वॉटर स्पोर्ट्स केल्यानंतर किनाऱ्यावर परतत असताना पाण्यात बुडू लागली. आपण धावत जाऊन त्याला किनाऱ्यावर आणून त्यांचे प्राण वाचवले.  त्या घटनेनंतर जेव्हा जेव्हा काकडे गोव्यात येत होते तेव्हा त्यांनी माझे आदरतिथ्य स्वीकारले आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच व्यावसायिक विक्रम यांचा मला कॉल आला व त्यांनी भेटायचे असल्याचे सांगितले. त्यांची भेट घेतल्यानंतर तुम्ही माझा जीव वाचविला या कृत्याची जाणीव ठेवत उपकाराची परतफेड म्हणून आपणास मी 'जेट स्की' गिफ्ट म्हणून देत असल्याचे सांगितले.

या घटनेमुळे मी निःशब्द झालो असून आपण केलेल्या चांगल्या कृत्याची कुठेतरी, कधीतरी दखल घेतली जाते, यावरचा माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे.