वाहिन्यांच्या कामांसाठी खोदलेले रस्ते बनले धोकादायक

सासष्टीतील दुःस्थिती : रस्त्यावरील मातीत वाहनांची चाके रुतण्याचे प्रकार


31st May, 11:57 pm
वाहिन्यांच्या कामांसाठी खोदलेले रस्ते बनले धोकादायक

खड्डे बुजविलेल्या मातीच्या भरावात अडकून पडलेले वाहन.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मडगावसह सासष्टी परिसरात गॅस, वीज व सांडपाणी वाहिन्यांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. ते योग्यरीत्या बुजवण्यात आले नसल्याने अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व कामे पूर्ण झालेली नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी येण्याची व पाणी साचण्याची समस्या जाणवली. मडगावसह सासष्टी परिसरातही भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले होते. त्या त्या ठिकाणी पाणी साचून रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. नावेली मतदारसंघाचा विचार करता नावेलीत गॅसवाहिनी, जलवाहिनी व वीज वाहिन्यांच्या कामांसाठी रस्त्यांच्या शेजारी व रस्त्यांवरही खोदकाम केले आहे. वाहिन्या टाकून झाल्यानंतर केवळ मातीचा भराव टाकून रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. मान्सूनपूर्व पावसामुळे खोदलेल्या रस्त्यांचा मातीचा भराव खचला असून त्यात वाहने अडकून पडण्याचे प्रकारही घडले आहेत. रावणफोंड पुलाकडे भूस्खलन झाल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली. त्या दवर्लीतील मार्गावरही वीज वाहिन्यांसाठी खोदकाम केलेल्या भागात तीन ट्रक रुतून बसण्याचे प्रकार घडले. जेसीबी आणून ते ट्रक बाहेर काढण्याची वेळ आली. हाऊसिंग बोर्ड परिसरात गॅस वाहिन्यासाठी खोदकाम केले; पण त्याची दुरुस्ती झालेली नाही. पंचायतीकडूनही याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. दिकरपाल ग्रामसभेवेळी खोदकाम केलेल्या रस्त्यांचा विषय आला होता. त्यावेळी आमदारांशी चर्चा करून हा विषय तत्काळ सोडविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
याशिवाय मांडोप व नावेलीच्या इतर भागातही ठिकठिकाणी वाहने अडकून पडण्याचे प्रकार घडले. मडगावातील भूमिगत वीज वाहिन्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे खोदकाम केलेले रस्ते बुजवण्यात आलेले नाहीत. याचा परिणाम म्हणून पावसात या खड्ड्यांचा अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता आहे. काही ठिकाणी फलकही पडले असल्याने मान्सून कालावधीत धोका संभवत आहे. मडगाव रेल्वे स्थानकामध्ये वीजवाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी काम पूर्ण झाले नसल्याने ते खड्डे केवळ माती टाकून ठेवण्यात आले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कुंकळ्ळी, बाणावली परिसरातही हीच स्थिती आहे. रस्ते खोदकाम करून वीजवाहिन्या टाकून झाल्यानंतरही योग्यरीत्या दुरुस्ती व डांबरीकरण न झाल्याने चालकांना त्रास होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘वाटाण्याच्या अक्षता’
वाहिन्यांसाठी रस्ते खोदकाम १५ मेनंतर करू नये असे, आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. मात्र त्या आदेशाचे पालन होताना दिसले नाही. माडेल फातोर्डा येथे आदेशाचे उल्लंघन होत असताना ठेकेदाराला रोखण्यात आले होते. माकाझन येथेही जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरूच असल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे पावसाळ्यात लोकांच्या समस्या वाढू नयेत यासाठी रस्ते खोदकामाबाबतच्या आदेशाचे पालन योग्यरीत्या व्हावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.