नूतनीकृत इमारतीमध्ये सुसज्ज ‘आताईद लायब्ररी’ हे डिजिटल ग्रंथालय
म्हापसा पालिकेने नूतनीकृत केलेली आताईद ग्रंथालय इमारत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : येथील नूतनीकृत केलेल्या काम्र म्युनिसिपल दी बार्देश या जुन्या नगरपालिका वारसा इमारतीसह नव्या पालिका व्यापारी संकुलाचे लोकार्पण सोमवार, २ जून रोजी दुपारी ४ वा. नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, नगरविकास खात्याचे संचालक ब्रिजेश मणेरकर, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, जीसूडाचे प्रकल्प अधिकारी अंकुश गावकर, जीसूडाचे वरिष्ठ प्रकल्प अभियंता हुशेन शाह मुजावर व नगरसेवक उपस्थित असतील.
नूतनीकृत पालिका इमारतीमध्ये सुसज्ज असे आताईद लायब्ररी हे डिजिटल ग्रंथालय उभारले जाणार आहे. साडेपाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर म्हापसा आणि बार्देशवासीयांना ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या गोवा राज्य नागरी विकास एजन्सीतर्फे (जीसूडा) या इमारतीच्या नूतनीकरणाचे बांधकाम डिसेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात हाती घेतले होते. ३.८० कोटी रुपये खर्चून हे नूतनीकरणाचे काम करण्यात आले आहे.
दरम्यान, जानेवारी २०१६ मध्ये पालिका कार्यालयाचे ‘पाकल्यांचो ट्रॉप’ या कोर्ट जंक्शनवरील वारसा इमारतीमध्ये स्थलांतर झाल्यापासून ही जुनी इमारत विनावापर पडून होती. त्यानंतर ती मोडकळीस आल्यामुळे इमारतीला पालिकेने टाळे ठोकले होते. सप्टेंबर २०१९ पासून इमारतीमधील आताईद लायब्ररी हे ग्रंथालय बंदावस्थेत आहे.
पालिकेकडे २६ हजार पुस्तके, ६ हजार सदस्य
हल्लीच झालेल्या पालिका बैठकीत या इमारतीला डिजिटल ग्रंथालयाचे स्वरूप देण्याचा ठराव घेतला आहे. इमारतीच्या तळमजल्यावर वृत्तपत्र वाचन दालन, बाल कक्ष, संदर्भ (रिफ्रेन्स) कक्ष, अभ्यास कक्ष, कॅन्टीन, पहिल्या मजल्यावर डिजिटल वाचन कक्ष, कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त सभागृह, पालिकेच्या जुन्या दस्तावेजांसाठी स्टोअर रूम कक्ष, अशी व्यवस्था आहे. पालिकेकडे सध्या ग्रंथालयाची २६ हजार पुस्तके असून ६ हजार सदस्यांची नोंदणी आहे. इथे डिजिटल लायब्ररीमध्ये २५ लाख पुस्तकांची व्यवस्था असेल.
न्यायालयीन कामकाजामुळे प्रकल्प रखडला
‘अलंकार’ थिएटरजवळील म्हापसा पालिका व्यापारी संकुल प्रकल्पाचे बांधकाम न्यायप्रविष्ठ आहे. एका व्यक्तीने आपल्या जागेवर पालिका व जीसूडाने अतिक्रमण केल्याचा दावा याचिकेत केला असून त्याचा निकाल लागायचा आहे. या बहुउद्देशीय प्रकल्पाचे काम सप्टेंबर २०१९ मध्ये हाती घेतले होते. यावर २०.५७ कोटी रुपये खर्च झाला आहे. जीसूडाने राबवलेला हा प्रकल्प पावणे दोन वर्षांत पूर्णत्वास येणार होता; मात्र आता सात वर्षांनी प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे.