उच्च शिक्षण संचालनालयाची माहिती; ८ जून अर्ज करण्याचा शेवटचा दिवस
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पर्वरी : उच्च शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी महाविद्यालयीन प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या आणि अंतिम फेरीची घोषणा केली असून १ ते ८ जून दरम्यान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संचालनालयाच्या ‘समर्थ’ ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे अर्ज करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही, त्यांनी बी.ए., बी.एसस्सी., बी.कॉम., बीबीए., बीसीए. यासह विविध पदवीपूर्व कार्यक्रमांबरोबर बी.एड., बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, बॅचलर ऑफ म्युझिक या कार्यक्रमांसाठीही उच्च शिक्षण संचालनालय गोवाच्या ‘समर्थ’ संकेतस्थळावरून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या https://dhe.goa.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे उच्च शिक्षण संचालनालयाने कळविले आहे.
१,३०० जागा उपलब्ध
या कार्यक्रमांमध्ये अंदाजे १,३०० जागा उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया विनामूल्य आहे. यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विलंब न करता अर्ज करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवाहन
२०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष प्रवेशासाठी ही शेवटची संधी असेल. वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये निकाल किंवा प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनीही अर्ज करावेत. या फेरीनंतर अर्ज सादर करण्याची दुसरी संधी विद्यार्थ्यांना मिळणार नाही, असे उच्च शिक्षण संचालनालयाने कळविले आहे.