मडगावात आणखी एका इमारतीचा भाग कोसळला

नुकसान नाही : जीर्ण इमारतींवर उपाययोजनेची नागरिकांची मागणी


25th May, 12:28 am
मडगावात आणखी एका इमारतीचा भाग कोसळला

मडगावातील जीर्ण इमारतीचा रस्त्यावर कोसळलेला भाग.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : शहरातील गांधी मार्केटनजीकच्या धोकादायक इमारतीचा काही भाग शुक्रवारी दुपारी कोसळला. त्यानंतर शनिवारी सकाळी सिने लता परिसरातील एका जीर्ण इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडली. यात कोणतेही नुकसान झाले नाही. नागरिकांकडून अनुचित प्रकार घडण्याआधी जुन्या इमारतींच्या बाबतीत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मडगावातील जीर्ण व धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. शनिवारी सकाळी पालिका इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या सिने लता परिसरातील जुन्या व जीर्ण आंताव इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला. ही दुर्घटना सकाळच्या सुमारास झाल्याने कोणालाही दुखापत किंवा कोणतेही नुकसान झाले नाही; मात्र त्याच इमारतीमध्ये आणखी अनेक दुकाने कार्यरत आहेत. त्याठिकाणी ग्राहक खरेदीसाठी येत असतात. या इमारतीचा आसरा घेत अनेकजण पावसात चालत जात असतात. अशावेळी इमारतीचा आणखी काही भाग कोसळल्यास अनुचित घटना घडू शकते. त्या दृष्टीकोनातूनही निर्णय घेण्याची गरज आहे. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांनीही घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली. वीज खात्याच्या कर्मचार्‍यांनी धोकादायक ठरणार्‍या वीजवाहिन्यांचा विद्युत प्रवाह बंद केला आहे. पालिकेच्या कामगारांनी पडलेले स्लॅबचे तुकडे गोळा करून बाजूला केले.
मडगावातील अनेक इमारती गोवा स्वतंत्र झाल्यापासूनच्या आहेत. भाटकारांनी या इमारती भाड्याने दिल्या होत्या. त्यांचे भाडे कमी होते. भाड्याच्या रकमेतून इमारतीची देखभाल शक्य नाही. अनेक इमारतीत पाणी साचते. या इमारतीच्या गॅलरीतही पाणी साचल्यानंतर काही भाग कोसळला. सरकारने धोकादायक इमारतींवर निर्णय घ्यावा. भाटकार व भाडेकरूंचा हक्क कायम राखत इमारतींची पुनर्बांधणी करावी. अन्यथा मडगावात कोसळलेल्या इमारती दिसतील.
_ विवेक नाईक, स्थानिक रहिवासी
मडगावात अनेक धोकादायक इमारती
चार वर्षांपूर्वी गांधी मार्केटनजीकच्या इमारतीचा भाग कोसळल्यानंतर ती सील करून धोकादायक ठरवण्यात आली. ती इमारत गेल्यावर्षी जमीनदोस्तही करण्यात आली. शनिवारी त्याच इमारतीच्या बाजूला असलेल्या जीर्ण इमारतीचा बाल्कनीचा मोठा भाग कोसळून तीन गाड्यांचे नुकसान झाले. गाडीतील एक मुलगा बालंबाल बचावला. गेल्या महिन्यात खारेबांध परिसरातील ‘दाऊद चाळ’ या इमारतीत आग लागल्याने त्या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. मडगाव परिसरात अनेक इमारती धोकादायक स्थितीत आहेत.
आमदार, पालिका जबाबदार नाही : कामत
मोडकळीस आलेल्या इमारती भाटकारांच्या असून त्या भाड्याने दिल्या आहेत, काहींची विक्रीही झाली आहे. देखभालीची जबाबदारी त्यांची आहे. या घटनांसाठी पालिका किंवा आमदार जबाबदार नाहीत. जिल्हाधिकार्‍यांना इमारतींचा भाग हटवण्यासाठी तज्ज्ञ ठेकेदाराची नेमणूक करण्यास सांगितले आहे. धोकादायक इमारतीसाठी भाटकार व भाडेकरूंच्या हक्कांचे रक्षण करून उपाययोजनांसाठी ठोस धोरणाची गरज आहे. खासगी धोकादायक इमारती कुणी पाडायच्या हे निश्चित होण्याची गरज आहे. सोमवारी बैठक घेऊन यावर चर्चा करण्यात येईल, अशी माहिती आमदार दिगंबर कामत यांनी दिली.      

हेही वाचा