गेल्या आठवड्यात झालेल्या रस्ते अपघातात अनेकजण मृत्यूमुखी पडले. तर अवकाळी पावसाने राज्याला अक्षरश: झोडपून काढले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले. तसेच वीजेच्या धक्क्याने दोन युवकांना आपले प्राण गमवावे लागले. तसेच समग्र शिक्षा अभियानाच्या गोव्याच्या बँक खात्यात तब्बल ५ कोटींची अफरातफर झाल्याने राज्यात खळबळ उडाली. या सर्व घटनांनी गेला आठवडा गाजला.
रविवार १८ मे
पर्वरीतील अपघातात युवकाचा मृत्यू
पर्वरी येथील रविवारी (१८ राेजी) पहाटे झालेल्या भीषण अपघातात फराझ नाईक (वय १९, रा. सुकूर-पर्वरी) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवार, १८ मे रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास फराझ नाईक दुचाकीवरून पणजीहून आपल्या घरी सुकूर येथे परतत होता. पर्वरी पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसवर त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.रुग्णवाहिकेच्या सहाय्याने फराझला तत्काळ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
गिरीत फ्लायओव्हरच्या कामाचा सेगमेंट कोसळला
गिरी - पर्वरी फ्लायओव्हरच्या (इलीवेटेड कॉरिडॉर) बांधकामादरम्यान एक मोठा काँक्रीट सेगमेंट सुमारे दीड मीटर उंचीवरून कोसळल्याची घटना रविवारी घडली. गिरी येथे झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुर्घटनेमुळे वाहतुकीची कोंडी झाली, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्वपदावर आणली. या दुर्घटनेत दोन कामगारांसह एकूण तिघे जण जखमी झाले.
सोमवार १९ मे
चार अपघातात महिलेसह तिघांचा मृत्यू
राज्या सोमवारी झालेल्या चार अपघातात तिघांचा मृत्यू झाला. सांताक्रूझ-बस्तोडा येथे झालेल्या स्वयंअपघातात साईराज मोरसकर (२१) याचा मृत्यू झाला, तर कासावली येथे स्कूटरने धडक दिल्याने संगीत बिंद (४३) या महिलेला जीव गमवावा लागला आणि तिच्यासह तिघे जखमी झाले. याच दरम्यान, सत्तरीतील वाघुरे-शिंगणे येथे झालेल्या दोन दुचाकींच्या धडकेत ७० वर्षीय महादेव गावडे यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.
सुकूर येथील जमीन हडप प्रकरणी विठू नागवेकरला अटक
सेरुला कोमुनिदादच्या सुकूर येथील सर्व्हे क्रमांक २२१/१, २२२/१ आणि २३३/१ मधील एकूण ६९,६७५ चौ.मी. जमीन बनावट कागदपत्रे तयार करून हडपल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पैठण-पर्वरी येथे राहणारा संशयित विठू नागवेकर याला अटक केली.
मंगळवार २० मे
सत्तरीत विजेचा धक्का बसून लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू,
सत्तरी तालुक्यातील होंडा पोस्टवाडा येथे वीज ट्रान्सफार्मर दुरूस्तीचे काम सुरू असताना लाईनमनला विजेचा धक्का बसून तो जागीच गतप्राण झाला. सूर्यकांत (चंद्रू) गावकर असे त्या मृत लाईनमनचे नाव असून तो घोडेमळवाडा मोर्ले, सत्तरी येथील रहिवासी होता. तर त्याचा मदतनीस सर्वेश गावकर यालाही विजेचा धक्का बसल्याने तो खांबावरून पडून गंभीर जखमी झाला.
अवकाळी पावसाने गोव्याला झोडपले
राज्यात अवकाळी पावसाने मंगळवारी झोडपून काढले. राज्यात बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची नोंद झाली. यामुळे रस्त्यावर, विजेच्या तारांवर झाडे पडून नुकसानीच्या घटनांची नोंद झाली. पडझड झाल्याने ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली नसल्याने गटार तुंबून रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या.
बुधवार, २१ मे
२०४७ पर्यंत विकसित भारत बनविण्याचे ध्येय :उपराष्ट्रपती धनखड
२०४७ पर्यंत विकसित भारत बनविण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी दरडोई उत्पन्नात आठ पट वाढ तसेच आपल्या सीमेवर शांतता गरजेची आहे. युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास आर्थिक विकास होऊ शकत नाही. राष्ट्रीय सुरक्षेसाठी, राष्ट्रवादासाठी अढळ वचनबद्धता व अथक तयारी गरजेची असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी वास्को येथे बुधवारी एका कार्यक्रमात केले.
झाड पडून सहा दुचाकींचे नुकसान
राज्याला बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने रस्त्यावर, घरावर झाडे पडून नुकसानीच्या घटनांची नोंद झाली. काही ठिकाणी घरात, दुकानात पाणी शिरले. पणजीत उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाड पडून सहा दुचाकींची नुकसान झाले. सोनारभाट, रेईश मागूश येथे झाड कोसळून श्री भूमीपुरुष मंदिराचे नुकसान झाले. मडगाव, रावणफोंड पुलाकडील रस्ता खचण्याची भीती असल्याने तो बंद करत वाहतूक वळवण्यात आली. म्हालवाडा - पैगिण येथे इंदिरा आवास योनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरावर झाड पडून नुकसान झाले. सततच्या पावसामुळे सडा येथे दरड कोसळण्याची घटना घडली. यामुळे सडा फ्लाय ओव्हर भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
गुरुवार, २२ मे
वेरेत विजेचा धक्का लागून युवक ठार
आंबेखंड वेरे येथे विजेचा धक्का लागून रवी बिरादर (३६, रा. सुकूर पर्वरी) हा युवक ठार झाला. आपल्या आईला तो भेटायला घरी आला असताना ही दुर्घटना घडली. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रवी बिरादर याची वृद्ध आई आंबेखंड वेरे येथे एकटीच राहते. तर रवी पत्नी व दोन मुलांसमवेत सुकूर येथे वास्तव्यास होता. रवी हा आपल्या आईला भेटायला अधूनमधून येत होता. घटनेवेळी तो घरी आला होता. यावेळी घरातील दरवाजाच्या बाजूला पडलेल्या वीज तारांना त्याचा स्पर्श झाला आणि विजेचा धक्का बसला.
निवडणूक झाली नसल्याने ३० कोमुनिदादी ‘डिफॉल्ट’ घोषित
संबंधित कोमुनिदादींना निवडणूक घेण्यात अपयश तसेच ठोस स्पष्टीकरण देणे शक्य न झाल्याने कोमुनिदाद प्रशासकांनी ३० कोमुनिदादींना ‘डिफॉल्ट’ घोषित केले आहे. ही कारवाई कोमुनिदाद कोडातील कलम ४७ नुसार करण्यात आली आहे.सरकार या कोमुनिदादींसाठी समिती नियुक्त करेल किंवा पुन्हा निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठी सर्व कोमुनिदादींच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मात्र, मध्य विभागातील (सेंट्रल झोन) ३० कोमुनिदादींना निवडणूक घेण्यात अपयश आले.
शुक्रवार, २३ मे
‘समग्र शिक्षा’तील ५ कोटींच्या घोटाळ्याने शिक्षण क्षेत्र हादरले!
पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणाला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या समग्र शिक्षा अभियानाच्या गोव्याच्या बँक खात्यात तब्बल ५ कोटींची अफरातफर झाली. या प्रकरणी पर्वरी पोलिसांकडूनही तपास सुरू आहे. तपासातून घोटाळ्यात अभियानाचे अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असल्याचे उघड झाल्यास त्यांना तत्काळ घरी पाठवण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले
बुडणाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात युवकाचा बुडून मृत्यू
सांतिनेज येथील आपटेश्वर सिद्धीविनायक देवस्थानच्या मागे असलेल्या विहिरीत बुडालेल्या युवकाला वाचविण्यासाठी गेलेला युवकच बुडाल्याची घटना घडली. दरम्यान वाचविण्यात आलेल्या युवकावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू आहेत. शुक्रवार २३ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास सांतिनेज येथील आपटेश्वर सिद्धीविनायक देवस्थानच्या मागे असलेल्या विहिरीवर चार ते पाच युवक अंघोळ करण्यासाठी आले होते. याच दरम्यान त्यातील एक युवक विहिरीत बुडाला. त्या युवकाला वाचविण्यासाठी दुसऱ्या युवकाने विहिरीत उडी मारली आणि बुडणाऱ्याला सुखरूप बाहेर काढले. मात्र वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला.
शनिवार, २४ मे
आरोग्य खात्यातील सहा अधिकाऱ्यांना भोवणार ‘भ्रष्टाचार’!
गोव्याच्या आरोग्य खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे अलर्टमोडवर आले आहेत. दरम्यान सहा अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये दोन आरोग्य निरीक्षक आणि चार स्वच्छता निरीक्षकांचा समावेश असून, हे कर्मचारी भ्रष्टाचार तसेच ब्लॅकमेलिंगसारख्या गंभीर प्रकरणांत अडकल्याची माहिती समोर आल्यानंतर खात्याने त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली होती.
उत्तर गोव्यातील नैसर्गिक जलसाठ्यांवर दोन महिने प्रवेश बंदी
उत्तर गोव्यातील तलाव, नद्या , धबधबे, खाणींचे खंदक व अन्य नैसर्गिक जलसाठ्यांवर दोन महिने प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबत उत्तर गोवा जिल्हाधिकारी यशस्विनी बी यांनी शनिवारी आदेश जारी केला. पावसाळ्यात अशा ठिकाणी बुडून मृत्यू होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी २४ मे ते २४ जुलै दरम्यान प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पाणवठ्याच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक आणि मामलेदारांनी पाळत ठेवून आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.