२४ लाखांपासून परवडणाऱ्या दरात गृहनिर्माण मंडळाचे फ्लॅट्स उपलब्ध

बोर्डे डिचोली, सांकवाळ येथील घरांची ई-लिलावाद्वारे होणार विक्री


25th May, 12:26 am
२४ लाखांपासून परवडणाऱ्या दरात गृहनिर्माण मंडळाचे फ्लॅट्स उपलब्ध

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा गृहनिर्माण मंडळाने सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर मिळावे या उद्देशाने बोर्डे डिचोली आणि सांकवाळ येथे नव्याने बांधलेले टू बीएचके फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ही घरे २४ लाख ते ५० लाख रुपये या किमतीत असून, बाजारभावाच्या तुलनेत ही किंमत लक्षणीयरीत्या कमी आहे. फ्लॅट्सची विक्री ई-लिलावाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
बोर्डे डिचोली येथे १७ फ्लॅट्स, तर सांकवाळ येथे ६० फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. बोर्डे डिचोली येथील फ्लॅट्सचे क्षेत्रफळ सुमारे ६० ते ११४ चौ.मी., तर सांकवाळ येथील प्रत्येक फ्लॅटचे क्षेत्रफळ ९१.९० चौ.मी. इतके आहे. बोर्डे डिचोली येथील फ्लॅट्ससाठी किमान दर ४० हजार रुपये प्रति चौ.मी., तर सांकवाळ येथील फ्लॅट्ससाठी ५४ हजार रुपये प्रति चौ.मी. असा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे डिचोलीतील फ्लॅट्सची किमान किंमत २४ लाख रुपये, तर जास्तीत जास्त ४५.९४ लाख रुपये इतकी आहे. सांकवाळमधील फ्लॅट्ससाठी किमान किंमत ५० लाख रुपये इतकी आहे. लिलावाच्या प्रक्रियेत सर्वाधिक बोली लावणाऱ्या इच्छुकांना हे फ्लॅट्स विकले जाणार आहेत.
अर्ज प्रक्रिया व अटी
या फ्लॅट्ससाठी २३ मे ते २० जून या कालावधीत गोवा ऑनलाईन पोर्टल (https://goaonline.gov.in) वरून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. अर्जासोबत १,००० रुपये नोंदणी शुल्क (जीएसटी १८० रुपये) व १ लाख रुपयांची मूळ ठेव भरावी लागेल. नोंदणी शुल्क परत दिले जाणार नाही.
व्यावसायिक गाळ्यांचीही विक्री
फ्लॅट्स व्यतिरिक्त बोर्डे डिचोली येथील १३ व्यावसायिक गाळे व पर्वरी मार्केट संकुलातील १० गाळे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. डिचोलीतील गाळ्यांचे क्षेत्रफळ १७ ते २८ चौ.मी., तर पर्वरीतील २५ ते २८ चौ.मी. आहे. यांची किमान किंमत अनुक्रमे १ लाख ते २.५ लाख रुपये प्रति चौ.मी. इतकी आहे.
परवडणारे दर हेच वैशिष्ट्य
गृहनिर्माण मंडळाने स्पष्ट केले आहे की, या प्रकल्पासाठी दर निश्चित करताना बाजारातील सध्याच्या भावाची माहिती उपनोंदणी कार्यालयाकडून घेतली गेली. त्यानंतर मंडळाच्या बैठकांमध्ये चर्चा करून नागरिकांना परवडतील असे किमान दर निश्चित करण्यात आले आहेत. बोर्डे डिचोली येथील प्रकल्पामधील बांधकामासाठी पूर्वी निश्चित करण्यात आलेला दर हा बाजारभावाच्या तुलनेत अधिक असल्याने, मंडळाने त्यावर फेरविचार करून सुधारित दर ठरवले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा