गोवा आर्किटेक्चर कॉलेजमधील रॅगिंग प्रकरण दडपण्याचा प्रयत्न: नाझारेथ

प्रकरणाची निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलीस अधीक्षकांकडून चौकशी होणे आवश्यक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th May, 05:14 pm
गोवा आर्किटेक्चर कॉलेजमधील रॅगिंग प्रकरण दडपण्याचा प्रयत्न: नाझारेथ

पणजी: गोवा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये रॅगिंग  होण्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्याबाबत तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत, पण पीडितांवर तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. मुख्यमंत्री आणि कुलगुरूंकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप गोव्यातील सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी केला.  पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कार्लुस लोरेन्स उपस्थित होते.

या विषयावर बोलताना नाझारेथ म्हणाले की, आर्किटेक्चर कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या रॅगिंगबाबत कुलगुरू, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, शिक्षण सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, तंत्रशिक्षण संचालक आणि आर्किटेक्चर कौन्सिलच्या अध्यक्षांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने माहिती अधिकारामार्फत माहिती मागवण्यात आली होती. परंतु कलम ८ अंतर्गत ही मागणी फेटाळून लावण्यात आल्याचे नाझारेथ म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या सिनिअर विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या ज्यूनियर विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती. कॉलेज बाहेरच्या या खाजगी पार्टीत त्यांच्यावर रॅगिंग झाले. त्याठिकाणी महाविद्यालयाचे एक प्राध्यापक उपस्थित होते. प्राध्यापक महाविद्यालयीन अधिकाऱ्यांच्या किंवा प्राचार्यांच्या परवानगीशिवाय खाजगी पार्टीला उपस्थित राहू शकत नाहीत. जर ते या पार्टीला गेले असतील तर ती महाविद्यालयाची जबाबदारी आहे, असा युक्तिवाद नाझारेथ यांनी केला.

प्रवेश घेतलेले विद्यार्थी आक्रमक-
दरम्यान या प्रकारानंतर प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांनी 'सदर प्राध्यापकांना महाविद्यालयात प्रवेश देऊ नका,' असे सांगत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे महाविद्यालयाने त्या प्राध्यापकावर बंदी घातल्याने त्यांनी राजीनामा दिला. ही बाब समोर आल्यानंतर, वरिष्ठ विद्यार्थ्यांनी पुन्हा नवीन विद्यार्थ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच सदर प्राध्यापकावर तक्रार दाखल करणार नाही, असे पत्र लिहिण्यासाठी प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांवर दबाव आणला असल्याचा आरोप नाझारेथ यांनी केला आहे.

पॉक्सो कायदा लागू करा-
मुलांनी तक्रार मागे घेतल्यामुळे घटनेचा तपास बंद करण्यात आला आहे. पण या तक्रारी मागे का घेण्यात आल्या आणि त्या घेण्यास कोणावर दबाव टाकण्यात आला याची चौकशी झाली पाहिजे. अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने या प्रकरणी पॉक्सो कायदा लागू केला पाहिजे. तसेच या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा निवृत्त पोलीस अधीक्षकांकडून व्हावी अशी मागणी नाझारेथ यांनी केली आहे.

हेही वाचा