उत्तर गोव्यातील नैसर्गिक जलसाठ्यांवर प्रवेश बंदी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
24th May, 03:51 pm
उत्तर गोव्यातील नैसर्गिक जलसाठ्यांवर प्रवेश बंदी

पणजी : उत्तर गोव्यातील तलाव, नद्या , धबधबे, खाणींचे खंदक व अन्य नैसर्गिक जलसाठ्यांवर दोन महिने प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबत उत्तर गोवा जिल्हाधिकारी यशस्विनी बी यांनी शनिवारी आदेश जारी केला आहे. पावसाळ्यात  अशा ठिकाणी बुडून मृत्यू होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी २४ मे ते २४ जुलै दरम्यान प्रवेश बंदी करण्यात आली आहे.  पाणवठ्याच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक आणि मामलेदारांनी पाळत ठेवून आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

गेल्या काही वर्षात उन्हाळ्यात तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला स्थानिक तसेच पर्यटक खाणींचे खंदक, नद्या, तलाव आदींमध्ये पोहायला जातात. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पोहायला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. शुक्रवारीच पणजीतील आपटेश्वर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या तळ्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. 

या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय उत्तर गोवा जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांना उल्लंघनांची पडताळणी करणे, आवश्यक कारवाई करणे, संबंधित पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करणे आणि योग्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर तक्रारी दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दक्षिण गोव्यासाठी असा आदेश जारी केला होता.

हेही वाचा