राजस्थानच्या घरच्या मैदानावर १० धावांनी पराभव : हरप्रीत ब्रारचे ३ बळी
जयपूर : आयपीएल २०२५ मध्ये शनिवारी झालेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव करत स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत २१९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ २०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
या विजयामुळे पंजाब किंग्जचा संघ पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा हा दहावा पराभव आहे.
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर प्रियंश आर्या केवळ ९ धावांवर बाद झाला. प्रभसिमरनने २१ धावा केल्या. पंजाबकडून पदार्पण कणारा मिचेल वोवन शुन्यावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या नेहल वधेराने मोर्चा सांभाळला. त्याने ७० धावांची दमदार खेळी केली. त्याच्या या खेळीत ५ चौकार आणि ४ भेदक षटकारांचा समावेश होता.
नेहल वधेरासोबत लियाम लिविंगस्टोननेही आक्रमक फलंदाजी करत ४३ धावांची खेळी साकारली. श्रेयस अय्यरने मधल्या फळीत संयमी आणि धडाडीची खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. त्याने ३३ धावा केल्या.
राजस्थानकडून तुषार देशपांडेने ३७ धावांत २, क्वेना माफाका, रियान पराग, आकाश मधवाल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पंजाबने २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सला २२० धावांचे कठीण लक्ष्य मिळाले होते. मात्र त्यांच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून दिली. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या ५ षटकांत संघाला ६० धावांच्या पार नेले. सूर्यवंशीने केवळ १५ चेंडूत ४० धावा करत पंजाबच्या गालंदाजांचा समाचार घेतला. मात्र, तो लवकरच बाद झाला.
जैस्वालने आपल्या नैसर्गिक शैलीत खेळ करत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २५ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ५० धावा केल्या. पण अर्धशतक होताच तोही माघारी परतला.
संजू सॅमसनचा पुनरागमनाचा सामना असला तरी तो फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याने २० धावा केल्या. मधल्या फळीत रियान परागही १३ धावांवर बाद झाला. शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांच्यात ३७ धावांची भागीदारी झाली. पण ती पुरेशी ठरली नाही. ध्रुव जुरेलने ३१ चेंडूत ५३ धावा केल्या.
शेवटच्या षटकात थरार! पण पंजाबची बाजी
राजस्थानला शेवटच्या २ षटकात ३० धावांची गरज होती. १९ व्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजीस आला आणि त्याने फक्त ८ धावा दिल्या. त्यामुळे सामना पंजाबच्या बाजूने झुकला. शेवटचे षटक मार्को जॅनसेनने टाकले. त्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर फक्त दोन धावा आल्या. पुढच्या दोन चेंडूंवर त्याने ध्रुव जुरेल आणि वानिंदू हसरंगा यांना बाद करून राजस्थानचा विजयाचा मार्ग बंद केला. शेवटच्या दोन चेंडूंवर दोन चौकार आले तरी ते अपुरे ठरले आणि राजस्थानला १० धावांनी पराभव पत्करावा लागला.
हा विजय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही खेळाच्या प्रत्येक विभागात शिस्तबद्ध कामगिरी केली.
श्रेयस अय्यर, कर्णधार, पंजाब किंग्स
आमच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती, पण मधल्या फळीत विकेट्स गमावल्याने सामना हातातून गेला.
संजू सॅमसन, कर्णधार, राजस्थान रॉयल्स
हरप्रीत ब्रारची चमकदार गोलंदाजी
पंजाबकडून हरप्रीत ब्रार हा या सामन्यात सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत फक्त २८ धावा देत ३ महत्त्वाचे गडी बाद केले. यामध्ये यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि हसरंगा यांचा समावेश होता. त्याच्या अचूक गोलंदाजीमुळे राजस्थानच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळता आले नाही. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
पॉईंट टेबलवर पंजाब तिसऱ्या स्थानी
या विजयामुळे पंजाब किंग्जचा संघ पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी १२ पैकी ८ सामने जिंकले असून त्यांच्या खात्यात आता १६ गुण आहेत. नेट रनरेट देखील चांगला असल्यामुळे त्यांचे प्लेऑफचे तिकीट निश्चित झाले आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ मात्र आता दबावाखाली आला आहे. त्यांनी १३ सामन्यांपैकी ७ विजय मिळवले असून त्यांचे केवळ ६ गुण आहेत.