पर्वरी : महामार्गावर भीषण अपघात; १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th May 2025, 01:30 pm
पर्वरी : महामार्गावर भीषण अपघात; १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

पणजी: पर्वरीम येथील मॅजेस्टिक हॉटेलजवळ आज रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात  फराझ नाईक (वय १९, सुकुर-पर्वरी) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना स्वयंअपघात आहे की कोणीतरी धडक दिली, याचा तपास पोलीस सध्या करताहेत सुरू आहे. 

आज पहाटे साडेचारच्या सुमारास फराझ नाईक दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना अपघातस्थळी इंटरनेट केबल पडलेली आढळून आली असून, ती अपघातास कारणीभूत ठरली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. फराझचा शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. 

एप्रिल महिन्यात उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यात अपघातांची संख्या जास्त नोंदवण्यात आली आहे. उत्तर गोव्यात ८३ अपघात झाले, तर दक्षिण गोव्यात ११५ अपघातांची नोंद झाली आहे. अपघातांची संख्या जास्त असल्याने दक्षिण गोव्यात १४, तर उत्तर गोव्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर गोव्यात आठ जण गंभीर जखमी झाले, तर १८ जणांना किरकोळ दुखापत झाली. याउलट, दक्षिण गोव्यात ९ जण गंभीर जखमी झाले, तर ५८ जणांना किरकोळ दुखापत झाली. 

दुचाकीस्वारांचे मृत्यूंचे प्रमाण उत्तरेत जास्त

विशेष म्हणजे, दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्राणघातक (फॅटल) अपघातांची संख्या समान (प्रत्येकी १२) असली तरी, दुचाकी अपघातातील मृत्यूंचे प्रमाण उत्तर गोव्यात अधिक आहे. उत्तर गोव्यात नऊ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला, तर दक्षिण गोव्यात ही संख्या आठ आहे. यामुळे राज्यात दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


हेही वाचा