एकाचा मृत्यू तर अनेक जखमी
कॅलिफोर्निया : गुरुवारी सकाळी पाम स्प्रिंग्ज येथील एका प्रजनन उपचार केंद्रावर (फर्टिलिटी क्लिनिक) झालेल्या बॉम्बस्फोटात एक व्यक्ती मृत्यू पावली तर किमान चार जण जखमी झाले आहेत. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्फोट सकाळी अकरा वाजता नॉर्थ इंडियन कॅन्यन ड्राइव्ह येथे झाला. स्फोटामुळे क्लिनिकच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या फुटल्या आहेत. हा हल्ला जाणूनबुजून क्लिनिकवर केला गेला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. आतापर्यंतच्या तपासातून असे लक्षात येत आहे की मृत व्यक्ती स्वतःच स्फोट करणारी असावी, असे एफबीआयच्या लॉस एंजेलिस विभाग प्रमुख अकिल डेव्हिस यांनी सांगितले.
इमारतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सर्व कर्मचारी, आयव्हीएफ सुविधा आणि संग्रहित गर्भ सुरक्षित आहेत, असे क्लिनिकचे संचालक डॉ. माहेर अब्दुल्ला यांनी सांगितले . सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्फोटामुळे इमारतीला झालेले मोठे नुकसान स्पष्टपणे दिसून येत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा वाढवली असून जनतेला तेथे जाऊ नये असा इशारा दिला आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या एफबीआय आणि स्थानिक पोलिस यांच्या संयुक्त तपासटीमने हल्ल्यामागील मंशा आणि जबाबदार व्यक्ती शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.