पोलिसाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, न्यायालयाने सुनावली शिक्षा

कॉन्टेबलला दीड वर्षांचा कारावास, १० हजार रुपये दंड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th May 2025, 12:29 am
पोलिसाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, न्यायालयाने सुनावली शिक्षा

म्हापसा : म्हापसा पोलीस स्थानकात एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विश्वजीत परब याला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायाधीश पूर्वा नाईक यांनी दोषी ठरवत दीड वर्षांचा साधा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या खटल्यात सरकारतर्फे वकील तेजस चोडणकर यांनी बाजू मांडली. सुनावणीवेळी त्यांनी मांडलेले मुद्दे तसेच पीडितेच्या साक्षीमुळे आरोपीवरील गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे निवाड्यात न्यायाधीशांनी म्हटले आहे.

दरम्यान, मध्यंतरी आरोपीने २६ ऑगस्ट २०११ ते १० फेब्रुवारी २०१२ हा ५ महिने १५ दिवसांचा काळ पोलीस तसेच न्यायालयीन कोठडीत घालवला होता. त्यामुळे हा काळ शिक्षेच्या कालावधीतून वगळण्यात आला आहे.

दरम्यान, म्हापसा पोलिसांना १२ ऑगस्ट २०११ रोजी म्हापसा बसस्थानकावर एक महिला ग्राहकांना आकर्षित करीत असल्याच्या माहितीच्या आधारे पीडितेला पकडून पोलीस स्थानकावर आणले होते. यावेळी आरोपी कॉन्स्टेबलने तिचा लैंगिक छळ केला होता. पीडितेने सुधारगृहात दिलेल्या जबाबातून हा प्रकार उघड झाल्यावर गुन्हा शाखेच्या तत्कालीन निरीक्षक सुनीता सावंत यांनी गुन्हा नोंदवून विश्वजीत परब याला अटक करीत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होता.